Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.
133 जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात,
तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
2 ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे,
अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.
3 हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.
सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
नबुखद्नेस्सरचे स्वप्न
2 नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षांत काही स्वप्ने पडली. त्या स्वप्नांमुळे तो काळजीत पडला व त्याची झोप उडाली. 2 म्हणून त्याने त्याच्या ज्ञानी माणसांना बोलावून घेतले. हे ज्ञानी स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आणि भविष्यात काय घडेल, हे सांगण्यासाठी मंत्र-तंत्र करीत व ताऱ्यांचे निरीक्षण करीत. ह्या लोकांनी राजाला काय स्वप्न पडले आहे, ते सांगावे, अशी राजाची इच्छा होती. मग ते लोक राजाच्या समोर येऊन उभे राहिले.
3 राजा त्यांना म्हणाला, मला पडलेल्या स्वप्नामुळे मी चिंतेत पडलो आहे. मला स्वप्नाचा अर्थ समजावून घ्यायचा आहे.
4 मग खास्दी अरामी भाषेत राजाला म्हणाले, राजा, चिरंजीव हो! आम्ही तुझे सेवक आहोत. कृपा करून आम्हाला तुझे स्वप्न सांग, म्हणजे मग आम्ही तुला त्याचा अर्थ सागू.
5 तेव्हा नबुखद्नेस्सर राजा त्यांना म्हणाला, नाही! तुम्हीच मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. तुम्ही हे सांगितले नाही, तर तुमचे तुकडे करण्याचा हुकूम मी देईन. एवढेच नाही तर तुमच्या घरांची राखरांगोळी करीन. 6 पण तुम्ही मला माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितलात, तर मी तुम्हाला भेटी, बक्षिसे देईन. तुमचा सन्मान करीन. तेव्हा आता माझे स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.
7 ते ज्ञानी लोक पुन्हा राजाला म्हणाले, “कृपा करून बस आम्हाला तुझे स्वप्न सांग म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
8 मग नबुखद्नेस्सर उत्तरला, तुम्ही वेळ काढीत आहात, हे मला कळले आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळला, असे मला वाटते. 9 तुम्ही मला माझे स्वप्न सांगितले नाहीत तर तुम्हाला शिक्षा होणार, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणून तुम्ही सर्व एक होऊन माझ्याशी खोटे बोलत आहात. तुम्ही वेळकाढूपणा करू पाहत आहात. मी तुम्हाला सांगितलेले विसरेन अशी आशा तुम्ही धरून आहात. पण आता आधी मला माझे स्वप्न सांगा. तुम्ही मला स्वप्न सांगू शकलात, तर तुम्ही त्याचा खूरा अर्थही सांगू शकाल हे मला पटेल.
10 खास्दी राजाला म्हणाले, “राजा, तू जे मागत आहेस, ते देऊ शकणारा एकही माणूस या पृथ्वीवर नाही. अजूनपर्यंत कोणत्याही राजाने, ज्ञानी वा मात्रिक अथवा खास्दी याच्याजवळ अशा प्रकारची मागणी केलेली नाही. अगदी मोठ्या व सामर्थ्यवान राजांनीसुध्दा ज्ञानी माणसांकडे असे काही, कधीही मागितलेले नाही. 11 राजा, अशक्य गोष्ट करण्यास सांगत आहे. फक्त दैवतंच राजाला त्याचे स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकतात. पण दैवत माणसांमध्ये राहात नाहीत.”
12 हे बोलणे ऐकून राजाचा पारा चढला. मग त्याने बाबेलमधील सर्व ज्ञानी माणसांना ठार करण्याचा हुकूम दिला. 13 राजाच्या हुकूमाची दवंडी पिटविण्यात आली. सर्व ज्ञानी माणसे ठार केली जाणार होती. राजाचे लोक दानीएलला व त्याच्या मित्रांना ठार मारण्यासाठी त्यांचा तपास करण्यासाठी गेले.
14 अर्योक शिपायांचा म्होरक्या होता. तोच बाबेलमधील ज्ञानी माणसांना ठार मारणार होता. पण दानीएल त्याच्याशी चातुर्याने व विनयाने बोलला. 15 “दानीएल अर्योकला म्हणाला राजाने अशी कडक शिक्षा का ठोठावली?”
मग अर्योकने राजाच्या स्वप्नाची सर्व हकिगत वर्णन केली. मग दानीएलला सर्व समजले. 16 सर्व हकिगत समजताच दानीएल नबुखद्नेस्सर राजाकडे गेला व त्याने राजाजवळ थोडा वेळ मागितला. मग तो राजाला त्याचे स्वप्न व त्या स्वप्नाचा अर्थ सांगणार होता.
