Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
35 परमेश्वरा माझ्या लढाया लढ.
माझे युध्द कर.
2 परमेश्वरा ढाल आणि साऱ्या शरीराचे रक्षण करणारी मोठी ढाल उचल.
ऊठ आणि मला मदत कर.
3 भाला आणि भाल्यासारखे दिसणारे शस्त्र यांनी
माझा पाठलाग करणाऱ्या लोकांशी लढ
परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.”
4 काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत
त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर.
त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते
लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत.
त्यांना गोंधळात अडचणीत टाक.
5 त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव.
परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे.
6 परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे.
परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करु दे.
7 मी काहीही चूक केली नाही तरी
त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
8 म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे.
त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे.
एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.
9 नंतर मी परमेश्वराचा आनंद लुटीन.
त्याने माझे रक्षण केले की मी आनंदी होईन.
10 माझी सर्व हाडे म्हणतील,
“परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा,
तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस.
तू सामर्थ्यवानां पासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय लोकांना देतोस.”
बाबेलमधील यहूदी कैद्यांना पत्र
29 बाबेलमध्ये राहणाऱ्या यहूदी कैद्यांना यिर्मयाने एक पत्र पाठविले. त्यांने ते पत्र वडीलधारी (नेते) याजक, संदेष्टे आणि बाबेलमध्ये राहणाऱ्या इतर सर्व लोकांना पाठविले. ह्या सर्वजणांना नबुखद्नेस्सरने यरुशलेममधून बाबेलला आणले होते. 2 (राजा यकन्या, राजमाता, अधिकारी, यहूदाचे व यरुशलेमचे नेते, सुतार व लोहार ह्यांना यरुशलेममधून नेल्यावर यिर्मयाने हे पत्र पाठविले) 3 सिद्कीयाने एलासा व गमऱ्या यांना नबुखद्नेस्सर राजाकडे पाठविले. सिद्कीया यहूदाचा राजा होता. एलासा शाफानचा व गमऱ्या हिल्कीयाचा मुलगा होता, यिर्मयाने, बाबेलला नेण्यासाठी, या दोघांजवळ, पत्र दिले. पत्रातील मजकूर असा होता.
4 यरुशलेममधून कैद करुन ज्या लोकांना यरुशलेमहून बाबेलला नेले आहे त्या सर्व लोकांना सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव असे सांगतो 5 “घरे बांधून त्यात राहा. तेथे वस्ती करा बागा लावा आणि तुम्ही पिकविलेले खा. 6 लग्न करा. तुम्हाला मुलेबाळे होऊ द्या. तुमच्या मुलांचीही लग्ने होऊ द्या. म्हणजे त्यांनाही संतती होईल. तुम्हाला खूप संतती होऊ द्या. तुमची संख्या बाबेलमध्ये वाढू द्या. तुम्ही अल्पसंख्यक राहून नका. 7 मी तुम्हाला ज्या शहरांत पाठविले आहे, त्या शहरांचा फायदा करा. तुम्ही राहत असलेल्या शहराच्या भल्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. का? कारण त्या शहरात शांतता नांदत असेल तर तुम्हालाही शांती मिळेल.” 8 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “तुमचे संदेष्टे आणि जादू करणारे लोक ह्यांच्याकडून फसू नका. त्यांना पडलेली स्वप्ने ऐकू नका. 9 ते खोटा उपदेश करीत आहेत, व तो संदेश असून तो मी पाठविल्याचे सांगत आहेत. पण मी त्यांना पाठविलेला नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
10 परमेश्वर असे म्हणतो, “सत्तर वर्षापर्यंत बाबेल सामर्थ्यशाली राहील. त्यानंतर बाबेलमध्ये राहणाऱ्या तुम्हा लोकांकडे मी येईन. तुम्हाला यरुशलेमला परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन. 11 तुमच्याविषयीच्या योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो.” हा परमेश्वराचा संदेश आहे “तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दु:खविण्याचा माझा बेत नाही. तुम्हाला आशा आणि उज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. 12 मग तुम्ही माझा धावा कराल. माझ्याकडे याल. माझी प्रार्थना कराल. मग मी तुमच्या हाकेला ओ देईन. 13 तुम्ही मला शोधाल आणि तुम्ही जेव्हा मनापासून मला शोधाल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन. 14 मी स्वतःला तुमच्याकडून सापडवून घेईल.” हा परमेश्वराचा संदेश आहे “मी तुमची कैदेतून सुटका करीन. मी तुम्हाला ही जागा सोडायला लावली आता मी तुम्हाला ज्या ज्या राष्ट्रांत आणि प्रदेशात पाठविले होते तेथून गोळा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “आणि जेथून तुम्हाला मी कैदी म्हणून पकडून दूर नेण्यास भाग पाडले होते त्या जागी परत आणीन.”
