Revised Common Lectionary (Semicontinuous)
विश्वासणाऱ्यांचा सहभाग
32 विश्वासणाऱ्यांचा हा परिवार एक मनाने व ऐक्याने राहत असे. ते एकचित्त होते. परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे. उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत. 33 मोठ्या सामर्थ्याने प्रेषित लोकांना प्रभु येशू मेलेल्यांतून उठला याविषयी साक्ष देत. आणि त्या विश्वासणाऱ्यांवर देवाचा मोठा आशीर्वाद होता. 34 त्यांना आवश्यकता भासे ते सर्व त्यांना मिळत असे. प्रत्येक जण ज्याची स्वतःची शेत (जमीन) होती किंवा घर होती, त्यांनी ते पैशासाठी विकले व विकून आलेले पैसे त्यांनी प्रेषितांच्या हवाली केले. 35 आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार पुरवठा केला जात असे.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
133 जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात,
तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
2 ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे,
अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
3 हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.
सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
1 जगाच्या सुरुवातीपासून हे होते. हे आम्ही ऐकले आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. आम्ही ते निरखून पाहिले आहे. आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे. जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत. 2 ते जीवन आम्हास प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि त्या अनंतकाळच्या जीवनाविषयी आम्ही तुम्हांला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले. 3 आम्ही ते पाहिले आहे व ऐकले आहे आणि आम्ही आता ते तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासह सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. 4 म्हणून आम्ही तुम्हांला या गोष्टींविषयी लिहीत आहोत. यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा.
देव आमच्या पापांची क्षमा करतो
5 आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत. देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. 6 जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही. 7 पण जर आम्ही प्रकाशात चालतो, जसा देव प्रकाशात आहे तर आमची विश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते.
8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवीत आहोत. आणि आमच्यामध्ये सत्य नाही. 9 जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो. 10 जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही देवाला लबाड ठरवितो. आणि त्याचा संदेश आमच्या अंतःकरणात नाही.
येशू आमचा साहाय्यकर्ता
2 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करु नये यासाठी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे, पण जर एखादा पाप करतो तर पित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे. 2 तो अर्पण आहे जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो.
येशू त्याच्या शिष्यांना दिसतो(A)
19 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.” 20 असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
21 पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.” 22 आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, “पवित्र आत्मा स्वीकारा. 23 जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्याला पापक्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.”
येशू थोमाला दिसतो
24 आता थोमा (याला दिदुम म्हणत) बारा शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. 25 तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की, “आम्ही प्रभूला पाहिले आहे!” पण तो त्यांना म्हणाला, “त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.”
26 एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो.” 27 मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.”
28 थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”
29 मग येशू त्याला म्हणाला, “तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस, पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत.”
योहानाने हे पुस्तक का लिहिले?
30 आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ अदभुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली. ती या पुस्तकात लिहिली नाहीत. 31 पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हांला जीवन मिळेल.
2006 by World Bible Translation Center