Revised Common Lectionary (Semicontinuous)
परमेश्वराची शमुवेलला हाक
3 लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.
2 एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता. 3 परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता. 4 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे.” 5 एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.”
पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.”
शमुवेल झोपायला गेला. 6 पुन्हा परमेश्वराने हाक मारली. “शमुवेल.” शमुवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले.
एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”
7 परमेश्वर अजून शमुवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुवेलने परमेश्वराला ओळखले नाही.
8 परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.
परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. 9 तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, ‘हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक ऐकत आहे.’”
तेव्हा शमुवेल परत जाऊन झोपला. 10 परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुवेल, शमुवेल”, म्हणून हाक मारली.
शमुवेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास ऐकत आहे.”
11 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला सांगितले, “इस्राएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल. 12 एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे. 13 त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे. 14 आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”
15 रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.
16 पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले.
तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.
17 एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला? मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”
18 तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुवेलने सर्व काही सांगितले.
एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटेल ते तो करो.”
19 शमुवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरु दिले नाही. 20 परमेश्वराचा खरा संदेष्टा म्हणून दान पासून बैर शेबापर्यंत सर्व इस्राएलमध्ये शमुवेलची ख्याती पसरली.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.
139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे
त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
तू माझी रोज पाहणी केलीस.
त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.
देवाच्या गौरवासाठी तुमच्या शरीरांचा उपयोग करा
12 “मी काहीही करण्यास मुक्त आहे.” पण प्रत्येक गोष्ट हितकारक नसते, होय, “मी काहीही करण्यास मुक्त आहे,” पण कोणत्याही गोष्टीचे वर्चस्व माइयावर होऊ देणार नाही. 13 “अन्न पोटासाठी आहे व पोट अन्नासाठी आहे.” आणि हे खरे आहे. पण देव अन्नाचा व पोटाचा अशा दोघांचाही नाश करील. आणि आमची शरीरे ही जारकर्मसाठी नाही तर देवाच्या सेवेसाठी आणि प्रभूच्या शरीराच्या हितासाठी आहेत. 14 आणि देवाने केवळ प्रभूलाच मरणातून उठविले असे नाही तर तो आम्हंलाही आपल्या सामर्थ्याने मरणातून उठवील. 15 तुम्हाला माहीत नाही का की, तुमची शरीरे ख्रिस्ताला जोडलेली आहेत? तर मग जे ख्रिस्ताशी जोडलेले आहे ते घेऊन मी वेश्येला जोडावे काय? निश्चितच नाही! किंवा तुम्हांस ठाऊक नाही काय की, जो वेश्येशी जडतो तो तिच्याशी एकदेह होतो. 16 “कारण ती दोघे एकदेह होतील असे शास्त्रच सांगते.” 17 पंरतु जो स्वतः प्रभूशी जडतो तो त्याच्याशी आत्म्यात एक आहे.
18 जारकर्मापासून दूर पळा. मनुष्य एखादे पाप करणे शक्य आहे ते त्याच्या शरीराबाहेरचे आहे. परंतु जो जारकर्म करतो तो त्याच्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. 19 किंवा तुम्हाला हे माहीत नाही काय तुमची शरीरे ही तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे व जो तुम्हांला देवाकडून प्राप्त झाला त्यांचे मंदिर आहे, आणि स्वतःचे असे तुम्ही नाही? 20 कारण तुम्हांला किंमत देऊन विकत घेतले आहे. म्हणून तुमच्या शरीराने देवाला गौरव द्या.
43 दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला. येशू त्याला म्हणाला, “माझ्यामागे ये.” 44 जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता. 45 फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.”
46 परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला. “नासरेथ! नासरेथमधून काही चांगले निघेल काय?”
फिलिप्प म्हणाला, “येऊन पहा.”
47 येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले, येशू म्हणाला, “हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.”
48 “तुम्ही मला कसे ओळखता?” नथनेलाने विचारले.
येशूने उत्तर दिले, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता. तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्याविषयी सांगण्यापूर्वीच.”
49 मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात.”
50 येशू नथनेलला म्हणाला, “तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले, असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील!” 51 येशू पुढे म्हणाला, “खरे तेच मी तुला सांगतो. स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्व जण पाहाल. देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.” [a]
2006 by World Bible Translation Center