Revised Common Lectionary (Semicontinuous)
111 परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात
त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले.
2 परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या
चांगल्या गोष्टी लोकांना हव्या असतात.
3 देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो.
त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
4 परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे
हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
5 देव त्याच्या भक्तांना अन्न देतो.
देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.
6 देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या
त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
7 देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते.
त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
8 देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात.
त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
9 देव आपल्या माणसांना वाचवतो.
देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.
10 शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते.
जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात.
देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
28 मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टिने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
29 “तुम्ही दुसऱ्यांच्या जमिनीवर ताबा मिळवणार आहात. तुमचा देव परमेश्वर तुमच्यासाठी त्यांचा पाडाव करील. तेव्हा तेथील लोकांना हुसकावून तुम्ही तेथे राहाल. 30 एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हालाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. ‘या लोकांनी ज्याप्रकारे पूजा केली तशीच मी आता करतो’ असे मनात आणू नका. 31 तुमचा देव परमेश्वर याच्या बाबतीत तसे करु नका. कारण परमेश्वराला ज्या गोष्टींचा तिटकारा आहे त्या सर्व गोष्टी हे लोक करतात. ते देवाप्रीत्यर्थ आपल्या मुलाबाळांचा होमसुद्धा करतात.
32 “तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यात अधिक उणे करु नका.
पर्गम येथील मंडळीला
12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही:
“ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत, 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझ्या नावात दृढ आहात. अंतिपाच्या काळामध्येसुद्धा माझ्यावर तुमचा असलेला विश्वास तुम्ही नाकारला नाही. अंतिपा माझा विश्वासू साक्षीदार होता. तो तुमच्या शहरात मारला गेला. सैतान जेथे राहतो असे ते तुमचे शहर आहे.
14 “तरीही तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात. बलामाने बालाकाला इस्राएल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकविले. त्या लोकांनी लैंगिक पापे करुन आणि मूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले. 15 त्याचप्रमाणे निकलाईताची शिकवण आचरणारे तुमच्यामध्येसुद्धा काहीजण आहेत. 16 म्हणून पश्चात्ताप करा! नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.
17 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
“जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्या मान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड (खडा) देईन ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईल त्यालाच ते समजेल.
2006 by World Bible Translation Center