Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
16 तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट व गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले. 17 नंतर मोशेने लोकांना छावणीतून बाहेर काढून देवाला भेटावयास पर्वताजवळच्या जागी नेले. 18 सीनाय पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर पर्वतातून वर आला. परमेश्वर पर्वतावर अग्नीतून उतरला म्हणून असे झाले; आणि सर्व सीनाय पर्वत थरथरु लागला. 19 शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. मोशे देवाबरोबर जेंव्हा जेंव्हा बोलला तेंव्हा तेंव्हा देवाने त्याला मेघगर्जनेसारख्या आवाजाने उत्तर दिले.
20 याप्रमाणे परमेश्वर स्वर्गातून सीनाय पर्वताच्या शिखरावर उतरला आणि त्याने मोशेला बोलावून आपल्या बरोबर पर्वताच्या शिखरावर येण्यास सांगितले. तेव्हा मोशे पर्वतावर गेला.
21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग की त्यांनी माझ्याजवळ येऊ नये व माझ्याकडे बघू नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील. 22 तसेच याजक लोकांनाही सांग की माझ्या भेटीस माझ्याजवळ येताना आपणांस पवित्र करून यावे; तसे केले नाही तर मी त्यांना शिक्षा करीन.”
23 मोशेन परमेश्वराला सांगितले, “परंतु लोक पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तू स्वतः आम्हाला एक सीमारेषा आखावयास व लोकांनी ती रेषा ओलाडूंन पवित्र भूमिवर येऊ नये असे सांगितलेस.”
24 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांना इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.”
25 तेव्हा मोशे लोकांकडे खाली गेला व त्याने त्यांना या गोष्टी सांगितल्या.
मोशे व एलीयाबरोबर येशू(A)
2 सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले. 3 त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटालाशुभ्र करता येणार नाहीत, अशी होती. 4 एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रगट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते.
5 पेत्र येशूला म्हणाला, “गुरूजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणांसाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” 6 पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्याला समजेना कारण ते भयभीत झाले होते.
7 मग एक मेघ आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली. मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
8 आणि एकाएकी त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही.
2006 by World Bible Translation Center