Revised Common Lectionary (Semicontinuous)
95 चला, परमेश्वराची स्तुती करु या.
जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
2 परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या.
त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.
3 का? कारण परमेश्वर मोठा देव आहे,
इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.
4 सगळ्यांत खोल दऱ्या आणि
सर्वांत उंच पर्वत परमेश्वराचे आहेत.
5 महासागरही त्याचाच आहे-त्यानेच तो निर्मिर्ण केला.
देवाने स्वःतच्या हाताने वाळवंट निर्माण केले.
6 चला, आपण त्याची वाकून उपासना करु या.
ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.
7 तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे.
आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेंढरे होऊ.
8 देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात
जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.
9 तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली,
त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
10 मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो
आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे.
त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.
11 म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की
ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”
दावीद इस्राएलचा राजा होतो
11 सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत. 2 पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.’”
3 इस्राएल लोकांमधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाकडे हेब्रोन येथे आली. परमेश्वरासमोर दावीदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा त्या पुढाऱ्यांनी दावीदास अभिषेक केला. आता दावीद इस्राएलाचा राजा झाला. शमुवेल मार्फत परमेश्वराने असे होणार असे वचन दिले होते.
दावीद यरुशलेम घेतो
4 सर्व इस्राएल लोकांबरोबर दावीद यरुशलेम नगराकडे गेला. यरुशलेमला त्याकाळी यबूस असे म्हणत असत; आणि तेथे राहणाऱ्यांना यबूसी. ते नगरवासी 5 दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात पाऊल टाकू शकणार नाहीस.” तरीही दावीदाने त्यांचा पाडाव केलाच. दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. यालाच दावीदनगर हे नाव पडले.
6 दावीद म्हणाला, “यबूसी लोकांवरील हल्ल्याचे जो नेतृत्व करील तो माझा सेनापती होईल.” यवाबने हे नेतृत्व केले. हा सरुवेचा मुलगा. यवाब सेनापती झाला.
7 दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याला दावीद नगर नाव पडले. 8 या किल्ल्याभोवती दावीदाने नगराची उभारणी केली. मिल्लो पासून नगराच्या तटबंदीपर्यंत त्याने ते बांधले. जेथे पडझड झाली होती तिथे दुरुस्ती केली. 9 दावीदाच्या मोठेपणात भर पडत गेली. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता.
13 मग वडीलांपैकी एकाने मला विचारले, “हे पांढरे झगे घातलेले कोण आहेत? व कोठून आले आहेत?”
14 मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”
आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतली आहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत. 15 म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्या मंदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील. 16 त्या लोकांना पुन्हा केव्हाच भूक लागणार नाही. त्यांना पुन्हा केव्हाच तहान लागणार नाही, सूर्यामुळे त्यांना बाधा होणार नाही. कोणतीही उष्णता त्यांना जाळून टाकणार नाही. 17 सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. ज्या झऱ्यांचे पाणी जीवन देते तेथे तो त्यांना नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रु पसून टाकील.”
2006 by World Bible Translation Center