Revised Common Lectionary (Semicontinuous)
पितळेचा साप
4 इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले. 5 त्यांनी मोशेविरुद्ध व देवविरुद्ध तक्रार करायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “तू आम्हाला ह्या वाळवंटात मरण्यासाठी मिसर देशातून बाहेर का आणलेस? इथे भाकरी नाही, पाणी नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहोत.”
6 तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये विषारी साप सोडले. साप लोकांना चावले आणि बरेच इस्राएल लोक मेले. 7 लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तुझ्या विरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हाला माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक.” तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली.
8 परमेश्वर मोशेला म्हणाला, “एक पितळेचा साप कर आणि तो खांबावर ठेव. साप चावल्यानंतर जर एखाद्याने खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो माणूस मरणार नाही.” 9 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या माणसाने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.
भाग पांचवा
((स्तोत्रसंहिता 107-150)
107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
कारण तो चांगला आहे.
त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
2 परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
3 परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.
17 पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात.
आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
18 त्या लोकांनी खायचे नाकारले
आणि ते जवळ जवळ मेले.
19 ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली.
आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले.
20 देवाने आज्ञा केली आणि
त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
21 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तो लोकांसाठी
करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
22 परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा.
परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.
मरणाकडून जीवनाकडे
2 पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता. 2 ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे. 3 एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.
4 पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले. 5 आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.) 6 देवाने आम्हांला ख्रिस्ताबरोबर नविन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत. 7 देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.
8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. 9 आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये. 10 कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.
14 “मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. [a] मनुष्याच्या पुत्रालाही तसेच उंच केले पाहिजे. 15 अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळू शकते.”
16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. 18 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही. 19 ज्या वस्तुस्थितीच्या आधारे लोकांचा न्याय केला जातो ती ही जगामध्ये प्रकाश आला, परंतु लोकांना प्रकाश नको होता. त्यांना अंधार पाहिजे होता. कारण लोक वाईट कृत्ये करीत होते. 20 वाईट कृत्ये करणारा प्रत्येक जण प्रकाशाचा द्वेष करतो. तो प्रकाशाकडे येत नाही. कारण त्याने केलेली सर्व वाईट कृत्ये तो प्रकाश उघड करील. 21 परंतु जो सत्य मार्गाने चालतो तो प्रकाशाकडे वळतो. आणि त्याने केलेली कामे देवाकडून झाली होती हे तो प्रकाश दाखवून देईल. [b]
2006 by World Bible Translation Center