Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यशया 40:21-31

21 तुम्हाला सत्य नक्कीच माहीत आहे.
    नाही का? तुम्ही नक्कीच त्याबद्दल ऐकले आहे.
    फार पूर्वी नक्कीच कोणीतरी तुम्हाला ते सांगितले आहे.
    ही पृथ्वी कोणी निर्मिली हे तुम्ही जाणता.
22 परमेश्वरच खरा देव आहे तो पृथ्वीगोलावर स्थानापन्न होतो.
    त्याच्या तुलनेत लोक म्हणजे नाकतोडे आहेत.
त्याने कापडाच्या गुंडाळीप्रमाणे आकाश उलगडून उघडले.
    आकाशाखाली बसण्यासाठी त्याने ते तंबूच्या कनातीप्रमाणे ताणले.
23 तो अधिपतींना निरूपयोगी करतो
    आणि जगातील न्यायाधीशांना पूर्णपणे कवडीमोल ठरवितो.
24 ते राजे (अधिपती) रोपट्यांप्रमाणे आहेत.
    जमिनीत लावल्यावर ती रूजायच्या आधीच
देवाच्या जोरदार वाऱ्याने ती “रोपटी” सुकतात
    आणि मरतात व वारा
    त्यांना गवताच्या काडीप्रमाणे दूर उडवून देतो.
25 पवित्र देव म्हणतो, “तुम्ही माझी तुलना कोणाशी करू शकता का?
    नाही. कोणीही माझ्या बरोबरीचे नाही.”

26 आकाशाकडे पाहा.
    हे तारे कोणी निर्मिले?
    ही आकाशातील “सेना” कोणाची निर्मिती आहे.
    प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो?
खरा देव फार बलवान व सामर्थ्यवान आहे.
    म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही.

27 याकोब, हे खरे आहे इस्राएल,
    तू ह्यावर विश्वास ठेवावा.
मग तुम्ही “मी कसा जगतो हे परमेश्वराला दिसू शकत नाही.
    देव मला शोधून शिक्षा करणार नाही.
    असे का म्हणता?”

28 परमेश्वर देव फार सुज्ञ आहे,
    हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे व तुम्हाला ते माहीतही आहे.
देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही.
    परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही.
जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली.
    परमेश्वर चिरंजीव आहे.
29 परमेश्वर दुबळ्यांना सबळ व्हायला मदत करतो.
    तो लोकांना शक्तीशिवाय सामर्थ्यवान होण्यास कारणीभूत होतो.
30 तरूण माणसे थकतात आणि त्यांना विश्रांतीची गरज वाटते.
    लहान मुलेसुध्दा अडखळतात आणि पडतात.
31 पण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, ज्याप्रमाणे गरूड पंख पसरून वर उडतात,
    त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात.
    ही माणसे न दमता धावतात व न थकता चालतात.

स्तोत्रसंहिता 147:1-11

147 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
    आपल्या देवाचे गुणगान करा.
    त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे.
परमेश्वराने यरुशलेम बांधले,
    इस्राएलाच्या ज्या लोकांना कैदी म्हणून नेले होते.
    त्यांना देवाने परत आणले.
देव त्यांच्या विदीर्ण ह्रदयावर फुंकर घालतो
    आणि त्यांच्या जखमांना मलम पट्टी करतो.
देव तारे मोजतो आणि
    त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते.
आपला प्रभु खूप मोठा आहे.
    तो फार शक्तीवान आहे.
    त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.
परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो.
    परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.
परमेश्वराला धन्यावाद द्या.
    आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा.
देव ढगांनी आकाश भरुन टाकतो.
    देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो.
    देव डोंगरावर गवत उगवतो.
देव प्राण्यांना अन्न देतो,
    देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो.
10 युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक
    त्याला आनंद देत नाहीत.
11 जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो.
    जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.

स्तोत्रसंहिता 147:20

20 देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही.
    देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत.

परमेश्वराची स्तुती करा.

1 करिंथकरांस 9:16-23

16 कारण जर मी सुवार्ता गाजवितो, तर मला अभिमान बाळगण्याचे काही कारण नाही, कारण मला ते करणे आवश्यक आहे. आणि जर मी सुवार्ता गाजविली नाही तर माझ्यासाठी ते किती वाईट असेल! 17 कारण जर मी हे स्वेच्छेने करतो तर मी बक्षिसास पात्र आहे, पण जर एखादे कार्य माझ्यावर सोपविले आहे जे माझ्या आवडीने नव्हे 18 तर माझे बक्षीस कोणते? ते हे की मी फुकट सुवार्ता सांगावी यासाठी की, सुवार्ता सांगत असताना मी वेतन मिळण्याच्या अधिकाराचा पूर्ण उपयोग करु नये.

19 कारण, जरी मी सर्व लोकांपासून मुक्त असलो तरी मी स्वतःला सर्व लोकांचा गुलाम करुन घेतले आहे. 20 यासाठी की, मी अधिक मिळवावे. यहूदी लोकांना जिंकण्यासाठी यहूदी लोकांसाठी मी यहूदी झालो. जे नियमशास्त्राधीन आहेत त्यांच्यासाठी 21 मी नियम शास्त्राधीन असणाऱ्या लोकांसारखा झालो. (जरी मी नियमशास्त्राधीन नाही तरी तसा झालो). यासाठी की जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना मी नियमशास्त्रविरहीत असा झालो. (जरी मी देवाच्या नियमशास्त्राशिवाय नाही) तरी मी ख्रिस्ताच्या नियमाधीन आहे. यासाठी की, जे नियमशास्त्रविरहीत आहेत त्यांना जिंकता यावे. 22-23 जे दुर्बल आहेत त्यांच्यासाठी मी दुर्बल झालो यासाठी की दुर्बलांना मला जिंकता यावे. मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे यासाठी की त्या आशीर्वादाचा वाटेकरी मला होता यावे.

मार्क 1:29-39

येशू पुष्कळ लोकांना बरे करतो(A)

29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले. 30 शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. 31 तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले. आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली.

32 संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भुतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले. 33 तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले. 34 त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भुते काढली. पण त्याने भुतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती.

येशू लोकांना सुवार्ता सांगण्याची तयारी करतो(B)

35 अगदी पहाटेच अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली. 36 शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते, 37 आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहेत.”

38 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल. कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे.” 39 मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center