Revised Common Lectionary (Semicontinuous)
12 पण परमेश्वरा, तू सदैव असशील
तुझे नाव सदा सर्वकाळ राहील.
13 तू उंच जाशील आणि सियोन पर्वताचे सांत्वन करशील.
तू सियोनला दया दाखवण्याची वेळ आता आली आहे.
14 तुझ्या सेवकांना सियोनचे दगड आवडतात.
त्यांना त्या शहराची धूळपण आवडते.
15 लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील.
देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील.
16 परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक
पुन्हा त्याचे गौरव बघतील.
17 देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल.
देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
18 पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव
आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
19 परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील.
परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील.
20 आणि तो कैद्यांची प्रार्थना ऐकेल.
ज्यांना मृत्युदंड झाला आहे त्यांना तो सोडवेल.
21 नंतर सियोनमधले लोक परमेश्वराबद्दल सांगतील.
ते यरुशलेममध्ये त्याच्या नावाची स्तुती करतील.
22 सगळी राष्ट्रे एकत्र येतील राज्ये
परमेश्वराची एकत्र सेवा करतील.
23 मला माझ्या शक्तीने दगा दिला.
माझे आयुष्य कमी झाले.
24 म्हणून मी म्हणालो, “मला तरुणपणी मरु देऊ नकोस.
देवा, तू कायमचाच जगणार आहेस!
25 तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस.
तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस.
26 जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील.
ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि
कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील.
27 पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस.
तू सर्वकाळ राहाशील.
28 आज आम्ही तुझे सेवक आहोत.
आमची मुले इथे राहातील
आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”
शूनेममधली बाई अलीशाला एक खोली देते
8 एकदा अलीशा शूनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहात होती. तिने अलीशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलीशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवणासाठी मुक्काम करत असे.
9 एकदा ही बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, “पाहा आपल्या इथे नेहमी येतो तो अलीशा परमेश्वराचा पवित्र माणूस आहे, तो नेहमी आपल्या घरावरुन जातो. 10 तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या आणि एक पलंग, एक टेबल खुर्ची आणि दिव्याची सोय पण करु. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्याला उतरायला ही खोली होईल.”
11 मग एके दिवशी अलीशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला. 12 अलीशाने तेव्हा आपला सेवक गेहजी याला त्या शूनेमच्या बाईला बोलावून आणायला सांगितले.
त्याप्रमाणे गेहजीने त्या बाईला बोलावले. ती येऊन अलीशा पुढे उभी राहिली. 13 अलीशा आपल्या नोकराला म्हणाला, तिला सांग, “तू आमची चांगली बडदास्त ठेवली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करु? राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का?”
ती बाई म्हणाली, “मी सुखासमाधानाने माझ्या माणसांमध्ये राहात आहे.”
14 अलीशा गेहजीला म्हणाला, “आपण तिच्यासाठी काय करु शकतो?”
गेहजी म्हणाला, “मला माहीत आहे की तिला मूलबाळ नाही आणि तिचा नवरा वृध्द आहे.”
15 मग अलीशा म्हणाला, “बोलाव तिला”
गेहजीने पुन्हा तिला बोलावले ती येऊन दाराशी उभी राहिली. 16 अलीशा तिला म्हणाला, “पुढील वसंत ऋतुत याच सुमारास तू आपल्या पोटच्या मुलाला कुशीत घेऊन बसलेली असशील.”
ती म्हणाली, “नाही, माझे स्वामी, तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.”
शूनेमच्या बाईला मुलगा होतो
17 या बाईला दिवस राहिले. अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंतात तिने एका मुलाला जन्म दिला.
शूनेमच्या बाईचे मूल जगते
32 अलीशा घरात आला. ते मूल त्याच्या अंथरुणावर मृतावस्थेत पडले होते. 33 अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघंच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली. 34 अलीशा पलंगाजवळ आला आणि मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर टेकवले. आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलीशाने त्याला अंगाशी घेतल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली.
35 अलीशा मग खोलीतून बाहेर पडला आणि घरातल्या घरात एक चक्कर मारली. मग पुन्हा खोलीत शिरुन मुलाच्या अंगावर पालथा पडला. मुलाला एकापाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले.
36 अलीशाने गेहजीला हाक मारुन त्या शूनेमच्या बाईला बोलवायला सांगितले.
गेहजीने तिला तसे सांगितल्यावर ती अलीशासमोर येऊन उभी राहिली. अलीशा तिला म्हणाला, “घे आता मुलाला उचलून.”
37 यावर त्या शूनेमच्या बाईने खोलीत शिरुन अलीशाचे पाय धरले, मुलाला उचलून घेतले आणि बाहेर आली.
इकुन्या येथे पौल व बर्णबा
14 पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले. ते तेथील यहूदी सभास्थानात गेले. (प्रत्येक शहरात गेल्यावर ते असेच करीत) तेथील लोकांशी ते बोलले. पौल व बर्णबा इतके चांगले बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला. 2 परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी यहूदीतर लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली.
3 म्हणून पौल व बर्णबाने त्या ठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला. आणि धैर्याने येशूविषयी सांगत राहीले. पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी संदेश दिला. देवाने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अदूभुत कृत्ये करण्यास मदत करुन ते जे काही सांगत होते ते खरे ठरविले. 4 परंतु शहरातील काही लोकांना यहूदी लोकांची मते पटली. दुसऱ्या लोकांना पौल व बर्णबाचे म्हणणे पटले. (त्यानी विश्वास ठेवला) त्यामुळे शहरात दोन तट पडले.
5 काही यहूदीतर लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करुन मारावयाचे होते. 6 जेव्हा पौल व बर्णबा यांना त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुस्त्र व दर्बे या लुकवनियाच्या नगरात गेले. आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले. 7 त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी सुवार्ता सांगितली.
2006 by World Bible Translation Center