Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमल” या चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.
69 देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव.
पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.
2 इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही.
मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे.
मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत.
मी आता लवकरच बुडणार आहे.
3 मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे.
माझा घसा दुखत आहे.
मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत
तुझ्या मदतीची वाट पाहिली.
4 मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत.
ते विनाकारण माझा तिरस्कार करतात.
माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात.
माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात.
मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले
आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.
5 देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे.
मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.
30 मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन.
मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन.
31 यामुळे देव आनंदित होईल.
एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.
32 गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात.
या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.
33 परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो
परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात.
34 देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी,
समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्व त्याची स्तुती करा.
35 परमेश्वर सियोनाला वाचवेल.
परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील.
ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील.
36 त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल.
ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.
14 बहुमोल यहुदा, घाबरू नकोस.
इस्राएलमधील माझ्या लाडक्या लोकांनो, भिऊ नका.
मी खरोखरच तुम्हाला मदत करीन.”
परमेश्वराने स्वतःच ह्या गोष्टी सांगितल्या.
“जो तुम्हाला वाचवितो तोच
इस्राएलचा पवित्र देव हे बोलला.
15 मी तुम्हाला कोऱ्या मळणीयंत्राप्रमाणे केले आहे.
त्या यंत्राला खूप तीक्ष्ण दाते आहेत.
शेतकरी त्याचा उपयोग टरफलांपासून धान्य वेगळे करण्याकरिता करतात.
त्याचप्रमाणे तुम्ही डोंगर पायाखाली तुडवून चिरडून टाकाल.
तुम्ही टेकडयांची अवस्था धान्याच्या भुसकटाप्रमाणे कराल.
16 तुम्ही त्या फेकून द्याल
आणि वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या सगळीकडे विखुरल्या जातील.
नंतर तुम्ही परमेश्वराबद्दल आनंद मानाल.
तुम्हाला इस्राएलच्या पवित्र (देवाबद्दल) अभिमान वाटेल.
17 “गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात.
पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत.
त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे.
मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन.
मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
18 वैराण टेकड्यांवर मी नद्या वाहायला लावीन
आणि दऱ्यांतून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन.
मी वाळवंटाचे रूपांतर पाण्याने भरलेल्या सरोवरात करीन.
त्या शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
19 वाळवंटात गंधसरू, बाभूळ, ऑलिव्ह (तेल) सरू, देवदारू
आणि भद्रदारू हे वृक्ष वाढतील.
20 लोक हे सर्व पाहतील
आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामुळेच
हे सर्व झाले आहे हे त्यांना कळेल.
हे सर्व घडवून आणणारा एकमेव पवित्र (देव) आहे
हे लोकांना, हे सर्व पाहिल्यावर कळेल.”
येशू देवाचा कोकरा
29 दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले. योहान म्हणाला, “पाहा, हा देवाचा कोकरा. जगाचे पाप वाहून नेणारा. 30 याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, ‘माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे. परंतु तो माझ्याहून थोर आहे. तो माझ्या अगोदरपासून आहे. तो सदाजीवी आहे.’ 31 तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते. परंतु मी पाण्याने बाप्तिस्मा [a] करीत आलो यासाठी की, येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्राएलाला (यहूदी लोकांना) कळावे.”
32-34 नंतर योहान म्हणाला, “ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले. आणि देवाने मला सांगितले, ‘आत्मा खाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावताना दिसेल. तोच मनुष्य पवित्र आत्म्याने [b] बाप्तिस्मा करील.’ योहान म्हणाला, हे होताना मी पाहिले आहे. स्वर्गातून पवीत्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला. आत्मा कबुतरासारखा दिसत होता. आणि तो त्याच्यावर (येशूवर) येऊन स्थिरावला. म्हणून मी लोकांना सांगतो: ‘तो (येशू) देवाचा पुत्र आहे.’”
2006 by World Bible Translation Center