Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी यदूथून सुरावर आधारलेले आसाफाचे स्तोत्र.
77 मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली,
देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे.
2 माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो.
मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोंचण्याचा प्रयत्न केला.
माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला.
3 मी देवाचा विचार करतो आणि मला काय वाटते ते त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो,
पण मला ते शक्य नाही.
4 तू मला झोपू देत नाहीस, मी काही तरी बोलायचा प्रयत्न केला
पण मी फारच गोंधळलेल्या मनस्थितीत होतो.
5 मी सतत भूतकाळाचा विचार करीत राहिलो.
खूप दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांचा मी विचार करत होतो.
6 रात्री मी माझ्या गाण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो.
मी स्वःतशीच बोलतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
7 मी आश्चर्य करतो, “आमचा प्रभु आपल्याला कायमचा सोडून गेला का?
तो आपल्याला कधी तरी परत घेईल का?
8 देवाचे प्रेम कायमचे नाहीसे झाले का?
तो आपल्याशी कधी तरी परत बोलेल का?
9 देव दयेचा अर्थ विसरला का?
त्याच्या कृपेचे आता रागात परिवर्तन झाले का?”
10 नंतर मी विचार केला, “जी गोष्ट मला राहून राहून खटकते आहे
ती ही सर्वशक्तिमान सर्वोच्च असा देव त्याची शक्ती घालवून बसला आहे का?”
11 परमेश्वराने काय केले ते मला आठवते आहे.
देवा, खूप पूर्वी तू ज्या अद्भूत गोष्टी केल्यास त्या मला आठवतात.
12 तू केलेल्या गोष्टींचा मी विचार केला.
मी त्या गोष्टींबद्दल विचार केला.
13 देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत,
देवा, तुझ्यासारखा महान कोणीही नाही.
14 अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस.
तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस.
15 तू तुझ्या शक्तीने लोकांना वाचवलेस.
तू याकोबाच्या आणि योसेफाच्या वंशजांना वाचवलेस.
16 देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घाबरले,
खोल पाणी भयाने थरथरले.
17 दाट ढगांनी पाणी खाली सोडले,
लोकांनी वरच्या उंच ढगातला गडगडाट ऐकला.
नंतर तुझे विजांचे बाण ढगातून चमकू लागले.
18 तिथे ढगांचा भयानक गडगडाट होत होता.
विजांनी जगाला प्रकाशमय केले होते.
पृथ्वी हलली आणि थरथरली.
19 देवा, तू खोल पाण्यातून चाललास.
तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही.
20 तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने
तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस.
8 पण ईयोब, मी जर तुझ्या जागी असतो तर देवाकडेच गेलो असतो.
त्याला माझे गाऱ्हाणे सांगितले असते.
9 देव ज्या आश्र्चर्यकारक गोष्टी करतो त्या माणसाला समजत नाहीत.
त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
10 देव पृथ्वीवर पाऊस आणतो.
शेतांना पाणी देतो.
11 तो नम्र लोकांना उच्चस्थानी बसवतो
आणि दु:खी जीवांना खूप आनंदी करतो.
12 देव धूर्तांचे कार्य बंद पाडतो
आणि त्यांना सफलता मिळू देत नाही.
13 तो विद्वानांना त्यांच्याच कचाट्यात पकडतो त्यामुळे त्यांचे कार्य सिध्दीस जात नाही.
मसलत फुकट जाते ते दिवसासुध्दा ठेचाळतात.
14 ते धूर्त, भर दिवसासुध्दा अडखळतात.
भर दुपारच्या वेळेला ते आंधळ्यासारखे त्यांचा रस्ता चाचपडत जातात.
15 देव गरीबांना मरणापासून वाचवतो.
त्यांची धूर्ताच्या कचाट्यातून मुक्तता करतो.
16 म्हणूनच गरीबांना आशा वाटते.
देव अन्यायी लोकांना नष्ट करतो.
17 “देव ज्याला चांगल्या मार्गावर आणतो तो नशीबवान होय.
म्हणून सर्वशक्तिमान देवाच्या शिक्षेबद्दल तक्रार करु नकोस.
18 देव त्याने केलेल्या जखमांवर
मलमपट्टी करतो.
तो दुखापत करतो
पण त्याचे हात ती बरी करतात.
