Revised Common Lectionary (Semicontinuous)
सुंता-कराराची खूण
17 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा. 2 तू असे करशील तर मी आपणामध्ये एक करार करीन; मी तुला अगणित पटीत वाढवीन असे अभिवचन देतो.”
3 मग अब्रामाने देवाला लवून नमन केले; देव त्याला म्हणाला, 4 “आपल्या करारातील माझा भाग हा असा; मी तुला अनेक राष्ट्रांचा महान पिता करीन; 5 मी तुझे नाव बदलतो; तुझे नाव अब्राम असणार नाहीं तर तुझे नाव अब्राहाम होईल; मी तुला हे नाव देत आहे कारण तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. 6 मी तुला भरपूर संतती देईन; तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास येतील, आणि राजे उत्पन्न होतील. 7 आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो. हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन.
इसहाक-वचनाचा पुत्र
15 देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी बायको साराय हिला मी नवीन नाव देतो, तिचे नाव सारा असे होईल. 16 मी तिला आशीर्वादीत करीन; मी तिला मुलगा देईन आणि तू बाप होशील. सारा अनेक राष्ट्रांची माता होईल राष्ट्रांचे राजे तिच्या पासून निपजतील.”
23 जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24 का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो.
परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही.
परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही.
जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही.
25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले.
त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील.
जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी.
तुमचे ह्रदय सदैव आनंदी राहो.
27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो.
आणि ते परमेश्वराकडे परत येवोत.
सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.
28 का? कारण परमेश्वरच राजा आहे
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन
देवापुढे नतमस्तक झाले आहेत.
तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत
व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील.
लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.
31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत
त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.
विश्वासाद्वारे मिळालेले देवाचे अभिवचन
13 अब्राहाम आणि त्याच्या वंशजांना जे अभिवचन मिळाले की, ते जगाचे वारस होतील, ते अभिवचन नियमशास्त्रामुळे आले नाही, तर विश्वासाचा परिणाम असलेल्या नीतिमत्वामुळे आले. 14 लोकांना देवाने दिलेले अभिवचन जर नियमशास्त्र पाळण्याने मिळत असेल तर विश्वास व्यर्थ आहे. आणि देवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन व्यर्थ आहे. 15 कारण नियमशास्त्र मनुष्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाचा क्रोध निर्माण करते आणि जेथे नियमशास्त्र नाही, तेथे आज्ञा मोडणेही नाही.
16 म्हणून देवाचे वचन हे विश्वासाचा परिणाम आहे यासाठी की ते कृपेद्वारे मिळावे. अशा रीतीने ते अभिवचन अब्राहामाच्या सर्व संततीला आहे, फक्त नियमशास्त्रावर अवलंबून राहतात अशांसाठीच नव्हे तर अब्राहामाप्रमाणे विश्वासाने जगणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. 17 पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “मी तुला पुष्कळ राष्टांचा पिता केले आहे.” [a] अब्राहामाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवासमोर हे खरे आहे.
18 आपल्या अंतःकरणात आशा धरुन सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील,” असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो “अनेक राष्टांचा पिता” झाला. 19 अब्राहाम जवळ जवळ शंभर वर्षांचा झाला होता, त्यामुळे त्याचे शरीर मृतवतच झाल्यासारखे होते. तसेच सारेलासुद्धा मूल होणे शक्य नव्हते. अब्राहामाने याविषयी विचार केला होता, तरीपण त्याने त्याचा विश्वास कमकुवत होऊ दिला नाही. 20 देवाने जे अभिवचन दिले आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. त्याने विश्वास ठेवण्याचे कधीच थांबविले नाही. तो विश्वासात बळकट होत गेला आणि त्याने देवाला गौरव दिले. 21 त्याची पूर्ण खात्री होती की, देवाने जे अभिवचन दिले ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. 22 “म्हणूनच त्याला नीतिमान असे गणण्यात आले.” [b] 23 ते अभिवचन केवळ अब्राहामासाठीच होते असे नव्हे, 24 तर आपल्यासाठीसुद्धा होते, ज्याने आपल्या प्रभु येशुला मेलेल्यांतून उठविले आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, 25 येशूला आमच्या पापांकरिता मरण्यासाठी दिले गेले. आणि त्याला मरणातून उठविण्यात आले यासाठी की, देवासमोर आम्ही नीतिमान ठरविले जावे.
येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(A)
31 तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:ख भोगावे. वडील, मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्याला जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे. 32 त्याने हे स्पष्टपणे सांगितले,
तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्याला दटावू लागला. 33 परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना माझ्यापुढून निघून जा. देवाच्या गोष्टीविषयी तुला काही वाटत नाही. तुझे लक्ष देवाच्या गोष्टीकडे लागलेले नाही, तर फक्त मानवाच्या दृष्टिकोणातून महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे आहे.”
34 नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलाविले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा. आपला वधस्तंभ घ्यावा व मला अनुसरावे. 35 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जिवाला मुकेल व जो कोणी माइयासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. 36 मनुष्याने सर्व जग मिळविले व जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? 37 जिवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? 38 या व्यभिचारी आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
मोशे व एलीयाबरोबर येशू(A)
2 सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले. 3 त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटालाशुभ्र करता येणार नाहीत, अशी होती. 4 एलीया व मोशे त्याच्याबरोबर प्रगट झाले, ते येशूबरोबर संभाषण करीत होते.
5 पेत्र येशूला म्हणाला, “गुरूजी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण तीन मंडप बनवू. एक आपणांसाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” 6 पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्याला समजेना कारण ते भयभीत झाले होते.
7 मग एक मेघ आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली. मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
8 आणि एकाएकी त्यांनी एकदम सभोवती पाहीले तेव्हा त्यांना येशूशिवाय कोणीही दिसले नाही.
9 ते डोंगरावरून खाली येत असता येशूने त्यांना आज्ञा केली की, “तुम्ही जे पाहीले आहे ते मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठेपर्यत कोंणालाही सांगू नका.”
2006 by World Bible Translation Center