Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्याच्या साथीने गावयाचे दावीदाचे स्तोत्र. [a]
4 माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन
तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक.
आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग.
मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.
2 लोकहो! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहात?
तुम्ही माझ्याबद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते.
3 परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा
जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे एकतो.
4 जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका.
तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.
5 देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा
आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.
6 बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल?
परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.”
7 परमेश्वरा, तू मला खूप सुखी केलेस. सुगीच्या दिवसात जेव्हा धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे.
8 मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का?
कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.
पेत्र एका लंगड्या मनुष्याला बरे करतो
3 एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते. त्यावेळी दुपारचे तीन वाजले होते. मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती. 2 जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले, तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते. म्हणून काहीं मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे. 3 त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले.
4 पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले. “आमच्याकडे पाहा!” 5 त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले; त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील. 6 परंतु पेत्र म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काही तरी आहे, ते मी तुला देतो: नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग!”
7 मग पेत्राने त्या माणासाचा उजवा हात धरला व त्याला उठविले. आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ति आली. 8 तो माणूस उडी मारुन उभा राहिला व चालू लागला. तो चालत, बागडत, आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. 9-10 सर्व लोकांनी त्याला ओळखले. मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले. आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुति करताना पाहिले. लोक आश्चर्यचकित झाले. हे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते.
सेवकासारखे व्हा
24 तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत श्रेष्ठ कोण आहे. 25 पण येशू त्यांना म्हणाला, “विदेश्यांचे राजे त्यांच्या लोकांवर (प्रजेवर) सत्ता गाजवितात. इतर लोकांवर अधिकार असणारी माणसे लोकांनी त्यांना लोकांचे उपकारकर्ते म्हणण्यास भाग पाडतात. (स्वतःला उपकारकर्ते म्हणवून घेतात.) 26 परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे. 27 तेव्हा मोठा कोण: जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हांमध्ये सेवा करणारासारखा आहे.
28 “परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात. 29 ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ति केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो. 30 म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.
2006 by World Bible Translation Center