19 देव तुला सहा प्रकारच्या संकटांतून तारील.
आणि सात संकटांत तुला काहीही अपाय होणार नाही.
20 दुष्काळात देव
तुला मृत्यूपासून वाचवेल
आणि युध्दातही तो तुझे
मृत्यूपासून रक्षण करेल.
21 लोक त्यांच्या धारदार जिभेने तुझ्याबद्दल वाटेल
ते बोलतील परंतु देव तुझे रक्षण करेल.
जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा
तुला घाबरुन जाण्याची गरज नाही.
22 तू विनाशात व दुष्काळात हसशील.
तुला रानटी पशूंची भीती वाटणार नाही.
23 तू देवाशी करार केला आहेस तेव्हा मैदानातले खडकही तुझ्या या करारात सहभागी आहेत.
रानटी पशूही तुझ्याशी सलोखा करतील.
24 तू शांती व समाधानात राहशील
कारण तुझा तंबू सुरक्षीत आहे.
तू तुझ्या संपत्तीची मोजदाद केलीस तर
तुला त्यात काही कमतरता आढळणार नाही.
25 तुला खूप मुले असतील.
पृथ्वीवर जितकी गवताची पाती आहेत तितकी मुले तुला असतील.
26 हंगामाच्या वेळेपर्यंत वाढणाऱ्या गव्हासारखा तू असशील.
हो तू अगदी म्हातारा होईपर्यंत जगशील.
27 “ईयोब, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे.
म्हणून तू आमचे ऐक. आणि त्यातून स्वतःसाठी काही शिक.”
चांगल्या कामासाठी दु:ख सोसणे
8 शेवटी सारांश हा की, तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने, सहानुभूतीने आपल्या भाऊबहिणींशी प्रेमाने, दयाळूपणे आणि नम्रतेने राहा. 9 वाइटाची परतफेड वाइटाने करु नका, किंवा अपमानाची फेड अपमानाने करु नका. उलट, त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा. कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते. यासाठी की, तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा. 10 पवित्र शास्त्र म्हणते,
“ज्याला जीवनाचा आनंद उपभोगायचा आहे,
व चांगले दिवस पहावयाचे आहेत,
त्याने आपली जीभ वाईट बोलण्यापासून आवरली पाहिजे,
आणि त्याने आपल्या ओठांनी खोट्या गोष्टी बोलू नयेत.
11 दुष्टतेपासून त्याने दूर व्हावे व चांगले ते करावे.
त्याने शांतीचा शोध करुन ती मिळविली पाहिजे
12 जे नीतिमान लोक आहेत त्यांच्यावर प्रभुची नजर असते
आणि त्यांच्या प्रार्थना तो कान देऊन ऐकतो
पण जे वाईट गोष्टी करतात त्यांच्याकडे प्रभु पाठ फिरवितो.” (A)
13 जे चांगले ते करण्यास तुम्ही उत्सुक असाल तर अशी कोण व्यक्ती आहे जी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करील? पण, 14 जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका” [a] 15 पण आपल्या अंतःकरणात ख्रिस्त हा प्रभु आहे असा आदर बाळगा तुमच्यामध्ये जी आशा आहे, तिच्याविषयी तुम्हांला कोणी विचारले तर त्याचे समर्थन करण्यास सदैव तयार राहा. 16 पण हे सौम्यतेने व आदराने करा. ख्रिस्तामध्ये जगत असताना तुमच्या चांगल्या वागणुकीवर जे आरोप करतात त्यांना लाज वाटेल, अशा रीतीने तुम्ही आपली विवेकबुद्धी शुद्ध राखा.
17 कारण चांगले काम करुनदेखील आपण दु:ख सोसावे अशी जर देवाची इच्छा असेल तर वाईट करुन दु:ख भोगण्यापेक्षा ते अधिक चांगले.
18 ख्रिस्तदेखील आपल्या पापांसाठी
एकदाच मरण पावला.
एक नीतिमान दुसऱ्या
अनीतिमानांसाठी मरण पावला.
यासाठी की, तुम्हाला देवाकडे जाता यावे.
त्याच्या आत्म्यासंबंधी म्हटले
तर त्याला पुन्हा जीवन दिले गेले.
2006 by World Bible Translation Center