Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी गित्तीथच्या चालीवर बसवलेले कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत.
84 सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.
2 परमेश्वरा, मला वाट पहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे.
मला तुझ्या मंदिरात यायचे आहे.
माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे.
3 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना
आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात.
ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात
आणि तिथे त्यांना पिल्ले होतात.
4 तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात.
ते नेहमी तुझी स्तुती करतात.
5 जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात,
ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. [a]
6 ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला
झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण
केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो. [b]
7 लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना
एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात.
8 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक
याकोबाच्या देवा, माझे ऐक.
9 देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर.
तू निवडलेल्या राजाला दया दाखव.
10 तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे.
माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे.
11 परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे.
देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो
जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात
आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो.
12 सर्वशक्तिमान परमेश्वरा,
जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात.
दारयावेशचा आदेश
6 तेव्हा राजा दारयावेशने आपल्या आधीच्या राजांच्या कागदपत्रांचा दफ्तरखान्यात शोध घेण्याचा आदेश दिला. बाबेलच्या जामदराखान्यातच ही कागदपत्रे ठेवलेली होती. 2 मेदी प्रांतातील अखमथा किल्ल्यात (राजवाड्यात) एक गुंडाळी सापडली. तिच्यावर पुढीलप्रमाणे मजकूर लिहिलेला होता:
अधिकृत टिपण: 3 कोरेश राजाच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी यरुशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, देवाचे मंदिर पुन्हा बांधले जावे.
तेथे यज्ञ अर्पण करता यावेत. मंदिराचा पाया बांधून काढावा. मंदिराची उंची 90 फूट आणि रुंदी 90 फूट असावी. 4 भोवतालच्या भिंतीत मोठ्या पाषाणांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. मंदिराच्या बांधकामाचा खर्च राजाच्या तिजोरीतून केला जावा. 5 मंदिरातील सोन्यारुप्याच्या वस्तू पुन्हा आपापल्या जागी ठेवल्या जाव्यात. नबुखद्नेस्सरने त्या यरुशलेमच्या मंदिरातून हलवून बाबेलला आणल्या होत्या. त्यांची पुन्हा मंदिरात स्थापना व्हावी.
6 तेव्हा आता मी दारयावेश,
फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर बोजनई आणि त्यांचे त्या प्रांतातील इतर कारभारी यांना असा आदेश देतो की त्यांनी यरुशलेममधून दूर जावे. 7 कामगारांना त्रास देऊ नये. देवाच्या प्रार्थनास्थळाच्या कामात व्यत्यय आणू नये. यहुदी अधिकारी आणि यहूदी वडीलधारी मंडळी यांना हे मंदिर पूर्वी होते त्याचठिकाणी पुन्हा बांधू द्यावे.
8 आता माझा आदेश असा आहे: देवाच्या मंदिराचे बांधकाम करणाऱ्या यहूदी वडीलजनांसाठी असे करा. मंदिराच्या बांधकामाचा पूर्ण खर्च राजाच्या खजिन्यातून दिला जावा. हा पैसा फरात नदीच्या पश्र्चिमेकडील प्रांतांमधून येणाऱ्या करातून जमा होईल. या गोष्टी विनाविलंब करा म्हणजे कामाला खीळ बसणार नाही. 9 त्या लोकांना लागेल ते द्या. स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्यांना गोऱ्हे, मेंढे, कोकरे हत्यादी ज्या गोष्टी लागतील त्या द्या. यरुशलेममधील याजकांनी गहू, मीठ, द्राक्षारस तेल वगैरे मागीतल्यास त्यांना त्या वस्तू तात्काळ आणि रोजच्या रोज पुरवा. 10 स्वर्गातील देवाला प्रसन्न करणारे होम या यहूदी याजकांनी अर्पण करावे आणि त्यांनी माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी म्हणून त्यांना जे जे लागेल ते सर्व द्या.
11 माझी आणखी एक आज्ञा: माझ्या आज्ञेत कोणी फेरफार केल्यास त्याच्या घराचे लाकूड काढून ते त्याच्या शरीरात घुसवावे आणि त्याच्या घराची राखरांगोळी करुन केवळ दगडांच्या ढिगाऱ्यात त्याचे रुपांतर करावे.
12 परमेश्वराने यरुशलेममध्ये आपले नाव चिरंतन केले आहे. तेव्हा मला वाटते की या आज्ञेत बदल करणाऱ्या व्यक्तीचा मग ती व्यक्ती राजा असो की आणखी कोणी, देव त्यांचा नि:पात करील. कोणी त्याच्या यरुशलेममधील या मंदिराचा विध्वंस करायचा प्रयत्न केल्यासही देव त्याचा नाश करील.
मी, दारयावेश, हा हुकूम करीत आहे. त्याची तात्काळ आणि पूर्ण अंमलबजावणी व्हावी.
मंदिराच्या बांधकामाची समाप्ती आणि प्रतिष्ठापना
13 फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी मग राजा दारयावेशच्या हुकुमाचे पालन केले. त्यांनी ही आज्ञा कसोशीने आणि ताबडतोब पाळली. 14 यहुदी वडीलधाऱ्या मंडळींचे मंदिराचे काम चालूच राहिले. हाग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यात त्यांना यश आले. इस्राएलच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त यांच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पुरे केले. 15 हे मंदिर राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी अदार [a] महिन्याच्या तृतीयेला पुरे झाले.
16 इस्राएल लोकांनी या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या आनंदाने साजरी केली. बदिवासातून सुटून परत आलेले याजक, लेवी आणि इतर सर्व जण या उत्सवात सहभागी झाले.
येशू मंदिरात जातो(A)
15 नंतर ते येरूशलेमेत गेले आणि येशू मंदिरात गेला तेव्हा मंदिरात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग व जे कबुतरे विकत होते त्यांची बाके उलथून टाकली. 16 येशूने मंदिरातून कोणालाही काहीही बाहेर नेऊ दिले नाही. 17 मग येशू शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनामंदिर म्हणतील, असे पवित्र शास्त्रात लिहिले नाही काय? परंतु तुम्ही त्याला चोरांची गुहा बनविली आहे.” [a]
18 मुख्य याजकांनी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले. कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणाने थक्क झाल्याने ते त्याला भीत होते. 19 त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले.
2006 by World Bible Translation Center