Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 86

दावीदाची प्रार्थना

86 मी गरीब, असहाय्य माणूस आहे.
    परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
परमेश्वरा मी तुझा भक्त आहे.
    कृपा करुन माझे रक्षण कर.
मी तुझा सेवक आहे.
    तू माझा देव आहेस.
माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला वाचव.
माझ्या प्रभु, माझ्यावर दया कर
    मी दिवसभर तुझी प्रार्थना करीत आहे.
प्रभु, माझे जीवन तुझ्या हाती दिले आहे.
    मला सुखी कर, मी तुझा सेवक आहे.
प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस.
    तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
    दयेसाठी माझी प्रार्थना ऐक.
परमेश्वरा, मी तुझी संकट काळात प्रार्थना करीत आहे.
    तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे.
देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही.
    तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही.
प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत.
    ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.
10 देवा, तू महान आहेस.
    तू अद्भुत गोष्टी करतोस.
    तू आणि फक्त तूच देव आहेस.
11 परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव.
    मी जगेन व तुझी सत्ये पाळीन.
तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली
    सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर.
12 देवा, माझ्या प्रभु मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो.
    मी तुझ्या नावाला सदैव मान देईन.
13 देवा, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे
    तू माझे मृत्यूलोकापासून रक्षण करतोस.
14 गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात.
    देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे
    आणि ते लोक तुला मान देत नाहीत.
15 प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस.
    तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस.
16 देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव.
    तू माझ्यावर दया कर.
मी तुझा दास आहे.
    मला शक्ती दे.
    मी तुझा सेवक आहे मला वाचव.
17 देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव.
    माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील.
    तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.

1 शमुवेल 15:10-31

शमुवेल शौलला त्याच्या पापांची जाणीव करुन देतो

10 यानंतर शमुवेलला परमेश्वरा कडून संदेश आला. 11 परमेश्वर त्याला म्हणाला, “शौला आता मला अनुसरत नाही. त्याला राजा केले याचे मला दु:ख होते. माझ्या सांगण्याप्रमाणे तो आता वागत नाही.” शमुवेलला हे ऐकून फार खेद वाटला. रात्रभर त्याने अश्रू ढाळत परमेश्वराची प्रार्थना केली.

12 दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून तो शौलला भेटायला गेला. पण तिथे गेल्यावर त्याला कळले की शौल यहूदातील कर्मेल येथे गेला आहे. तिथे स्वतःच्या सन्मानार्थ एक दगडी स्तंभ उभारुन अनेक गावे फिरुन तो गिलगाल येथे येणार आहे.

तेव्हा शौल होता त्या ठिकाणी शमुवेल गेला. तिथे अमालेक्याच्या लुटीतील पहिला भाग परमेश्वरासाठी शौलने नुकताच यज्ञात अर्पण केला होता. 13 शमुवेल शौलजवळ पोचला तेव्हा शौलने त्याला अभिवादन केले. तो म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो. मी परमेश्वराच्या आज्ञेत आहे.” 14 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मग मला हा कसला आवाज ऐकायला येत आहे? शेरडामेंढरांचे केकारणे आणि गुरांचे हंबरणे याचा अर्थ काय?” 15 शौल म्हणाला, “सैनिकांनी ती गुरे अमालेक्यांकडून लुटीत आणली आहेत. प्रभु परमेश्वरासाठी यज्ञ अर्पण करायला म्हणून त्यांनी उत्तमोत्तम गुरेमेंढरे बाजूला ठेवली आहेत. बाकीच्या सगळ्याचा मात्र आम्ही संहार केला.” 16 यावर शमुवेल शौलला म्हणाला, “बस्स कर! काल रात्री परमेश्वर माझ्याशी काय बोलला ते सांगतो.”

शौल म्हणाला, “बरे तर, सांगा.”

17 शमुवेल सांगायला लागला, “पूर्वी तू स्वतःला मोठा समजत नव्हतास. पण तू सर्व इस्राएलांचा प्रमुख बनलास. परमेश्वराने तुला राजा म्हणून नेमले. 18 परमेश्वराने तुला विशेष कामगिरीवर पाठवले. तो म्हणाला, ‘सर्व अमालेक्यांच्या संहार कर. ते नीच असल्याने त्यांना शिल्लक ठेवू नको. त्यांची नावनिशाणीही उरु देऊ नको.’ 19 पण तू परमेश्वराचे ऐकले नाहीस. तुला या गोष्टी ठेवायच्या होत्या म्हणून परमेश्वराने जे करु नको म्हणून सांगितले ते तू केलेस.”

20 शौल म्हणाला, “पण मी तर परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. त्याने पाठवले तिकडे मी गेलो. सर्व अमालेक्यांना नष्ट केले. राजा अगाग याला तेवढे मी परत आणले. 21 आणि सैनिकांनी जी निवडक गुरेमेंढरे घेतली ती गिलगाल येथे यज्ञात तुमचा देव परमेश्वर ह्याला अर्पण करण्यासाठी.”

22 पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वर जास्त प्रसन्न कशामुळे होईल? यज्ञ आणि होमार्पणे देऊन की त्याच्या आज्ञा पाळल्याने? त्याच्यासाठी यज्ञ करण्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळणे केव्हाही श्रेयस्कर. मेंढराची चरबी त्याला वाहण्यापेक्षा त्याचे ऐकणे चांगले. 23 परमेश्वराची अवज्ञा करणे हे जादूटोण्याचे पाप करण्या इतकेच वाईट. आडमुठेपणाने आपल्याला हवं ते करणे हे मूर्तीपूजेसारखंच पातक आहे. तू परमेश्वराचा आज्ञाभंग केलास. तेव्हा परमेश्वरालाही तू राजा असणे आता मान्य नाही.”

