Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी गित्तीथच्या चालीवर बसवलेले कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत.
84 सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.
2 परमेश्वरा, मला वाट पहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे.
मला तुझ्या मंदिरात यायचे आहे.
माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे.
3 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना
आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात.
ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात
आणि तिथे त्यांना पिल्ले होतात.
4 तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात.
ते नेहमी तुझी स्तुती करतात.
5 जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात,
ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. [a]
6 ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला
झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण
केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो. [b]
7 लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना
एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात.
8 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक
याकोबाच्या देवा, माझे ऐक.
9 देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर.
तू निवडलेल्या राजाला दया दाखव.
10 तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे.
माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे.
11 परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे.
देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो
जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात
आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो.
12 सर्वशक्तिमान परमेश्वरा,
जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात.
यहूदाचा राजा हिज्कीया
29 हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची मुलगी. 2 हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे.
3 हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करुन ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले. 4-5 सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका, देवाच्या सेवेसाठी शुचिर्भूत व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांनी मानलेला देव आहे. ज्या वस्तूं इथल्या नाहीत त्या इथून काढून टाका. त्या वस्तू म्हणजे घाण असून त्या हे पवित्र मंदिर भ्रष्ट करतात. 6 आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली. 7 त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले. 8 म्हणून यहूदा यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांना शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हांला माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात. 9 म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपली बायका पोरे कैदी झाली. 10 म्हणून मी, हा हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही. 11 तेव्हा मुलांनो, आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हाला त्याने निवडले आहे.”
16 परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुध्द आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करुन त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तिथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या. 17 पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवींनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. आठव्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुध्दता होऊन ते पवित्र व्हायला आणखी आठ दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले.
18 त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, “परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि ती वरील सर्व भांडी आम्ही शुध्द केल्या आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुध्द केली आहेत. 19 राजा आहाजने आपल्या कारकिर्दीत गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुध्दी करुन आम्ही ती मांडली आहेत. ती आता देवाच्या वेदीसमोरच आहेत.”
ख्रिस्ताचे अर्पण पाप नाहीसे करते
23 म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात. 24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.
25 जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही. 26 तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे.
27 आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते, 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
2006 by World Bible Translation Center