Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
29 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
2 परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा.
तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
3 परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो
गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
4 परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते.
त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
5 परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो.
परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
6 परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते.
सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
7 परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
8 परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो
कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
9 परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो.
परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.
10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता
आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो.
परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.
परमेश्वराची शमुवेलला हाक
3 लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.
2 एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता. 3 परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता. 4 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे.” 5 एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.”
पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.”
शमुवेल झोपायला गेला. 6 पुन्हा परमेश्वराने हाक मारली. “शमुवेल.” शमुवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले.
एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”
7 परमेश्वर अजून शमुवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुवेलने परमेश्वराला ओळखले नाही.
8 परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.
परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. 9 तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, ‘हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक ऐकत आहे.’”
तेव्हा शमुवेल परत जाऊन झोपला. 10 परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुवेल, शमुवेल”, म्हणून हाक मारली.
शमुवेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास ऐकत आहे.”
11 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला सांगितले, “इस्राएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल. 12 एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे. 13 त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे. 14 आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”
15 रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.
16 पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले.
तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.
17 एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला? मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”
18 तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुवेलने सर्व काही सांगितले.
एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटेल ते तो करो.”
19 शमुवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरु दिले नाही. 20 परमेश्वराचा खरा संदेष्टा म्हणून दान पासून बैर शेबापर्यंत सर्व इस्राएलमध्ये शमुवेलची ख्याती पसरली. 21 शिलोह येथे परमेश्वर त्याला दर्शन देत राहिला. म्हणजेच आपल्या वचनाच्याद्वारे तो शमुवेलसमोर प्रगट झाला.
10 दिमष्कमध्ये येशूचा एक अनुयायी होता. त्याचे नाव हनन्या होते. प्रभु त्याच्याशी एका दृष्टान्तात बोलला: तो म्हणाला, “हनन्या!”
हनन्याने उत्तर दिले, “मी आहे, प्रभु!”
11 प्रभु हनन्याला म्हणाला, “ऊठ आणि नीट नावाच्या रस्तयावर जा. तेथे यहूदाचे [a] घर शोध व तार्ससहून आलेल्या शौल नावाच्या व्यक्तिबद्दल विचार. सध्या तो तेथे आहे व प्रार्थना करीत आहे. 12 शौलाने दृष्टान्त पाहिला आहे. त्यात हनन्या नावाचा मनुष्य आपल्याकडे आला असून आपल्यावर हात ठेवीत आहे, असे त्याला दिसले. व त्यानंतर त्याला पुन्हा दृष्टी प्राप्त झाली, असे त्याला दिसले.”
13 परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभु मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरुशलेम येथील तुइया संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे. 14 आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात, अशा लोकांना बांधून नेण्यासाठी प्रमुख याजकाकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”
15 परंतु प्रभु म्हणाला, “जा! एका महत्वाच्या कामाकरिता मी त्याला निवडले आहे, माझ्याविषयी त्याने राजांना, यहूदी लोकांना, आणि दुसऱ्या राष्ट्रांना सांगितले पाहिजे. 16 माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्याला सहन कराव्या लागतील त्या मी त्याला दाखवून देईन.”
17 हनन्या निघाला, आणि यहूदाच्या घरी गेला. त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौला, माझ्या बंधू, प्रभु येशूने मला पाठविले. ज्याने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठविले, येशूने मला पाठविले यासाठी की, तुला पुन्हा पाहता यावे व पवित्र आत्म्याने तू भरला जावास.” 18 लागलीच खपल्यासारखे काही तरी शौलाच्या डोळ्यांवरुन खाली पडले, आणि त्याला पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. 19 नंतर त्याने अन्न सेवन केल्यावर त्याच्या अंगात जोम आला. शौल काही दिवस दिमिष्क येथील शिष्यांबरोबर राहिला.
2006 by World Bible Translation Center