Revised Common Lectionary (Semicontinuous)
असाफचे स्तोत्र
50 0परमेश्वर, देवांचा देव बोलला आहे.
तो पृथ्वीवरील पूर्व व पश्चिमेकडील सर्व लोकांना बोलावतो.
2 सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.
3 आमचा देव येत आहे आणि तो गप्प राहाणार नाही.
त्याच्यासमोर आग लागली आहे.
त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.
4 आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला
त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.
5 देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा.
माझ्या उपासकांनो, या आपण एकमेकाशी करार केला आहे.”
6 देव न्यायाधीश आहे
आणि आकाश त्याच्या चांगुलपणा विषयी सांगत असते.
26 नबाट याचा मुलगा यराबाम हा शलमोनाचा एक सेवक. हा एफ्राईम घराण्यातला असून सरेदा नगरातील होता. याच्या आईचे नाव सरुवा. त्याचे वडील वारले होते. हा यराबाम पुढे राजाच्या विरुध्द गेला.
27 त्याची कथा अशी. मिल्लोचे बांधकाम आणि दावीदनगराच्या तटबंदीला पडलेली खिंडारे बुजवण्याचे काम शलमोन करुन घेत होता. 28 यराबाम हा अंगापिडाने मजबूत होता. हा या कामाला चांगला असल्याचे शलमोनाने हेरले आणि त्याला योसेफ घराण्यातील कामगारांचा अधीक्षक म्हणून नेमले. 29 एकदा यराबाम यरुशलेमच्या बाहेर गेला होता. तेव्हा त्याला शिलो येथील अहीया नावाचा संदेष्टा वाटेत भेटला. अहीयाने नवीन अंगरखा घातला होता. या दोघांखेरीज तेव्हा त्या भागात आणखीकोणी नव्हते.
30 अहीयाने आपला अंगरखा काढला आणि त्याचे फाडून बारा तुकडे केले.
31 मग अहीया यराबामला म्हणाला, “यातले दहा तुकडे तू स्वतःजवळ ठेव. इस्राएलचा देव परमेश्वर याने सांगितले आहे ‘शलमोनाच्या हातातून राज्य काढून घेऊन त्यातील दहा वंशाचा अधिकार मी तुला देईन. 32 आणि दावीदाच्या घराण्यात फक्त एकाच वंशाची मालकी शिल्लक ठेवीन. माझा सेवक दावीद आणि हे यरुशलेम नगर यांच्या खातर मी एवढे करीन. इस्राएलच्या सर्व वंशांतून मी यरुशलेम नगराची निवड केली आहे. 33 शलमोनाने माझा त्याग केला म्हणून मी त्याच्याकडून राज्य काढून घेणार आहे. सिदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबचा कमोश, अम्मोन्यांचा मिलकोम या खोट्यानाट्या दैवतांचे तो भजनपूजन करतो. जे योग्य आणि न्याय्य ते आता तो करत नाही. माझ्या आज्ञा आणि नियम तो पाळत नाही. त्याचे वडील दावीद ज्या पध्दतीने जगले तसे याचे नाही. 34 तेव्हा आता त्याच्या घराण्यातून मी सत्ता काढून घेत आहे. मात्र शलमोन जिवंत असेपर्यंत तोच गादीवर राहील. माझा सेवक दावीद याच्या लोभाखातर मी एवढे करीन. माझे सर्व नियम आणि आज्ञा दावीदने पाळल्या म्हणून मी त्याला निवडले. 35 पण त्याच्या मुलाच्या हातून मी राज्य काढून घेणार आहे आणि यराबाम, दहा घराण्यावरील सत्ता मी तुझ्या हाती सोपवीन. 36 शलमोनाच्या मुलाची एका वंशावरील सत्ता तशीच अबाधित ठेवीन. म्हणजे यरुशलेममध्ये माझा सेवक दावीद याचा वंशजच सतत राज्य करील. यरुशलेम हे नगर मी आपले स्वतःचे म्हणून निवडले. 37 बाकी तुला हवे तेथे तू राज्य करशील. सर्व इस्राएलवर तुझी सत्ता चालेल. 38 माझ्या आज्ञांचे पालन करत तू योग्य मार्गाने आयुष्य घालवलेस तर मी हे तुला देईन. दावीदाप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा आणि नियम पाळलेस तर माझी तुला साथ असेल. दावीदा प्रमाणेच तुझ्याही घराण्याला मी राजघराणे करीन. इस्राएल तुला देईन. 39 शलमोनाच्या वर्तणुकीची शिक्षा मी त्याच्या मुलांना करीन. पण काही काळापुरती, सर्वकाळ नव्हे.’”
शलमोनाचा मृत्यू
40 शलमोनाने यराबामच्या वधाचा प्रयत्न केला. पण यराबामने मिसरला पलायन केले. मिसरचा राजा शिशक याच्याकडे तो गेला. शलमोनाच्या मृत्यूपर्यंत यराबाम तिथेच राहिला.
त्रोवस येथील पौलाची काळजी
12 जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर, 13 माझा भाऊ तीत मला तेथे सापडला नाही, म्हणून माझ्या आत्म्याचे सामाधान झाले नाही. पण तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास गेलो.
14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हांला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्धारे सगळीकडे पसरवितो. 15 कारण आम्ही, जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. 16 हरवलेल्यांसाठी आम्ही मरणाचा वास आहोत तर जे तारले गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे? 17 इतरांसारखे आम्ही फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करीत नाही. याउलट ख्रिस्तामध्ये देवासमोर आम्ही देवाने पाठविलेल्या माणसांसारखे प्रामाणिकपणे बोलतो.
2006 by World Bible Translation Center