24 तेव्हा शौल शमुवेलला म्हणाला, “माझ्या हातून पाप झाले आहे. मी परमेश्वराचे वचन पाळले नाही. तुम्ही सांगितले तसे वागलो नाही. लोकांचा मला धाक वाटला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वागलो. 25 पण आता या पापाबद्दल मला क्षमा करा. मी तुम्हाला ही विनवणी करतो. माझ्या बरोबर चला. मी परमेश्वराची उपासना करीन.”

26 पण शमुवेल म्हणाला, “मी आता तुझ्याबरोबर परत येणार नाही. तू परमेश्वराचा शब्द मोडलास तेव्हा परमेश्वरही तुला इस्राएलच्या राजेपदावरुन झुगारुन देत आहे.”

27 एवढे बोलून शमुवेल जायला निघाला तेव्हा शौलने त्याच्या अंगरख्याचे टोक धरुन त्याला थोपवायचा प्रयत्न केला. यात अंगरखा फाटला. 28 शमुवेल म्हणाला, “तू हा अंगरखा फाडलास तसे इस्राएलचे राज्य तुझ्याकडून परमेश्वराने हिसकावून घेतले आहे. तुझ्याच एका मित्राकडे ते सोपवले आहे. तो तुझ्या पेक्षा भला आहे. 29 परमेश्वर इस्राएलचा देव असून तो सर्वकाळ आहे. परमेश्वर आपला शब्द फिरवत नाही की विचार बदलत नाही. माणसासारखा तो चंचल नव्हे.”

30 शौल म्हणाला, “ठीक आहे माझ्याहातून पाप झाले आहे. पण कृपाकरुन माझ्या बरोबर परत चल. इस्राएलचे लोक आणि अधिकारी मंडळी यांच्यासमोर माझा अवमान करु नको. तू बरोबर चल. मग मी प्रभु परमेश्वराची उपासना करतो.” 31 शमुवेल त्या प्रमाणे शौलबरोबर गेला. शौलने परमेश्वराची उपासना केली.

प्रेषितांचीं कृत्यें 5:1-11

हनन्या आणि सप्पीरा

हनन्या नावाचा एक मनुष्य होता त्याच्या पत्नीचे नाव सप्पीरा होते. हनन्याने त्याच्याकडे जी काही जमीन होती ती विकली. परंतु विकून आलेल्या पैशातून त्याने थोडेच पैसे प्रेषितांच्या हातात दिले, त्याने त्यातील काही पैसे गुपचूप काढून स्वतःसाठी ठेवले होते. त्याच्या पत्नीला हे माहीत होते. तिने या गोष्टीला संमति दिली होती.

पेत्र म्हणाला, “हनन्या, तू तुइया अंतःकरणावर सैतानाला का अधिकार चालूव देतोस? तू खोटे बोललास व पवित्र आत्म्याला फसाविण्याचा प्रयत्न केलास. तू जमीन विकलीस, पण त्यातील काही पैसे स्वतःसाठी का ठेवलेस? ती जमीन विकण्यापूर्वी तुझी होती. आणि विकल्यानंतर सुद्धा ते पैसे तुला जसे पाहिजे तसे खर्च करता आले असते. अशी वाईट गोष्ट करावी असा विचार तू का केलास? तू मनुष्यांशी नाही, तर देवाशी खोटे बोललास!”

5-6 जेव्हा हनन्याने हे ऐकले तेव्हा तो खाली पडला आणि मरण पावला. काही तरुण लोकांनी त्याचे शरीर गुंडाळले व बाहेर नेऊन पुरले. ज्या प्रत्येक मनुष्याने हे ऐकले, तो अति भयभीत झाला.

सुमारे तीन तासांनंतर त्याची पत्नी आत आली, सप्पीरा तिच्या नवऱ्याच्या बाबतीत जे झाले ते काहीच माहीत नव्हते. पेत्र तिला म्हणाला, “मला सांग, तुमच्या शेतासाठी तुम्हांला किती पैसे मिळाले, (अमुक) इतक्याच पैशांना मिळाले काय?”

सप्पीरास उत्तर दिले, “होय, आम्हाला शेत विकून तेवढेच पैसे मिळाले.”

पेत्र म्हणाला, “देवाच्या आत्म्याची परीक्षा पाहण्याचे तू व तुझ्यानवऱ्याने का ठरविले? ऐक! त्या पावलांचा आवाज ऐकतेस का? ज्या माणसांनी तुझ्या नवऱ्याला पुरले ते दाराजवळच आहेत! (तुझ्या नवऱ्याला जसे नेले) तसेच ते तुलाही नेतील.” 10 त्याच क्षणी सप्पीर त्याच्या पायाजवळ खाली पडली आणि मेली. तरुण माणसे आली, त्यांनी पाहिले की, ती मेलेली आहे. त्या माणसांनी तिला बाहेर नेले आणि तिच्या नवऱ्याजवळ पुरले. 11 सर्व विश्वासणारे आणि इतर दुसरे लोक ज्यांनी याविषयी ऐकले ते अतिशय भयभीत झाले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center