Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
23 परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे
ते मला नेहमी मिळत राहील.
2 तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो.
तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो.
तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो.
4 मी जरी थडग्यासारख्या [a] भयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो
तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, का?
कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस.
तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
5 परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर तयार केलेस
तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
6 माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील.
आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंतकाळापर्यंत बसेन. [b]
इस्राएल मिसरमध्ये पोहोंचतो
28 याकोबाने प्रथम यहूदाला योसेफाकडे पाठवले; यहूदा गोशेन प्रांतात योसेफाकडे गेला त्यानंतर याकोब व त्याच्या परिवारातील सर्व मंडळी यहूदाच्या मागे गोशेन प्रांतात गेली. 29 आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले; तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळा घालून तो बराच वेळ रडला.
30 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मात्र मी शांतीने मरण पावेन; मी प्रत्यक्ष तुझे तोंड पाहिले आहे आणि तू जिवंत आहेस हे मला समजले आहे.”
31 मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या बापाच्या घरच्या सर्वांस म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की ‘माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत; 32 माझ्या बापाच्या घरचे सर्वजण मेंढपाळ आहेत. ते सतत शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे व गुरुढोरे पाळीत आले आहेत. ते त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे तेथे जे काही होते ते सर्व घेऊन आले आहेत.’ 33 जेव्हा फारो तुम्हाला बोलावून विचारील, ‘तुम्ही काय काम धंदा करता?’ 34 तेव्हा तुम्ही असे सांगा, ‘आम्ही सर्व मेंढपाळ आहोत. दुभती जनावरे पाळून आम्ही उपजिविका करतो. हा आमचा पिढीजात धंदा आहे. आमच्या आधी आमचे वाडवडील हाच धंदा करीत होते.’ मग फारो तुम्हाला गोशेन प्रातांत राहू देईल. मिसरच्या लोकांना मेंढपाळ आवडत नाहीत; म्हणून गोशेन प्रांतात राहणे तुमच्या फायद्याचे आहे.”
इस्राएल गोशेन प्रांतात वस्ती करतो
47 योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनानातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते हल्ली गोशेन प्रांतात आहेत.” 2 योसेफाने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांची निवड केली.
3 फारो त्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?”
ते भाऊ म्हणाले, “महाराज, आम्ही आपले दास मेढपाळ आहोत; आमच्या आधी आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.” 4 ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात आमच्या कळपासाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा नाही म्हणून आम्ही ह्या देशात राहण्यास आलो आहोत; महाराज आम्ही आपणास नम्र विनंती करतो की आम्हास कृपा करुन गोशेन प्रांतात राहू द्यावे.”
5 मग फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत. 6 त्यांना राहण्याकरिता तू मिसरमधील कोणतेही ठिकाण निवड; त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे. त्याना गोशेन प्रांतात वस्ती करुन राहू दे; आणि ते जर तरबेज व कुशल मेंढपाळ असतील तर मग त्यांनी माझ्या गुराढोरांचीही काळजी घ्यावी.”
पेत्र व योहान यहूदी धर्मसभेपुढे
4 पेत्र व योहान लोकांशी बोलत असताना, काही लोक त्यांच्याकडे आले. त्यातील काही यहूदी याजक, मंदिराचे रक्षण करणाऱ्या शिपायांचा कप्तान व काही सदूकी लोक होते. 2 ते चिडले होते. कारण दोन प्रेषित लोकांना शिकवीत होते. पेत्र व योहान लोकांना शिकवीत होते की, येशूच्या सामर्थ्याने मेलेली माणसे पुन्हा उठतील. 3 यहूदी पुढाऱ्यानी व नियमास्त्र शिक्षकांनी पेत्र व योहानाला धरले व तुरुंगात टाकले. अगोदरच रात्र झाली होती, म्हणून त्यांनी पेत्र व योहान यांना दुसऱ्या दिवसापर्यंत तुरुंगात ठेवले. 4 परंतु पेत्र व योहान यांचा संदेश ऐकणाऱ्या पुष्कळ लोकांनी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला. विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये सुमारे पाच हजार लोक होते.
2006 by World Bible Translation Center