Revised Common Lectionary (Semicontinuous)
95 चला, परमेश्वराची स्तुती करु या.
जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या.
2 परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या.
त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या.
3 का? कारण परमेश्वर मोठा देव आहे,
इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.
4 सगळ्यांत खोल दऱ्या आणि
सर्वांत उंच पर्वत परमेश्वराचे आहेत.
5 महासागरही त्याचाच आहे-त्यानेच तो निर्मिर्ण केला.
देवाने स्वःतच्या हाताने वाळवंट निर्माण केले.
6 चला, आपण त्याची वाकून उपासना करु या.
ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.
7 तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे.
आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेंढरे होऊ.
8 देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात
जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.
9 तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली,
त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
10 मी त्या लोकांच्या बाबतीत चाळीस वर्षे सहनशील राहिलो
आणि ते प्रमाणिक नव्हते हे मला माहीत आहे.
त्या लोकांनी माझी शिकवण आचरणात आणायचे नाकारले.
11 म्हणून मी रागावलो आणि शपथ घेतली की
ते माझ्या विसाव्याच्या जागेत प्रवेश करणार नाही.”
शमुवेल बेथलहेमला जातो
16 परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “शौलसाठी तू किती दिवस शोक करत बसणार आहेस? राजा म्हणून मी त्याला झिडकारले तरी तू त्याच्याबद्दल वाईट वाटून घेत आहेस? आपल्या शिंगात तेल भरुन घे आणि बेथलहेमला जायला नीघ. तुला मी इशाय नावाच्या माणसाकडे पाठवतो. इशाय बेथलहेमला राहतो. त्याच्या एका मुलाची मी राजा म्हणून निवड केली आहे.”
2 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलाने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील.”
परमेश्वर त्यावर त्याला म्हणाला, “तू बेथलहेमला जायला नीघ, बरोबर एक वासरु घे. ‘मी परमेश्वराला यज्ञ करायला चाललो आहे’ असे म्हण. 3 इशायला यज्ञासाठी बोलाव. मग मी काय करायचे ते सांगीन. मी सांगेन त्या व्यक्तीला अभिषेक कर.”
4 शमुवेलने मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. तो बेथलहेम येथे आला. तेव्हा तेथील वडीलधाऱ्यांना धास्ती वाटली. ते शमुवेलला भेटले. “आपली ही सलोख्याचीच भेट आहे ना”, असे त्यांनी शमुवेलला विचारले.
5 शमुवेल म्हणाला, “होय, मी स्नेहभावाने आलो आहे. मला परमेश्वरासाठी यज्ञ करायचा आहे. तयारीला लागा आणि माझ्याबरोबर यज्ञासाठी या.” शमुवेलने इशायला व त्याच्या मुलांना तयार केले. त्यांनाही यज्ञात आमंत्रित करुन त्यात भाग घ्यायला सांगितले.
6 इशाय आणि त्याची मुले आली तेव्हा शमुवेलने अलियाबला पाहिले. शमुवेलला वाटले, “हाच तो परमेश्वराने निवडलेला माणूस!”
7 तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रुपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरुपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”
8 मग इशायने आपला दुसरा मुलगा अबीनादाब याला बोलावले. तो शमुवेल समोरुन गेला. शमुवेल म्हणाला, “हीही परमेश्वराची निवड नव्हे.”
9 मग इशायने शम्माला शमुवेलच्या समोर यायला सांगितले. तेव्हाही शमुवेल म्हणाला, “हाही तो नव्हे.”
10 इशायने आपल्या सातही मुलांना शमुवेल पुढे हजर केले. पण शमुवेल म्हणाला, “यापैकी कोणालाही परमेश्वराने निवडलेले नाही.”
11 त्याने पुढे इशायला विचारले, “इथे तुझी सगळी मुलं हजर आहेत ना?”
इशाय म्हणाला, “नाही आणखी एक आहे सगळ्यात धाकटा तो रानात मेंढरे राखायला गेला आहे.”
शमुवेल म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून इथे आण. तो येईपर्यंत आपण जेवायला सुरुवात करयाची नाही.”
12 इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता.
परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”
13 शमुवेलने आपले तेलाने भरलेले शिंग उचलले आणि इशायच्या या धाकट्या मुलावर सर्व भावंडांसमोर त्या खास तेलाने अभिषेक केला. तेथून पुढे दावीदवर परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊ लागला. एवढे झाल्यावर शमुवेल रामा येथे परतला.
देवाचा कळप
5 आता मी तुमच्यातील वडीलजनांना आवाहन करतो (मी स्वतः एक वडील आहे आणि ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा साक्षीदार आहे, तसेच भविष्यकाळात प्रकट होणाऱ्या गौरवाचा भागीदारसुद्धा आहे.) 2 तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा. व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालनपोषण करा. तुम्हांला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालनपोषण करा. तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करु नका तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा. 3 आणि ज्यांची काळजी घेण्याची कामगिरी तुमच्यावर सोपविली आहे, त्यांच्याशी एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागू नका, तर तुमच्या सर्व कळपापुढे एक उदाहरण होईल असे वागा. 4 आणि जेव्हा तुमचा मुख्य मेंढपाळ येईल, तेव्हा तुम्हाला कधीही नाश न पावणारा गौरवी मुगुट देईल. 5 त्याचप्रकारे तरुण बंधुनो, वडीलजनांच्या अधिन असा. आणि तुम्ही सर्वजण लिनतेचा पोशाख घालून एकमेकाशी विनयाने वागा कारण,
“देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो,
पण दीनांवर कृपा करतो.” (A)
2006 by World Bible Translation Center