Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाची प्रार्थना
86 मी गरीब, असहाय्य माणूस आहे.
परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
2 परमेश्वरा मी तुझा भक्त आहे.
कृपा करुन माझे रक्षण कर.
मी तुझा सेवक आहे.
तू माझा देव आहेस.
माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला वाचव.
3 माझ्या प्रभु, माझ्यावर दया कर
मी दिवसभर तुझी प्रार्थना करीत आहे.
4 प्रभु, माझे जीवन तुझ्या हाती दिले आहे.
मला सुखी कर, मी तुझा सेवक आहे.
5 प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस.
तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.
6 परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
दयेसाठी माझी प्रार्थना ऐक.
7 परमेश्वरा, मी तुझी संकट काळात प्रार्थना करीत आहे.
तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे.
8 देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही.
तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही.
9 प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत.
ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो.
10 देवा, तू महान आहेस.
तू अद्भुत गोष्टी करतोस.
तू आणि फक्त तूच देव आहेस.
11 परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव.
मी जगेन व तुझी सत्ये पाळीन.
तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली
सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर.
12 देवा, माझ्या प्रभु मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो.
मी तुझ्या नावाला सदैव मान देईन.
13 देवा, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे
तू माझे मृत्यूलोकापासून रक्षण करतोस.
14 गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात.
देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे
आणि ते लोक तुला मान देत नाहीत.
15 प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस.
तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस.
16 देवा, तू माझे ऐकतोस हे मला दाखव.
तू माझ्यावर दया कर.
मी तुझा दास आहे.
मला शक्ती दे.
मी तुझा सेवक आहे मला वाचव.
17 देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव.
माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील.
तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.
27 शौल त्याचा नोकर आणि शमुवेल गावाच्या सीमेपाशी आले. तेव्हा शमुवेल शौलाला म्हणाला, “तुझ्या नोकराला पुढे व्हायला सांग तुझ्यासाठी परमेश्वराचा संदेश आहे.” तेव्हा नोकर पुढे चालू लागला.
शौलाचा राज्याभिषेक
10 शमुवेलने मग एका खास तेलाची कुपी घेतली आणि शौलच्या मस्तकावर ती ओतली. शौलचे चुंबन घेऊन तो म्हणाला, “परमेश्वराने त्याच्या प्रजेचा नेता म्हणून तुला आभिषिक्त केले (निवडले) आहे. त्यांचा तू अधिपती होशील. भोवतालच्या शत्रूंपासून त्यांचे रक्षण करशील. त्यासाठीच परमेश्वराने तुझा अभिषेक केला आहे हे खरे आहे. याची साक्ष पटवणाऱ्या या खुणा ऐक [a] 2 येथून निघालास की तुला बन्यामीनांच्या हद्दीत सेल्सह येथे राहेलीच्या कबरीजवळ दोन माणसे भेटतील. तुला ती म्हणतील, ‘तुमची गाढवे मिळाली. तेव्हा तुमच्या वडिलांची काळजी मिटली, पण आता ते तुमच्या काळजीत पडले आहेत. आता माझ्या मुलाला कुठे शोधू असे ते म्हणत आहेत.’”
3 शमुवेल पुढे म्हणाला, “पुढे गेलास की तुला ताबोरचा एला ओक वृक्ष लागेल. तिथे तुला देवाच्या भक्तीसाठी बेथलकडे निघालेली तीन माणसे भेटतील. त्यातल्या एकाजवळ तीन तान्ही करडं दुसऱ्याजवळ तीन भाकरी आणि तिसऱ्याकडे द्राक्षरसाचा बुधला असेल. 4 ती माणसे तुझी विचारपूस करतील. त्यांच्याजवळच्या दोन भाकरी ते तुला देतील आणि तू त्या घेशील. 5 मग तू गिबाथ एलोहिम येथे पोचशील. या ठिकाणी पलिष्ट्यांचा किल्ला आहे. या नगरात तू गेल्यावर भक्तीच्या उच्चस्थानाहून खाली येणारे संदेष्टे तुला भेटतील. भविष्य कथन करतील ते चालू असतानाच, परमेश्वराचा संचार झाल्याप्रमाणे ते नृत्य गायनात मशगुल असतील. ते सतार, संबळ, सनई, वीणा ही वाद्ये वाजवत असतील. 6 तुझ्यात त्यावेळी परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तू राहणार नाहीस. अगदी वेगळाच होशील. त्यांच्याबरोबर तूही भविष्यकथन करु लागशील. 7 असे झाले की तुला जे हवे ते तू साध्य करु शकशील. कारण परमेश्वराचीच तुला साथ असेल.
8 “गिलगाल येथे तू माझ्याआधी जा. मग मी तिथे येईन. यज्ञात होमार्पण आणि शांत्यर्पणे करीन. माझी तू सात दिवस वाट पाहा. मग मी तुला भेटेन आणि काय करायचे ते सांगेन.”
ख्रिस्ती नसलेल्यांबरोबर राहण्याविषयी सूचना
14 जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे? 15 ख्रिस्त आणि बलियाल [a] यांचा सलोखा कसा होणार? विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे? 16 देवाचे मंदिर आणि मूर्ति यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे:
“मी त्यांच्याबरोबर राहीन,
आणि त्यांच्याबरोबर चालेन,
मी त्यांचा देव होईन
आणि ते माझे लोक होतील.” (A)
17 “म्हणून त्यांच्यामधून बाहेर या
आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा.
प्रभु म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करु नका,
आणि मी तुम्हांला स्वीकारीन.” (B)
18 “मी तुम्हांला पिता असा होईन,
तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल,
असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो.” (C)
7 प्रिय मित्रांनो, देवाची अभिवचने आमच्याकडे असल्याने जे शरीर व आत्म्याला दुषित करते त्या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला शुद्ध ठेऊ या. देवाविषयी असलेल्या आदराने पवित्रतेत परिपूर्ण होऊ या.
2006 by World Bible Translation Center