Revised Common Lectionary (Semicontinuous)
बेथ
9 तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल?
तू दिलेली शिकवण आचरणात आणून.
10 मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो.
देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
11 मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का?
म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.
12 परमेश्वरा, तुझे कल्याण असो
मला तुझे नियम शिकव.
13 मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.
14 तुझ्या कराराचा अभ्यास करणे
मला इतर कशाही पेक्षा आवडते.
15 मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन.
मी तुझी जीवन जगण्याची पध्द्त आचरेन.
16 मला तुझे नियम आवडतात.
मी तुझे शब्द विसरणार नाही.
देव लोकांना उत्तेजन देतो
2 सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गयला परमेश्वराकडून संदेश मिळाला: 2 यहूदाचा राज्यपाल आणि शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल व प्रमुख याजक यहोसादाकचा मुलगा यहोशवा आणि इतर लोक यांच्याशी तू बोल. त्यांना ह्या गोष्टी सांग. 3 “तुमच्यातील कितीजण ह्या मंदिराकडे पाहून ह्याची तुलना आधीच्या नाश झालेल्या सुंदर मंदिराशी करण्याचा प्रयत्न करतात? तुम्हाला काय वाटते? आधीच्या मंदिराच्या तुलनेत हे काहीच नाही ना? 4 पण आता परमेश्वर म्हणतो, ‘जरुब्बाबेल, निराश होऊ नकोस.’ यहोसादाकच्या मुला, प्रमुख याजक यहोशवा, ‘नाउमेद होऊ नकोस. या देशाच्या सर्व लोकांनो, धीर सोडू नका. हे काम चालू ठेवा, मी तुमच्याबरोबर आहे.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.”
5 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मिसर सोडले, तेव्हा मी तुमच्याबरोबर करार केला. मी माझ्या वचनाला जागलो. माझा आत्मा तुमच्यात आहे. तेव्हा घाबरु नका. 6 का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी हलवून सोडीन आकाश आणि पृथ्वी कंपित करीन समुद्र आणि कोरडी जमीन यांना कंपित करीन. 7 मी राष्ट्रांना धक्का देईन आणि मग प्रत्येक राष्ट्र तुमच्याकडे संपत्ती घेऊन येईल मग हे मंदिर वैभवाने भरुन टाकीन. सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. 8 त्यांच्याकडील सर्व सोने-चांदी माझ्या मालकीची आहे सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे. 9 आणि सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की आताचे मंदिर हे आधीच्या मंदिरापेक्षा सुंदर असेल. मी ह्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करीन. लक्षात ठेवा, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे.”
20 हाग्गयला महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, परमेश्वराकडून आणखी एक संदेश आला तो असा होता: 21 “राज्यपाल जरुब्बाबेलकडे जा. त्याला सांग की मी आकाश-पृथ्वी हालवीन. 22 मी पुष्कळ राजे आणि राज्ये उलथवून टाकीन. त्या दुसऱ्या लोकांच्या राज्यसत्तेचा मी नाश करीन. मी त्यांच्या रथांचा व सारथ्यांचा नाश करीन. आता त्या सैन्यांमध्ये मैत्री आहे. पण ते एकमेकांविरुध्द उठातील आणि तलवारीने एकमेकांना मारतील. 23 सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे शल्तीएलच्या मुला, जरुब्बाबेल, तू माझा सेवक आहेस मी तुझी निवड केली आहे, आणि त्यावेळी मी तुझा मुद्रांकित अंगठीप्रमाणे उपयोग करीन. मी ह्या गोष्टी केल्या आहेत ह्याचा तू साक्षी वा पुरावा असशील.”
सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
34 जमाव म्हणाला, “ख्रिस्त सर्वकाळ राहतो असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे तुम्ही का म्हणता? मनुष्याचा पुत्र कोण आहे?”
35 मग येशू त्यांना म्हणाला. “आणखी थोडा वेळ प्रकाश तुमच्यामध्ये असणार आहे. तुमच्यामध्ये प्रकाश आहे तोपर्यंत तुम्ही चाला. यासाठी की अंधाराने तुमच्यावर मात करु नये. कारण जो अंधारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. 36 तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे म्हणून तुम्हांला प्रकाश आहे तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा.” येशू या गोष्टी बोलला, मग तो निघून गेला. आणि त्यांच्यापासून गुप्त राहिला.
यहूदी येशूवर विश्वास ठेवण्याचे नाकारतात
37 येशूने इतके चमत्कार त्यांच्यासमोर केलेले असतानाही ते त्याच्यावर विश्वास ठेवीनात. 38 यासाठी की, यशया संदेष्ट्याचे वचन पूर्ण व्हावे:
“प्रभु, आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे.
आणि प्रभूचा हस्तप्रताप कोणास प्रगट झाला आहे?” (A)
39 या कारणासाठी त्यांनी विश्वास ठेवला नाही, जसे यशया एके ठिकाणी म्हणतो,
40 “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
व अंतःकरणाने समजू नये,
फिरू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले
आणि त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.” (B)
41 यशया असे म्हणाला, कारण त्याने त्याचे गौरव पाहिले आणि तो त्याच्याविषयी बोलला.
42 तरीही अधिकाऱ्यातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परुश्यांमुळे त्यांनी हे पत्करले नाही. 43 कारण त्यांना देवाच्या गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक आवडले.
येशूची शिकवण लोकांचा न्याय करील
44 तेव्हा येशू मोठ्याने बोलला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर विश्वास ठेवतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो. 45 आणि जो मला पाहतो, तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. 46 मी प्रकाश असा जगात आलो आहे. यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये.
47 “आणि जो कोणी माझी वचने ऐकून पाळीत नाही, त्याचा न्याय मी ठरवीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी आलो नाही, तर जगाच्या तारणासाठी आलो आहे. 48 जो माझा स्वीकार करीत नाही व माझ्या वचनाप्रमाणे वागत नाही त्याचा न्याय करणारा कोणी एक आहे, जे वचन मी बोललो तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करील. 49 कारण मी स्वतःहून बोललो असे नाही तर मी काय सांगावे व काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठविले, त्यानेच मला आज्ञा केली आहे. 50 आणि त्याची आज्ञा अनंतकाळचे जीवन आहे. हे मला ठाऊक आहे, म्हणून जे काही मी बोलतो ते जसे पित्याने मला सांगितले तसेच बोलतो.”
2006 by World Bible Translation Center