17 मग दानीएल त्याच्या घरी गेला. हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्या आपल्या मित्रांना त्याने सर्व हकिगत सांगितली. 18 दानीएलाने आपल्या मित्रांना स्वर्गातील देवाची प्रार्थना करण्यास सांगितले. दानीएलने त्यांना प्रार्थना करण्यास सांगितले कारण त्यामुळे देव त्यांच्यावर कृपा करील व हे रहस्य समजण्यास मदत करील. मग तो व त्याचे मित्र, बाबेलच्या इतर ज्ञानी माणसाबरोबर मारले जाणार नाहीत, असे त्याला वाटले.
19 रात्री, देवाने दानीएलला दृष्टान्त देऊन सर्व रहस्य उलगडून सांगितले. मग दानीएलने स्वर्गातील देवाचे स्तुतिस्तोत्र गायले. तो म्हणाला,
20 “सदासर्वकाळ देवाच्या नावाची स्तुती करा.
सामर्थ्य व ज्ञान त्याच्यापाशीच आहे.
21 तो काळ आणि ऋ तू बदलतो.
आणि राजेही बदलतो.
तोच राजांना सत्ता देतो.
आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो.
लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो,
त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो.
22 समजण्यास अतिशय कठीण असलेली, गुप्त रहस्ये त्याला माहीत असतात.
प्रकाश त्याच्याबरोबर असल्यामुळे,
अंधारात आणि गुप्त जागी काय आहे ते त्याला कळते.
23 माझ्या पूर्वजांच्या देवा, मी कृतज्ञ आहे, मी तुझी स्तुती करतो.
तू मला ज्ञान व शक्ती दिलीस.
मी विचारलेल्या गोष्टी सांगितल्यास.
तूच मला राजाच्या स्वप्नाबद्दल सांगितलेस.”
पेत्र व योहान विश्वासणाऱ्यांकडे परततात
23 पेत्र व योहान यांची सुटका झाल्यावर ते त्यांच्या स्वतःच्या बंधुवर्गाकडे परत गेले. त्यांनी प्रमुख याजक व प्रमुख वडील यहूदी पुढारी जे बोलले ते सर्व त्यांनी बंधुवर्गांस सांगितले. 24 जेव्हा विश्वासणाऱ्यांनी हे ऐकले, तेव्हा त्या सर्वांनी एक मनाने देवाला प्रार्थना केली. ते म्हणाले, “सर्वसमर्थ प्रभु, तूच आकाश, जमीन, समुद्र व जगातील सर्वांचा निर्माणकर्ता आहेस. 25 आमचा पिता दावीद हा तुझा सेवक होता. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याने हे शब्द लिहिले:
‘राष्ट्रे का ओरडत आहेत?
लोक (देवाविरुद्ध) का व्यर्थ कट रचित आहेत?
26 ‘या भूतलावरील राजे लढाईसाठी सज्ज झाले
आणि प्रभु परमेश्वर व त्याचा ख्रिस्त यांच्याविरुद्ध एकवट झाले आहेत.’ (A)
27 या गोष्टी खरोखर घडल्या, जेव्हा हेरोद. [a] पंत पिलात, यहूदीतर राष्ट्रे व यहूदी लोक हे सर्व जण येशूविरुद्ध ‘एकत्र आले.’ 28 त्यांनी तुझी योजना प्रत्यक्षात आणली, हे सर्व तुइया सामर्थ्याने व तुइया इच्छेने घडले. 29 आणि आता प्रभु, ते काय म्हणत आहेत ते ऐक. ते आम्हांला भेडसावण्याचा प्रयत्न करीन आहेत! प्रभु, आम्ही तुझे सेवक आहोत, तुला आम्ही जे बोलावे असे वाटते ते न भीता बोलण्यासाठी आम्हांला मदत कर. 30 तुझे सामर्थ्य दाखवून आम्ही धीट बनण्यासाठी आम्हांला मदत कर; आजारी लोकांना बरे कर, पुरावे दे आणि चमत्कार कर, जे येशू जो तुझा पवित्र सेवक याच्या सामर्थ्यांने घडतील.”
31 विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना केल्यावर, ज्या ठिकाणी ते एकत्र जमले होते ती जागा हादरली, ते सर्व पवित्र आत्म्याने भरले गेले. व ते न भीता देवाचा संदेश सांगत गेले.
2006 by World Bible Translation Center