Revised Common Lectionary (Semicontinuous)
23 जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या.
इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा.
24 का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो.
परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही.
परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही.
जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही.
25 परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले.
त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन.
26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील.
जे लोक परमेश्वराला शोधत आले, त्यांनी त्याची स्तुती करावी.
तुमचे ह्रदय सदैव आनंदी राहो.
27 दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो.
आणि ते परमेश्वराकडे परत येवोत.
सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत.
28 का? कारण परमेश्वरच राजा आहे
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
29 बलवान व निरोगी लोक भोजन करुन
देवापुढे नतमस्तक झाले आहेत.
तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत
व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
30 आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील.
लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.
31 परमेश्वराने खरोखरच ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत
त्या विषयी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला सांगेल.
देवाचा अब्रामाशी करार
15 या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”
2 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वर देवा, असे काहीही प्रतिफळ नाही की जेणे कडून मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही; म्हणून माझ्या मरणानंतर माझे सर्वकाही दिमिष्कातील माझा गुलाम, अलिएजर यालाच मिळेल.” 3 अब्राम पुढे म्हणाला, “तू मला मुलगा दिला नाहीस म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
4 परमेश्वर अब्रामाशी बोलला, तो म्हणाला, “तुझे सर्वकाही त्या तुझ्या गुलामाला मिळणार नाही; तर तुला मुलगा होईल [a] आणि तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
5 मग देवाने अब्रामाला रात्रीचे आकाश दाखविण्यासाठी बाहेर नेले. देव म्हणाला, “ह्या आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, तुला मोजता येणार नाहीत इतके ते आहेत; येथून पुढच्या काळात तुझी संततीही त्या ताऱ्यांइतकी अगणित होईल.”
6 अब्रामाने देवावर विश्वास ठेवला देवाने त्याची प्रामाणिकांता गणना केली प्रमाणिक जीवन जगण्यास योग्य असा त्याचा विश्वास होता.
12 नंतर त्या दिवशी सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली म्हणून तो झोपला; तो झोपेत असताना अती भयंकर अंधार त्याच्यावर पडला; 13 मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज परक्या देशात राहतील ते तेथे परके असतील, ते तेथे गुलाम होतील आणि 400 वर्षे त्यांचा छळ होईल, त्यांच्यावर जुलूम केला जाईल; 14 परंतु चारशे वर्षानंतर ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राला मी शिक्षा करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील.
15 “तू स्वतः फार म्हातारा होऊन शांतीने मरण पावशील आणि तुझे पूर्वज जेथे पुरलेले आहेत तेथे तुला मूठमाती देतील. 16 मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. त्यावेळी ते येथे राहाणाऱ्या अमोरी लोकांचा पराभव करतील, अमोरी लोकांना शिक्षा करण्यासाठी मी तुझ्या लोकांचा उपयोग करीन. (हे काही काळानंतर घडेल कारण अमोरी लोकांचा दुष्टपणा अद्याप शिगेला पोहोंचला नाहीं.)”
17 सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या धडांच्या दोन दोन अर्ध्या तुकड्यांमधून धुराचा लोट आणि अग्नी निघून गेला.
18 म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले व त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो;
देव लोकांना नीतिमान कसे करतो?
21 परंतु आता देवाची मानवाविषयीची नीतिमत्वाची कृती नियमशास्त्राव्यतिरिक्त प्रगट झाली आहे. त्याला नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. 22 देवाची नीतिमत्त्वाची कृती ही येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आहे आणि जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी दाखविली आहे. त्यात भेदभाव नाही. 23 सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. 24 परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे. 25-26 लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमान आहे हे सिद्ध व्हावे.देवाच्या सहनशीलतेमुळे त्याने हे सिद्ध केले की, या सध्याच्या काळी तो नीतिमान आहे. यासाठी जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो नीतिमान असावा.
27 मग आमच्या बढाई मारण्याचे प्रयोजन काय? ती वगळण्यात आली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर ज्यामध्ये विश्वास आहे, त्याच्या आधारे. 28 कारण आपण असे मानतो की, मनुष्य देवावरील विश्वासाने नियमशास्त्रातील कर्माशिवाय नीतिमान ठरतो. 29 किंवा देव फक्त यहूद्यांचाच आहे काय? तो विदेशी लोकांचा नाही काय? होय, तो विदेशी लोकांचादेखील आहे. 30 ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी तो ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही विश्वासाने नीतिमान ठरवील. 31 तर मग आपण या विश्वासाचा आग्रह धरुन नियमशास्त्र निरर्थक ठरवितो काय? खात्रीने नाही, आपण तर नियमशास्त्राला मान्यता देतो.
2006 by World Bible Translation Center