Revised Common Lectionary (Semicontinuous)
5 दुसऱ्या दिवशी यहूदी लोकांचे पुढारी, वडीलजन, व नियमशास्त्र शिकविणारे शिक्षक यरुशलेममध्ये एकत्र जमले. 6 हन्ना (प्रमख याजक), केफा, योहान आणि अलेक्यांद्र हे तेथे होते. तसेच प्रमुख याजकाच्या घरातील प्रत्येक जण हजर होता. 7 त्यांनी पेत्र व योहान यांना सर्वांसमोर उभे राहण्यास सांगितले, यहूदी पुढाऱ्यांनी पुष्कळ वेळ त्यांना विचारले. “या लंगड्या माणसाला तुम्ही कसे बरे केले? कोणत्या शक्तीचा उपयोग तुम्ही केला? कोणाच्या अधिकाराने हे तुम्ही केले?”
8 मग पेत्र पवित्र आत्म्याने भरला गेला. तो त्यांना म्हणाला, “अहो पुढाऱ्यांनो आणि वडीलधारी लोकांनो; 9 या लंगड्या माणासाच्या बाबतीत जी चांगली गोष्ट झाली त्याबद्दल तुम्ही आम्हांला प्रश्न विचारीत आहात काय? तुम्ही आम्हांला विचारीत आहात का की याला कोणी बरे केले? 10 तुम्ही सर्वांनी आणि यहूदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे, ती ही की, नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला! तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. देवाने त्याला मरणातून उठविले. हा मनुष्य लंगडा होता, पण आता तो चांगला झाला आहे. आणि येशूच्या सामर्थ्यामुळे तुमच्यासमोर उभा राहू शकत आहे!
11 ‘तुम्ही बांधणारांनी जो दगड नापसंत केला,
जो पुढे कोनशिल झाला तोच हा येशू होय.’ (A)
12 येशू हा एकमेव आहे जो लोकांना तारु शकेल. त्याचे नाव हेच सामर्थ्य फक्त जगामध्ये आहे जे लोकांना तारण्यासाठी दिले आहे, आमचे तारण येशूद्वारे झालेच पाहिजे!”
दावीदाचे स्तोत्र.
23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
ते मला नेहमी मिळत राहील.
2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]
16 अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. 17 जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते असे आपण कसे म्हणू शकतो? 18 प्रिय मुलांनो, आपली प्रीति केवळ शब्दांनी बोलण्याएवढीच मर्यादित नसावी तर ती कृती सहीत व खरीखुरी असावी.
19 आम्ही सत्याचे आहोत ते यावरुन आम्हांस कळेल आणि अशाप्रकारे देवासमोर आमच्या अंतःकरणाची खात्री पटेल 20 जेव्हा जेव्हा आमचे अंतःकरण आम्हांला दोष देईल, हे यासाठी की आमच्या अंतःकरणापेक्षा देव महान आहे, आणि सर्व काही (तो) जाणतो.
21 प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हांला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हांला खात्री आहे. 22 आणि देवाकडे आम्ही जे मागतो ते आम्हाला प्राप्त होते. कारण आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो, आणि त्याला जे संतोषकारक आहे ते आम्ही करीत आहोत. 23 तो आम्हांला अशी आज्ञा करतो की येशू ख्रिस्ताच्या नावावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे, जशी येशूने आम्हांला आज्ञा केली आहे. 24 जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. देव आमच्यामध्ये राहतो हे आम्हांला यावरुन समजते, त्याने दिलेल्या आत्म्यामुळे आम्हाला हे समजते.
11 “मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो. 12 ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो. मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणार माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करुन त्यांची दाणादाण करतो. 13 मजूर पळून जातो कारण तो रोजंदारीवरचा कामगार असतो, तो मेंढरांची खरी काळजी करीत नाही.
14-15 “मी मेंढरांची (लोकांची) काळजी घेणारा मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो तसा मी माझ्या मेंढरांना ओळखतो. आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझी मेंढरे मला ओळखतात. या मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. 16 माझी दुसरीही मेंढरे आहेत ती येथे या कळपात नाहीत. त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे. ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्यकाळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. 17 मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता मजवर प्रीति करतो. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो. 18 तो कोणी माझ्यापासून घेत नाही. मी माझा स्वतःचा जीव स्वतःच्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे. आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे. हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे.”
2006 by World Bible Translation Center