Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमल” या चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.
69 देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव.
पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.
2 इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही.
मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे.
मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत.
मी आता लवकरच बुडणार आहे.
3 मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे.
माझा घसा दुखत आहे.
मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत
तुझ्या मदतीची वाट पाहिली.
4 मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत.
ते विनाकारण माझा तिरस्कार करतात.
माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात.
माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात.
मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले
आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.
5 देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे.
मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.
30 मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन.
मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन.
31 यामुळे देव आनंदित होईल.
एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.
32 गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात.
या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.
33 परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो
परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात.
34 देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी,
समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्व त्याची स्तुती करा.
35 परमेश्वर सियोनाला वाचवेल.
परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील.
ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील.
36 त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल.
ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.
सुंता-कराराची खूण
17 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा. 2 तू असे करशील तर मी आपणामध्ये एक करार करीन; मी तुला अगणित पटीत वाढवीन असे अभिवचन देतो.”
3 मग अब्रामाने देवाला लवून नमन केले; देव त्याला म्हणाला, 4 “आपल्या करारातील माझा भाग हा असा; मी तुला अनेक राष्ट्रांचा महान पिता करीन; 5 मी तुझे नाव बदलतो; तुझे नाव अब्राम असणार नाहीं तर तुझे नाव अब्राहाम होईल; मी तुला हे नाव देत आहे कारण तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. 6 मी तुला भरपूर संतती देईन; तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास येतील, आणि राजे उत्पन्न होतील. 7 आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो. हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन. 8 ज्या प्रदेशामधून तू जात आहेस तो म्हणजे कनान देश मी तुला व तुझ्या वंशजाला कायमचा देईन आणि मी तुमचा देव होईन.”
9 आणि देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता ह्या करारतील तुझा भाग हा असा: तू व तुझ्या वंशजांनी पाळावयाचा माझा करार हा 10 की तुझ्या वंशजात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करुन घ्यावी. 11 तू हा करार पाळीत असल्याची खूण म्हणून आपली सुंता करुन घ्यावीस. 12 जन्मलेला लहान मुलगा आठ वर्षांचा होईल तेव्हा तू त्याची सुंता करावी; तुझ्या कुटुंबात जन्मलेल्या तसेच दुझ्या दासाच्या किंवा गुलामांच्या कुटुंबात जन्मलेल्या हरएक पुरुषाची सुंता करावी; 13 अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरुन कायम राहील;
अब्राहामाचे उदाहरण
4 तर मग अब्राहाम जो मानवी रितीने आपला पूर्वज याच्याविषयी आपण काय म्हणावे? 2 जर अब्राहाम आपल्या कर्मांनी नीतिमान ठरला तर त्याला अभिमान बाळगण्यास जागा आहे, परंतु त्याला देवासमोर अभिमान बाळगणे शक्य नाही. 3 कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला.”
4 जो कोणी काम करतो, त्याला मजुरी ही मेहरबानी म्हणून नव्हे तर त्याचा मोबदला म्हणून दिली जाते. 5 कोणताही मनुष्य कर्मे करुन देवाच्या दृष्टीने नीतिमान ठरु शकत नाही. म्हणून त्याने देवावरच भरवंसा ठेवावा. मग देव त्या मनुष्याचा भरवंसा स्वीकारुन त्याला आपल्या दृष्टीने नीतिमान ठरवतो. दुराचारी मनुष्यालाही नीतिमान ठरविणारा देवच आहे. 6 ज्याला देव कर्मावाचून नीतिमान ठरवितो, त्याच्याविषयीही दाविद म्हणतो;
7 “ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे.
ज्याच्या पापांवर पांघरुण घातले आहे
तो धन्य!
8 धन्य तो पुरुष
ज्याच्या पापांचा हिशेब प्रभु करणार नाही.” (A)
9 तर मग हे नीतिमत्व ज्यांची सुंता झाली आहे आणि ज्यांची सुंता झाली नाही अशांनाही लागू होते काय? जे बेसुंती आहेत अशांनाही ते लागू पडते कारण आम्ही म्हणतो, “अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला.” 10 आणि तो कसा गणण्यात आला, तो सुंता झालेला असताना का सुंता झालेली नसताना? 11 सुंता झालेली नसताना ही त्याने जो विश्वास दाखविला त्याचा परिणाम व नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली, यासाठी की, जे सुंता झाली नसताही विश्वास ठेवतात, त्यांच्याकडे ते नीतिमत्व गणले जावे. (त्यांचा तो पिता आहे.) 12 आणि तो ज्यांची सुंता झाली आहे त्यांचाही पिता आहे. पण त्यांची सुंता झालेली आहे म्हणून तो त्यांचा पिता झाला नाही, तर आपला पूर्वज अब्राहाम याची सुंता होण्यापूर्वीसुद्धा तो जसा विश्वासात जगत होता, तसे जर ते जगले तरच अब्राहाम त्यांचा पिता होऊ शकतो.
2006 by World Bible Translation Center