Revised Common Lectionary (Semicontinuous)
जगाची सुरवात
1 देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. 2 सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता.
पहिला दिवस-प्रकाश
3 नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला. 4 देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला. 5 देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.
संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस.
दावीदाचे स्तोत्र.
29 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
2 परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा.
तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
3 परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो
गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
4 परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते.
त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
5 परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो.
परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6 परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते.
सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
7 परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
8 परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
9 परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो.
परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता
आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो.
परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.
इफिस येथे पौल
19 तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्याला येशूचे काही अनुयायी आढळले. 2 पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हांला पवित्र आत्मा मिळाला काय?”
ते अनुयायी त्याला म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही!”
3 तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?”
ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”
4 पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता. त्याने लोकांना सांगितले की, त्याच्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा. तो येणारा म्हणजे येशू होय.”
5 जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभु येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला. 6 आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले. 7 या गटात सर्व मिळून बारा पुरुष होते.
4 मग बाप्तिस्मा करणारा योहान आला व रानात लोकांचे बाप्तिस्मे करू लागला. लोकांना त्याने सांगीतले की, जर त्यांना त्यांची अंतःकरणे बदलायची असतील तर त्यांनी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे. मग त्यांच्या पापांची क्षमा केली जाईल. 5 यहूदीया व यरूशलेम येथील सर्व लोक योहानाकडे आले, त्यांनी आपली पापे कबूल केल्यावर त्याने त्यांचा यार्देन नदीत बाप्तिस्मा केला.
6 योहान उंटाच्या केसांपासून केलेली वस्त्रे वापरीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता आणि तो टोळ व रानमध खात असे.
7 योहानाने लोकांना हा संदेश दिला: “माझ्यापेक्षाही महान असा कोणी एक येत आहे, तो माझ्यानंतर येत आहे. मी त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याच्यादेखील पात्रतेचा नाही. 8 मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
येशूचा बाप्तिस्मा(A)
9 त्यावेळी येशू गालीलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. 10 येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला. 11 आकाशातून वाणी झाली. ती म्हणाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो. तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
2006 by World Bible Translation Center