Revised Common Lectionary (Semicontinuous)
150 परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा.
2 देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा.
त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा.
3 तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा.
सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा.
4 डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा.
तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा.
5 जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा.
झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा.
6 प्रत्येक जिवंत वस्तू परमेश्वराची स्तुती करो.
परमेश्वराची स्तुती कर.
आशेचे वचन
30 यिर्मयाला परमेश्वराकडून पुढील संदेश आला. 2 परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणाला, “मी तुझ्याशी बोललेले शब्द ग्रंथात लिहून ठेव. ते तुझ्यासाठी लिहून ठेव. 3 असे करण्याचे कारण असा काळ येईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे, “तेव्हा मी इस्राएल आणि यहूदा येथील माझ्या हद्दपार केलेल्या लोकांना परत आणीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत मी त्यांना परत वस्ती करु देईन. मग ती भूमी पुन्हा त्यांच्या मालकीची होईल.”
4 इस्राएल व यहूदा येथील लोकांबद्दल परमेश्वराने हा संदेश दिला. 5 परमेश्वर म्हणाला,
“लोकांचे भीतीने रडणे आम्हाला ऐकू येते.
लोक घाबरले आहेत.
कोठेही शांती नाही.
6 “पुढील प्रश्न विचारा व त्यांचा विचार करा.
पुरुषाला मूल होऊ शकेल का? अर्थात् नाही
मग प्रत्येक पुरुष प्रसूतिवेदना होणाऱ्या बाई प्रमाणे
पोट धरताना का दिसत आहे?
प्रत्येकाचा चेहरा मृताप्रमाणे पांढराफटक का पडला आहे?
का? कारण ते फार घाबरले आहेत.
7 “याकोबाच्या दृष्टीने हा फार महत्वाचा काळ आहे.
हा अतिशय संकटाचा काळ आहे.
पुन्हा असा काळ कधीच येणार नाही.
पण याकोबाचे रक्षण होईल.
8 “त्या वेळी,” हा सर्वशक्तिमान परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी इस्राएल व यहूदा ह्यांच्यामधील लोकांच्या मानेवरील जोखड तोडीन. तुमची बंधने तोडीन. परक्या देशातील लोक पुन्हा माझ्या माणसांना गुलाम होण्यास भाग पाडणार नाहीत. 9 इस्राएल आणि यहूदा यांच्यामधील लोक परक्या देशांची सेवा करणार नाहीत. नाही! ते परमेश्वराची, त्यांच्या देवाची सेवा करतील. मी त्यांच्यासाठी पाठवणार असलेल्या त्याच्या दावीद राजाचीही ते सेवा करतील.
10 “तेव्हा, याकोब, माझ्या सेवका, घाबरु नकोस,”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“इस्राएल, भीऊ नकोस
मी त्या दूरच्या ठिकाणाहून तुझे रक्षण करीन.
तुम्ही त्या दूरच्या प्रदेशात कैदी आहात.
पण मी तुमच्या वंशजांना वाचवीन.
मी त्यांना तेथून परत आणीन.
याकोबाला पुन्हा शांती लाभेल.
लोक त्याला त्रास देणार नाहीत.
माझ्या माणसांना घाबरविणारा कोणीही शत्रू नसेल.
11 इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आहे.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“मी तुमचे रक्षण करीन.
मी तुम्हाला त्या राष्ट्रांमध्ये पाठविले.
पण त्या सर्व राष्ट्रांचा मी नाश करीन.
खरंच! मी त्या राष्ट्रांचा नाश करीन.
पण मी तुमचा नाश करणार नाही.
तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे.
पण मी न्याय्यबुद्धीने तुम्हाला शिक्षा करीन.”
10 जी देवाची मुले आहेत व जी सैतानाची मुले आहेत, त्यांना तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता: प्रत्येकजण जे योग्य ते करीत नाही आणि जो त्याच्या भावावर प्रेम करीत नाही तो देवाचा नाही.
आम्ही एकमेकांवर प्रीति केली पाहिजे
11 आपण एकमेकांवर प्रीति करावी, ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे. 12 काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा) होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसे केले कारण त्याची स्वतःची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती.
13 बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीति करतो. जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो. 15 जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेले अनंतकाळचे जीवन मिळत नाही.
16 अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.
2006 by World Bible Translation Center