Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांसाठी आलामोथ [a] सुरांवर बसवलेले गाणे
46 देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे.
आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमी मदत शोधू शकतो.
2 म्हणून जेव्हा भूकंप होतात
आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही.
3 समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थरथर कापायला लागतात
तेव्हा ही आम्हाला भीती वाटत नाही.
4 एक नदी आहे आणि तिचे ओढे नाले देवाच्या शहरात,
सर्वशक्तिमान देवाच्या सर्वांत पवित्र शहरात सुख-समृध्दी आणतात.
5 देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही
देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल.
6 जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा
ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील.
7 तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या बरोबर आहे.
याकोबाचा देव ही आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे.
8 परमेश्वर ज्या शक्तिशाली गोष्टी करतो त्या बघ,
तो पृथ्वीवर ज्या भयंकर गोष्टी आणतो त्या बघ.
9 परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून
त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.
10 देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या.
मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”
11 तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे.
याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.
देव अब्रामाला बोलावतो
12 परमेश्वर अब्रामाला म्हणाला,
“तू आपला देश, आपले गणगोत
व आपल्या बापाचे घर सोड;
आणि मी दाखवीन त्या देशात जा.
2 मी तुला आशीर्वाद देईन;
तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन;
मी तुझे नाव मोठे करीन,
लोक तुझ्या नावाने
इतरांना आशीर्वाद देतील,
3 जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन,
आणि जे लोक तुला शाप देतील
त्यानां मी शाप देईन.
तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्वलोक आशीर्वादित होतील.”
अब्राम कनान देशात जातो
4 तेव्हा अब्रामाने परमेश्वराची आज्ञा मानली. त्याने हारान सोडले लोट त्याच्या बरोबर गेला. या वेळी अब्राम पंच्याहत्तर वर्षांचा होता. 5 हारान सोडताना तो एकटा नव्हता तर त्याने आपली बायको साराय, पुतण्या लोट आणि हारानमध्ये त्यांनी मिळवलेली मालमत्ता तसेच गुलाम या सर्वांना बरोबर घेऊन त्याने हारान सोडले व तो कनान देशाच्या प्रवासास निघाला आणि कनान देशात आला. 6 अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेम गावाते आला आणि मोरेच्या मोठ्या वृक्षांपर्यंत गेला. याकाळी त्या देशात कनानी लोक राहात होते.
7 परमेश्वर अब्रामास दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या वंशजांना देईन.”
ज्या जागेवर परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले त्या जागी त्याने परमेश्वराची उपासना करण्यासाठी एक वेदी बांधली. 8 मग अब्राम तेथून निघाला आणि प्रवास करीत तो बेथेलच्या पूर्वेस डोंगराळ भागात पोहोंचला व त्याने तेथे तळ दिला; तेथून बेथेल पश्चिमेस होते आणि आय शहर पूर्वेस होते; तेथे त्याने परमेश्वरासाठी दुसरी वेदी बांधली आणि देवाची उपासना केली. 9 त्यानंतर अब्राम पुन्हा पुढच्या प्रवासास निघाला व नेगेबकडे गेला.
देवाने पाचारण केल्याप्रमाणे राहा
17 फक्त, देवाने प्रत्येकाला जसे नेमले आहे आणि देवाने जसे प्रत्येकाला पाचारण केले आहे त्याप्रमाणे त्याने राहावे. आणि अशी मी सर्व मंडळ्यांना आज्ञा करतो. 18 एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता न झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये. 19 सुंता म्हणजे काही नाही व सुंता न होणे म्हणजेही काही नाही. तर देवाची आज्ञा पाळणे यात सर्व काही आहे. 20 प्रत्येकाने ज्या स्थितीत त्याला पाचारण झाले त्या स्थितीत राहावे. 21 तुला गुलाम म्हणून पाचारण झाले होते काय? त्यामुळे तुला त्रास होऊ नये, परंतु तुला स्वतंत्र होणे शक्य असेल तर पुढे हो व संधीचा उपयोग करुन घे. 22 कारण जो कोणी प्रभुमध्ये गुलाम असा पाचारण केलेला होता तो देवाचा मुक्त केलेला मनुष्य आहे, त्याचप्रमाणे ज्या मुक्त मनुष्याला देवाचे पाचारण झाले आहे तो देवाचा गुलाम आहे. 23 तुम्हांला किंमत देऊन विकत घेतले होते. मनुष्यांचे गुलाम होऊ नका. 24 बंधूनो, तुम्हांतील प्रत्येकाने ज्या स्थितीत त्याला पाचारण झाले होते, त्याच स्थितीत त्याने देवासमोर राहावे.
2006 by World Bible Translation Center