Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमूख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
19 स्वर्ग देवाचा महिमा गातात.
आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
2 प्रत्येक नवा दिवस त्या गोष्टींबद्दल अधिक काही सांगतो
आणि प्रत्येक रात्र देवाच्या सामर्थ्याची अधिकाधिक रुपे दाखवते.
3 तुम्हांला एखादे भाषण किंवा शब्द खरोखरच ऐकू येत नाही.
तुम्हांला ऐकू येण्यासारखा एखादा आवाज ते करीत नाहीत.
4 परंतु त्यांचा “आवाज” सर्व जगभर जातो
त्यांचे “शब्द” पृथ्वीच्या टोकापर्यंत जातात.
आकाश म्हणजे जणू सूर्याचे घरच आहे.
5 सूर्य त्याच्या झोपायच्या खोलीतून आनंदी नवऱ्या मुलासारखा बाहेर येतो.
सूर्य त्याच्या परिक्रमेची सुरुवात अधीर झालेल्या
एखाद्या धावपटू सारखी करतो.
6 सूर्य आकाशाच्या एका कोपऱ्यापासून सुरुवात करतो
आणि तो आकाशाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जातो.
त्याच्या उष्णतेपासून काहीही लपून राहू शकत नाही.
परमेश्वराची शिकवणही तशीच आहे.
7 परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे.
ती देवाच्या लोकांना शक्ती देते.
परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे.
त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.
8 परमेश्वराचे नियम योग्य आहेत
ते लोकांना सुखी करतात.
परमेश्वराच्या आज्ञा चांगल्या आहेत
त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
9 परमेश्वराची भीती शुध्द आहे.
ती अखंड सहन करावी लागेल.
परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत.
ते संपूर्णत बरोबर आहेत.
10 परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे.
ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे.
11 परमेश्वराच्या शिकवणी ने त्याच्या सेवकाला इशारा मिळतो.
चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
12 कोणालाही आपल्या सगळ्या चुका दिसू शकत नाहीत.
म्हणून मला गुप्त पाप करु देऊ नकोस.
13 परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस.
त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस.
तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईन आणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.
14 माझ्या शब्दांनी आणि माझ्या विचारांनी तुला आनंद व्हावा असे मला वाटते.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस.
मला वाचवणारा फक्त तूच आहेस.
9 आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व इस्राएल लोकांना ऐकू जाईल; मी हे ह्यासाठी करीन की त्यामुळे तू सांगितलेल्या सर्व गोष्टीवर ते नेहमी विश्वास ठेवतील.”
मग मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.
10 परमेश्वर मोशेला म्हणाला, “आज आणि उद्या माझ्या विशेष भेटीसाठी लोकांना पवित्र कर; त्यांनी कपडे स्वच्छ धुवावेत. 11 व तिसऱ्या दिवशी माझ्या भेटीसाठी तयार राहावे कारण तिसऱ्या दिवशी परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल आणि सर्व लोक मला पाहतील. मग मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. 12-13 परंतु लोकांना पर्वतापासून दूर राहाण्यास तू सांग; तेथे तू एक सीमारेषा काढ आणि लोकांनी ती ओलांडू नये असे तू त्यांना बजावून सांग; जर कोणा माणसाचा किंवा जनावराचा पर्वताला स्पर्श झाला तर त्याला दगडाने किंवा बाणाने मारून टाकावे. परंतु त्याला कोणीही स्पर्श करु नये. शिंगाचा आवाज ऐकू येईपर्यंत लोकांनी थांबावे. तो आवाज ऐकल्यावर ते पर्वत चढून जाऊ शकतील.”
14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले.
15 मग मोशे लोकांना म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तो पर्यंत पुरुषांनी स्त्रियांना स्पर्श करु नये.”
30 “चाळीस वर्षांनंतर मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपांत मोशेला देवदूताचे दर्शन झाले. 31 जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली, तो आवाज प्रभूचा होता. 32 प्रभु म्हणाला, ‘मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे-अब्राहाम, इसहाक, याकोब यांचा देव आहे.’ मोशे भीतीने थरथर कापू लागला. डोळे वर करुन पाहण्याचे धाडस त्याला होईना.
33 “देव त्याला म्हणाला, ‘तुझ्या पायातील वहाणा काढ! कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. 34 माझ्या लोकांचा इजिप्त देशात होणारा छळ मी पाहिला आहे. आणि त्यांचे विव्हळ्णे माझ्या कानी आले आहे. म्हणून त्यांची सुटका करण्यास मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्त देशाला पाठवीत आहे.’ [a]
35 “मोशे हाच तो मनुष्य होता, ज्याला यहूदी लोकांनी नाकारले. ‘तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय?’ असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासनकर्ता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते. 36 म्हणून मोशेने लोकांना बाहेर काढले. त्याने सामर्थ्यशाली कृत्ये व चमत्कार केले. मोशेने ह्या गोष्टी इजिप्तमध्ये, तांबड्या समुद्राजवळ, आणि वाळवंटात चाळीस वर्षे केल्या.
37 “हा तोच मोशे आहे, ज्याने यहूदी लोकांना असे म्हटले: ‘देव तुम्हाला एक भविष्यवादी देईल. तो भविष्यवादी तुमच्याच लोकांमधून येईल. तो माइयासारखाच भविष्यवादी असेल’ 38 जो अरण्यात यहूद्दांबरोबर होता, सीनाय पर्वतावर आपणाबरोबर बोलणाऱ्या देवदूताबरोबर व आपल्या वाडवडीलांबरोबर होता ज्याला आम्हास देण्यासठी जीवनदायी वचने मिळाली होती, तोच हा मोशे होय,
39 “परंतु आपले वाडवडील त्याचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्याचे ऐकले नाही. आणि त्यांनी त्याला नाकारले. त्यांची मने इजिप्त देशाकडे परत ओढ घेऊ लागली. 40 आपले वाडवडील अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर. कारण इजिप्त देशातून काढून आम्हांला बाहेर घेऊन येणारा हा मोशे, त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही’.
2006 by World Bible Translation Center