Revised Common Lectionary (Semicontinuous)
23 जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24 का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो.
परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही.
परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही.
जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही.
25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले.
त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील.
जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी.
तुमचे ह्रदय सदैव आनंदी राहो.
27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो.
आणि ते परमेश्वराकडे परत येवोत.
सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.
28 का? कारण परमेश्वरच राजा आहे
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन
देवापुढे नतमस्तक झाले आहेत.
तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत
व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील.
लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.
31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत
त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.
हागार दासी
16 अब्राम व त्याची बायको साराय यांना मुलबाळ नव्हते. साराय हिची हागार नावाची एक मिसरी म्हणजे मिसर देशाची एक दासी होती. 2 साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून रोखले आहे तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा, तिच्यापोटी जन्मलेले मूल माझेच मूल आहे असे समजून मी ते स्वीकारीन.” अब्रामाने आपली बायको साराय हिचे म्हणणे मान्य केले.
3 कनान देशात अब्राम दहा वर्षे राहिल्यावर हे झाले आणि सारायने आपली मिसरी मोलकरीण हागार आपला नवरा अब्राम याला बायको म्हणून दिली.
4 हागार अब्रामापासून गरोदर राहिली; आपण गरोदर आहो हे पाहून आपण आपली मालकीण साराय हिच्यापेक्षा अधिक चांगल्या आहो असे हागारेला वाटू लागले व तिला गर्व झाला; 5 परंतु साराय अब्रामाला म्हणाली, “माझी दासी हागार आता मला तुच्छ लेखते; त्या बद्दल मी तुम्हाला दोष देते, कारण मीच स्वतः तिला तुमची उपपत्नी होण्याचा मान दिला म्हणून ती गरोदर राहिली आणि आता ती माझ्यापेक्षा चांगली व विशेष आहे असे तिला वाटू लागले; परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.”
6 परंतु अब्राम सारायला म्हणाला, “तू हागारेची मालकीण आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर.” तेव्हा सारायने तिचा छळ केला म्हणून हागार पळून गेली.
अब्राहामाचे उदाहरण
4 तर मग अब्राहाम जो मानवी रितीने आपला पूर्वज याच्याविषयी आपण काय म्हणावे? 2 जर अब्राहाम आपल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला अभिमान बाळगण्यास जागा आहे, परंतु त्याला देवासमोर अभिमान बाळगणे शक्य नाही. 3 कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला.”
4 जो कोणी काम करतो, त्याला मजुरी ही मेहरबानी म्हणून नव्हे तर त्याचा मोबदला म्हणून दिली जाते. 5 कोणताही मनुष्य कर्मे करुन देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरु शकत नाही. म्हणून त्याने देवावरच भरवंसा ठेवावा. मग देव त्या मनुष्याचा भरवंसा स्वीकारुन त्याला आपल्या दृष्टीने नीतिमान ठरवतो. दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरविणारा देवच आहे. 6 ज्याला देव कर्मावाचून नीतिमान ठरवितो, त्याच्याविषयीही दाविद म्हणतो;
7 “ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे.
ज्याच्या पापांवर पांघरुण घातले आहे
तो धन्य!
8 धन्य तो पुरुष
ज्याच्या पापांचा हिशेब प्रभु करणार नाही.” (A)
9 तर मग हे नीतिमत्व ज्यांची सुंता झाली आहे आणि ज्यांची सुंता झाली नाही अशांनाही लागू होते काय? जे बेसुंती आहेत अशांनाही ते लागू पडते कारण आम्ही म्हणतो, “अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला.” 10 आणि तो कसा गणण्यात आला, तो सुंता झालेला असताना का सुंता झालेली नसताना? 11 सुंता झालेली नसताना ही त्याने जो विश्वास दाखविला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली, यासाठी की, जे सुंता झाली नसताही विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे ते नीतिमत्व गणले जावे. (त्यांचा तो पिता आहे.) 12 आणि तो ज्यांची सुंता झाली आहे त्यांचाही पिता आहे. पण त्यांची सुंता झालेली आहे म्हणून तो त्यांचा पिता झाला नाही, तर आपला पूर्वज अब्राहाम याची सुंता होण्यापूर्वीसुद्धा तो जसा विश्वासात जगत होता, तसे जर ते जगले तरच अब्राहाम त्यांचा पिता होऊ शकतो.
2006 by World Bible Translation Center