Revised Common Lectionary (Semicontinuous)
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील
तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील.
तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात.
त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील.
देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक
पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल.
देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
18 पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव
आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
19 परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील.
परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील.
20 आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल.
ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.
21 नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील.
ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.
22 सगळी राष्ट्रे एकत्र येतील राज्ये
परमेश्वराची एकत्र सेवा करतील.
23 मला माझ्या शक्तीने दगा दिला.
माझे आयुष्य कमी झाले.
24 म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस.
देवा, तू कायमचाच जगणार आहेस!
25 तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस.
तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.
26 जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील.
ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि
कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.
27 पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस.
तू सर्वकाळ राहाशील.
28 आज आम्ही तुझे सेवक आहोत.
आमची मुले इथे राहातील
आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”
ईयोब अलीफजला उत्तर देतो
6 नंतर ईयोबाने उत्तर दिले:
2 “जर माझ्या दु:खाचे वजन करता आले आणि माझ्या कष्टांना वजनाच्या काट्यात तोलता आले
तर तुम्ही माझ्या दु:खाची कल्पना करु शकाल.
3 माझे दु:ख समुद्रातल्या वाळूपेक्षा जड आहे.
म्हणूनच मी मूर्खासारखी बडबड करतो असे वाटते.
4 त्या सर्वशक्तीमान देवाचे बाण माझ्यात आहेत.
माझ्या आत्म्याला त्या बाणांच्या विषाची जाणीव होते.
देवाची भयानक शस्त्रे माझ्या विरुध्द सज्ज आहेत.
5 काहीही वाईट घडलेले नसते तेव्हा तुझे शब्द सहजपणे बोलता येतात.
रानटी गाढवसुध्दा खायला गवत असले की कसली तक्रार करीत नाही.
आणि गायसुध्दा तिला तिचा चारा मिळाला की मुकाट असते.
6 अन्न मिठाशिवाय चांगले लागत नाही
आणि अंड्यातल्या पांढऱ्या भागाला काही चव नसते.
7 मी त्याला स्पर्शही करु शकत नाही.
तसल्या बेचव अन्नाची मला शिसारी येते.
तुमचे शब्दही मला आता
तसेच वाटायला लागले आहेत.
8 “मी जे मागेन ते मला मिळायला पाहिजे असे मला वाटते.
मला जे हवे ते देवाने द्यायला पाहिजे असे मला वाटते.
9 मला देवाच्या हातून मरण हवे.
त्याने मला चिरडून टाकावे.
10 आणि जेव्हा तो मला मारेल तेव्हा मला एका गोष्टीचे समाधान मिळेल,
एका गोष्टीबद्दल मी आनंदी असेन,
या सगळ्या दु:खातही मी पवित्र परमेश्वराच्या आज्ञेचा कधीही भंग केला नाही.
11 “माझी शक्ती आता संपली आहे, त्यामुळे जगण्याची इच्छा माझ्यात नाही.
माझे काय होणार आहे याची मला काहीच कल्पना नाही.
त्यामुळे ज्याच्यासाठी धीर धरावा असे काही कारण उरलेले नाही.
12 मी पाषाणासारखा शक्तीमान नाही.
माझे शरीर पितळेचे बनलेले नाही.
13 आता स्वतःला सावरायची ताकद माझ्यात नाही.
का? कारण यश माझ्यापासून हिरावून घेण्यात आले आहे.
पुष्कळ लोक येशूच्या मागे जातात
7 येशू आपल्या शिष्यांसह गालील सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीयातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. 8 कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व यरुशलेम, इदूमिया, यार्देनेच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सीदोनच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशूकडे आला.
9 मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांस एक छोटी होडी आणावयास सांगितली, 10 त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पूढे रेटीत होते. 11 जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” 12 पण त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की, मला प्रगट करू नका.
2006 by World Bible Translation Center