Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 110:1-4

दावीदाचे एक स्तुतीगीत.

110 परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला,
    “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन.
    माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”

परमेश्वर तुझे राज्य वाढवायला मदत करेल.
    तुझे राज्य सियोनपाशी सुरु होईल आणि ते तू तुझ्या शत्रूंवर त्यांच्या देशात जाऊन राज्य करशील.
तू तुझ्या सैन्याची जमवाजमव करशील
    त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील.
त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील.
    हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील. [a]

परमेश्वराने वचन दिले आहे
    आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही.
“तू सदैव याजक राहिला आहेस
    मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”

निर्गम 19:7-25

तेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला, व त्याने इस्राएल मधील वडिलधाऱ्या माणसांना म्हणजे पुढाऱ्यांना एकत्र बोलावले; परमेश्वराने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या; आणि सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले; ते म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”

मग मोशे पुन्हा पर्वतावर देवाला भेटावयास गेला आणि लोक त्याच्या आज्ञा पाळतील असे त्याने देवाला सांगितले. आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व इस्राएल लोकांना ऐकू जाईल; मी हे ह्यासाठी करीन की त्यामुळे तू सांगितलेल्या सर्व गोष्टीवर ते नेहमी विश्वास ठेवतील.”

मग मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले.

10 परमेश्वर मोशेला म्हणाला, “आज आणि उद्या माझ्या विशेष भेटीसाठी लोकांना पवित्र कर; त्यांनी कपडे स्वच्छ धुवावेत. 11 व तिसऱ्या दिवशी माझ्या भेटीसाठी तयार राहावे कारण तिसऱ्या दिवशी परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल आणि सर्व लोक मला पाहतील. मग मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. 12-13 परंतु लोकांना पर्वतापासून दूर राहाण्यास तू सांग; तेथे तू एक सीमारेषा काढ आणि लोकांनी ती ओलांडू नये असे तू त्यांना बजावून सांग; जर कोणा माणसाचा किंवा जनावराचा पर्वताला स्पर्श झाला तर त्याला दगडाने किंवा बाणाने मारून टाकावे. परंतु त्याला कोणीही स्पर्श करु नये. शिंगाचा आवाज ऐकू येईपर्यंत लोकांनी थांबावे. तो आवाज ऐकल्यावर ते पर्वत चढून जाऊ शकतील.”

14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले.

15 मग मोशे लोकांना म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तो पर्यंत पुरुषांनी स्त्रियांना स्पर्श करु नये.”

16 तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट व गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले. 17 नंतर मोशेने लोकांना छावणीतून बाहेर काढून देवाला भेटावयास पर्वताजवळच्या जागी नेले. 18 सीनाय पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर पर्वतातून वर आला. परमेश्वर पर्वतावर अग्नीतून उतरला म्हणून असे झाले; आणि सर्व सीनाय पर्वत थरथरु लागला. 19 शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. मोशे देवाबरोबर जेंव्हा जेंव्हा बोलला तेंव्हा तेंव्हा देवाने त्याला मेघगर्जनेसारख्या आवाजाने उत्तर दिले.

20 याप्रमाणे परमेश्वर स्वर्गातून सीनाय पर्वताच्या शिखरावर उतरला आणि त्याने मोशेला बोलावून आपल्या बरोबर पर्वताच्या शिखरावर येण्यास सांगितले. तेव्हा मोशे पर्वतावर गेला.

21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग की त्यांनी माझ्याजवळ येऊ नये व माझ्याकडे बघू नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील. 22 तसेच याजक लोकांनाही सांग की माझ्या भेटीस माझ्याजवळ येताना आपणांस पवित्र करून यावे; तसे केले नाही तर मी त्यांना शिक्षा करीन.”

23 मोशेन परमेश्वराला सांगितले, “परंतु लोक पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तू स्वतः आम्हाला एक सीमारेषा आखावयास व लोकांनी ती रेषा ओलाडूंन पवित्र भूमिवर येऊ नये असे सांगितलेस.”

24 परमेश्वर त्याला म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांना इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.”

25 तेव्हा मोशे लोकांकडे खाली गेला व त्याने त्यांना या गोष्टी सांगितल्या.

इब्री लोकांस 2:1-4

आमचे तारण नियमशास्त्रापेक्षा मोठे आहे

त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभुने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center