येशू दुष्ट आत्मा लागलेल्या मनुष्याला बरे करतो(A)
5 मग ते सरोवराच्या पलीकडच्या बाजूच्या गरसेकरांच्या देशात आले आणि तो नावेतून उतरला तेव्हा 2 लगेच एक दुष्ट आत्मा लागलेला मनुष्य स्मशानातून निघून त्याच्याकडे आला. 3 हा मनुष्य कबरेमध्ये राहत असे. आणि कोणीही त्याला साखळदंडानी सुद्धा बांधून ठेवू शकत नव्हते. 4 कारण पुष्कळदा त्याच्या पायात बेड्या घालून साखळ्यांनी बांधलेले असतानाही त्याने साखळ्या तोडल्या आणि बेड्यांचे तुकडे केले. कोणीही त्याला काबूत आणू शकत नव्हते. 5 तो रात्रंदिवस कबरांतून आणि डोंगरातून मोठ्याने ओरडत असे आणि दगडांनी स्वतःस ठेचून घेत असे.
6 त्याने य़ेशूला दुरून पाहिले तेव्हा तो येशूकडे धावत आला आणि त्याच्यापुढे पडून त्याने त्याला नमन केले. 7 व तो मोठ्याने ओरडून काय पाहिजे? मी तुला देवाची शपथ घालून विनवितो की, “मला छळू नकोस.” 8 (कारण येशू त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून नीघ.”)
9 मग येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?”
तो मनुष्य येशूला म्हणाला, “माझे नाव सैन्य [a] आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.” 10 त्यांना या हद्दीतून घालवू नये म्हणून. तो मनुष्य येशूला पुन्हा पुन्हा विनवीत होता.
11 तेथे डोंगराच्या कडेला डूकारांचा एक मोठा कळप चरत होता. 12 मग त्या दुष्ट आत्म्याने येशूला विनंति केली आणि म्हणाला, “आम्हांला त्या डुकरांत पाठव म्हणजे आम्ही त्यांच्यात शिरू.” 13 मग त्याने त्यांना तसे करण्यास परवानगी दिली. मग दुष्ट आत्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि त्या डुकरांत शिरले. मग तो दोन हजारांचा कळप टेकडीवरून पळत खाली जाऊन सरोवरात पडला व बुडून मेला.
14 त्या कळापाची राखण करणारे लोक दूर पळून गेले व त्यांनी ही बातमी गावात व शेतात सांगितली, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक तेथे आले. 15 ते येशूकडे आले आणि त्यांनी त्या भूतग्रस्ताला तेथे बसलेले पाहिले. त्याने कपडे घातले होते. तो शुद्धीवर आलेला व ज्याला सैन्य नावाच्या भुतांनी पछाडले होते तो तोच होता हे पाहिले तेव्हा त्यांना भीति वाटली. 16 काही लोक तेथे होते व त्यांनी येशूने काय केले हे पाहिले होते, त्यांनी ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा होता त्याच्या बाबतीत काय घडले हे इतरांना सांगितले. 17 मग लोक त्याला आमचा प्रांत सोडून जा असे विनवू लागले.
18 येशू नावेतून जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेल्या मनुष्याने त्याला आपणाबरोबर येऊ द्यावे अशी विनंति केली. 19 पण येशूने त्याला येऊ दिले नाही. तो त्यास म्हणाला, “आपल्या घरी तुझ्या लोकांकडे जा आणि प्रभुने तुझ्यासाठी जे केले ते सर्व सांग. प्रभूने तुझ्यावर कशी दया केली तेही सांग.”
20 मग तो निघाला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले याविषयी दकापलिस येथील लोकांना सागू लागला, तेव्हा सर्व लोकांना आश्चर्च वाटले.
2006 by World Bible Translation Center