Revised Common Lectionary (Semicontinuous)
23 जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24 का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो.
परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही.
परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही.
जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही.
25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले.
त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील.
जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी.
तुमचे ह्रदय सदैव आनंदी राहो.
27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो.
आणि ते परमेश्वराकडे परत येवोत.
सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.
28 का? कारण परमेश्वरच राजा आहे
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन
देवापुढे नतमस्तक झाले आहेत.
तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत
व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील.
लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.
31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत
त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.
हागारेचा मुलगा
7 शूर गांवाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हागार एका परमेश्वराच्या देवदूताला आढळलीं. 8 देवदूत तिला म्हणाला, “सारायचे दासी हागारे, तू येथे का आलीस? तू कोठे जात आहेस?”
हागार म्हणाली, “माझी मालकीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.”
9 परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “साराय तुझी मालकीण आहे, तू तिच्याकडे घरी परत जा आणि तिच्या आज्ञेत राहा.” 10 परमेश्वराचा दूत आणखी म्हणाला, “तुझ्यापासून इतकी संतती होईल की ती मोजणे शक्य होणार नाहीं.”
11 परमेश्वराचा दूत पुढे आणखी म्हणाला,
“तू आता गरोदर आहेस
आणि तुला मुलगा होईल
त्याचे नांव तू इश्माएल म्हणजे
‘परमेश्वर एकतो’ असे ठेव कारण प्रभूने तुझ्या दु:खविषयी ऐकले आहे; (तो तुझे सहाय्य करील.)
12 इश्माएल जंगली गाढवासारखा रानटी
आणि स्वतंत्र असेल.
तो सर्वाविरुद्द व सर्व त्या विरुद्ध होतील;
तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
आपल्या भावांच्या जवळ तळ देत फिरेल,
परंतु तो त्यांच्या विरुद्व असेल.”
13 परमेश्वर हागारेशी बोलला; हागारेने देवासाठी नवे नाव वापरायला सुरवात केली. ती म्हणाली, "तू मला पाहणारा देव आहेस, कारण मला समजते की या ठिकाणीही देव मला भेटतो व माझी काळजी करतो.” 14 तेव्हा तेथील विहिरीला बैर-लहाय-रोई [a] असे नांव पडले; ती विहीर कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे.
15 हागारेला अब्रामापासून मुलगा झाला; अब्रामाने त्याचे नाव इश्माएल ठेवले.
पेत्र म्हणतो की येशू हा रिव्रस्त आहे(A)
27 मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पै कैसरीयाच्या आसपासच्या खेड्यात गेले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांस विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?”
28 त्यांनी त्याला उत्तर दिले, “काही जण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहा असे म्हणतात.”
29 मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हांला मी कोण आहे असे वाटते?”
पेत्राने उत्तर दिले, “तू रिव्रस्त आहेस.”
30 येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.”
2006 by World Bible Translation Center