Revised Common Lectionary (Semicontinuous)
दहा आज्ञा
20 मग देव म्हणाला,
2 “मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.
3 “माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस.
4 “तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस; 5 त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; [a] मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो; 6 परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
7 “परमेश्वर देवाचे नांव तू व्यर्थ घेऊ नकोस; परमेश्वराच्या नांवाचा उपयोग तू अयोग्य गोष्टीसाठी करु नकोस; जर कोणी तसे करील तर तो दोषी ठरेल आणि परमेश्वर त्याला निर्दोष ठरविणार नाही.
8 “शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव; 9 आठवड्यातील सहा दिवस तू तुझे कामकाज करावेस; 10 परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या सन्मानासाठी विसाव्याचा दिवस आहे म्हणून त्या दिवशी तू, तुझे मुलगे तुझ्या मुली, तुझे गुलाम व तुझ्या गुलाम स्त्री यांनी तसेच तुझी गुरेढोरे व तुझ्या गावात राहाणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये; 11 कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्व काही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा विसाव्याचा विशेष दिवस म्हणून आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
12 “तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.
13 “कोणाचाही खून करु नकोस.
14 “व्यभिचार करु नकोस.
15 “चोरी करु नकोस.
16 “तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
17 “तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
ख्रिस्तामध्ये देवाचे सामर्थ्य आणि ज्ञान
18 कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे. 19 कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे,
“शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन,
आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.” (A)
20 ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले नाही का? 21 म्हणून, देवाच्या ज्ञानात असतानाही, जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वासणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाने निवडले.
22 कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, 23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण, आणि यहूदीतरांसाठी मूर्खपणा असा आहे. 24 परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. 25 तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानवप्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे. आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानवप्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तिशाली आहे.
येशू मंदिरात जातो(A)
13 यहूदी लोकांचा वल्हांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला. 14 येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती. 15 येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वाना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे मेज उलथेपालथे केले आणि त्यांचे पैसे विस्कटून टाकले. 16 येशू कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका!”
17 हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली:
“तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकले जाईल” (B)
18 यहूदी लोक येशूला म्हणाले, “एखादा चमत्कार करुन आम्हांला चिन्ह दाखवा. आणि या गोष्टी करण्याचा तुम्हांला अधिकार आहे हे सिद्द करा.”
19 येशूने उत्तर दिले, “हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते तीन दिवसांत पुन्हा उभारीन.”
20 यहूदी लोक म्हणाले, “लोकांना हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली! आणि तुम्ही ते तीन दिवसांत बांधू शकता यावर तुमचा खरोखरच विश्वास आहे काय?”
21 (परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी बोलला. 22 नंतर येशू मेलेल्यांतून पुन्हा उठविला गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविषयी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला.)
2006 by World Bible Translation Center