Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र दावीदाने बथशेबाबरोबर पाप केल्यानंतर भविष्यवेता नाथान त्याच्याकडे आला तेव्हाचे स्तोत्र
51 देवा, माझ्यावर दया कर,
तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने
आणि तुझ्या महान कृपेने माझी पापे पुसून टाक.
2 देवा माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक.
माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर.
3 मी पाप केले हे मला माहीत आहे.
ती पापे मला नेहमी दिसतात.
4 तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत
असे सांगतोस त्याच मी केल्या.
देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले.
मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास.
तुझे निर्णय योग्य आहेत.
5 मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या
आईने माझा गर्भ धारण केला.
6 देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल
तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर.
मला आंघोळ घाल म्हणजे मी बर्फापेक्षा शुभ्र होईन.
8 मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग.
तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस,
ती पुसून टाक.
10 देवा माझ्यात पवित्र ह्रदय निर्माण कर.
माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
11 मला दूर लोटू नकोस आणि
तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 मी तुझ्या मदतीमुळे आनंदी झालो,
मला पुन्हा तुझा आनंद दे,
माझा आत्मा सबळ कर आणि तुझ्या आज्ञा पाळणारा कर.
2 परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली.
परमेश्वर तू भूतकाळात केलेल्या सामर्थ्यशाली गोष्टीने मी विस्मयचकित झालो आहे.
आता, आमच्या काळातही तू अशाच मोठ्या गोष्टी घडवाव्यास म्हणून मी प्रार्थना करतो.
कृपया आमच्या आयुष्यातच त्या घडव.
पण तुझ्या खळबळजनक घटनांच्या वेळीही, आमच्यावर दया करण्यास विसरु नकोस.
3 तेमानहून देव येत आहे.
पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे.
परमेश्वराच्या तेजाने स्वर्ग व्यापला जातो
आणि स्तुतीने पृथ्वी व्यापली जाते.
4 ते तेज तेजस्वी, चमकदार प्रकाशाप्रमाणे आहे त्याच्या हातातून किरण निघतात.
त्या हातात मोठे सामर्थ्य लपले आहे.
5 आजार त्याच्या आधी गेला.
आणि नाश करणारा त्याच्यामागून गेला.
6 परमेश्वराने स्वतः उभे राहून, पृथ्वीला न्याय दिला
त्याने राष्ट्रांतील लोकांवर नजर टाकली
आणि त्या लोकांचा भीतीने थरकाप झाला.
पुष्काळ वर्षे पर्वत घटृपणे उभे होते
पण त्यांचा चक्काचूर झाला.
अती प्राचीन टेकड्या खाली कोसळल्या
देवाचे नेहमीच हे असे असते.
7 कूशानची गावे संकटात असलेली मी पाहिली.
मिद्यानची घरे भीतीने कापली
8 परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का?
झऱ्यांवर तुझा राग होता का?
समुद्रावर तू संतापला होतास का?
विजयसाठी तुझ्या घोड्यांवर स्वार होताना किंवा रथांवर आरुढ होताना तू रागावला होतास का?
9 त्या वेळीसुध्दा तू इंद्रधनुष्य दाखविलेस.
पृथ्वीवरच्या वंशाबरोबर तू केलेल्या काराचा तो पुरावा होता
रुक्ष भूमीतून नद्या उगम पावल्या.
10 तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले.
समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली.
जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता
गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.
11 चंद्र-सूर्याचे तेज लोपले.
तुझ्या विजांचा तेजस्वी लखलखाट पाहून त्यांनी चमकणे सोडून दिले
त्या विजा म्हणजे जणू काही हवेत फेकलेले बाण व भाले होते.
12 रागाच्या भरात, तू पृथ्वी पायाखाली तुडविलीस
आणि राष्ट्रांना शिक्षा केलीस.
13 तू, तुझ्या माणसांच्या, रक्षणासाठी आलास.
तू निवडलेल्या राजाला, विजयकाडे नेण्यासाठी आलास.
रंकापासून रावापर्यंतच्या,
प्रत्येक दुष्ट घरातील प्रमुखाला
तू ठार मारलेस.
येशू आपल्या मित्रांबरोबर बेथानी येथे(A)
12 मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता. 2 म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले. मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता. 3 तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले.
4 पण त्याच्या शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता, त्याने विरोध केला. म्हणून तो म्हणाला, 5 “हे सुगंधी द्रव्य विकून आलेले पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत? ते तेल चांदीच्या तीनशे रुपयाच्या किमतीचे होते.” 6 गरिबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही, तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत, ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला.
7 “तिला एकटे सोडा,” येशूने उत्तर दिले, “मला पुरण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले. 8 तुमच्यात गरीब नेहमीच असतील, पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही.”
लाजराविरुद्ध कट
9 मग तो तेथे आहे हे यहूदीयांतील बऱ्याच जणांना कळले. तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजराला पाहावे म्हणून ते आले. 10 तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला मारण्याचा कट केला. 11 कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व त्याच्यावर विश्वास ठेवीत होते.
2006 by World Bible Translation Center