Revised Common Lectionary (Semicontinuous)
असाफचे स्तोत्र
50 0परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे.
तो पृथ्वीवरील पूर्व व पश्चिमेकडील सर्व लोकांना बोलावतो.
2 सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.
3 आमचा देव येत आहे आणि तो गप्प राहाणार नाही.
त्याच्यासमोर आग लागली आहे.
त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
4 आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला
त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.
5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा.
माझ्या उपासकांनो, या आपण एकमेकाशी करार केला आहे.”
6 देव न्यायाधीश आहे
आणि आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.
यराबामच्या मुलाचा मृत्यू
14 याच सुमारास यराबामचा मुलगा अबीया आजारी पडला. 2 तेव्हा यराबाम आपल्या बायकोला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत. 3 संदेष्ट्याला तू दहा भाकरी, काहीगोड पुऱ्या आणि मधाचा बुधला दे. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.”
4 मग राजाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते. 5 पण परमेश्वराने त्याला सूचना केली, “यराबामची बायको आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येते आहे. तिचा मुलगा फार आजारी आहे.” मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्याला सांगितले.
यराबामची बायको अहीयाच्या घरी आली. लोकांना कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता. 6 अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामची बायको ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे. 7 परत जाशील तेव्हा इस्राएलचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलच्या समस्त प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली. 8 याआधी इस्राएलवर दावीदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे, मनःपूर्वक मलाच अनुसरत असे, मला मान्य असलेल्या गोष्टीच तो करी. 9 पण तुझ्या हातून अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे. 10 तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. आगीत गवताची काडीही शिल्लक राहात नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ उच्छेद करीन. 11 तुझ्या घरातल्या ज्याला गावात मरण येईल त्याला कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे.’”
12 अहीया संदेष्टा मग यराबामच्या बायकोशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, “आता तू घरी परत जा. तू गावात शिरल्याबरोबर तुझा मुलगा मरणार आहे. 13 सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याचे रीतसर दफन होईल असा यराबामच्या घराण्याताला हा एवढाच कारण फक्त त्याच्यावरच इस्राएलचा देव परमेश्वर प्रसन्न आहे. 14 परमेश्वर इस्राएलवर नवीन राजा नेमील. तो यराबामच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लौकरच घडेल. 15 मग परमेश्वर इस्राएलला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांना उपटून परमेश्वर त्यांना युफ्राटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा देवीचे स्तंभ त्यांनी उभारले याचा त्याला संताप आला. 16 आधी यराबामच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांना पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.”
17 यराबामची बायको तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा मुलगा वारला. 18 सर्व इस्राएल लोकांना त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वराच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती.
देवाच्या दयेबद्दल उपकार
12 जो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभुचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू समजले आणि त्याने मला त्याची सेवा करण्यासाठी नियुक्त केले. 13 जरी मी पूर्वी निंदा करणारा, मनस्ताप देणारा आणि हिंसक होतो, तरी माझ्यावर दया दाखविण्यात आली. तोर्पांत मी विश्वासणारा नव्हतो म्हणून अज्ञानामुळे मी तसा वागलो. 14 परंतु विश्वास आणि दया जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभुच्या कृपेने ओसंडून वाहिली.
15 एक विश्वसनीय वचन आहे जे स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास या जगात आला. मी त्या पाप्यातील पहिला आहे. 16 परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली, यासाठी की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्याच्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळावे. 17 आता अनंतकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला माहिमा आणि गौरव अनंतकाळासाठी असो. आमेन.
18 तिमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवीत आहे. यासाठी की सुयुद्ध करण्यात तिचा उपयोग करता यावा. 19 तुम्हांला विश्वास आणि चांगला विवेक असावा. कित्येकांनी चांगला विवेक नाकारुन विश्वास तारवाप्रमाणे उद्ध्वस्त केला आहे. 20 त्यात हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, देवाविरुद्ध न बोलण्याविषयी त्यांनी शिकावे.
2006 by World Bible Translation Center