Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तुतीगीत.
110 परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला,
“मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन.
माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”
2 परमेश्वर तुझे राज्य वाढवायला मदत करेल.
तुझे राज्य सियोनपाशी सुरु होईल आणि ते तू तुझ्या शत्रूंवर त्यांच्या देशात जाऊन राज्य करशील.
3 तू तुझ्या सैन्याची जमवाजमव करशील
त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील.
त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील.
हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील. [a]
4 परमेश्वराने वचन दिले आहे
आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही.
“तू सदैव याजक राहिला आहेस
मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”
5 माझा प्रभु तुझ्या उजव्या बाजूला आहे.
तो रागावेल तेव्हा इतर सर्व राजांचा पराभव करील.
6 देव सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील.
सर्व जमीन प्रेतांनी झाकली जाईल
आणि बलवान राष्ट्रांच्या नेत्यांना देव शिक्षा करील.
7 राजा वाटेत झऱ्याचे पाणी पितो.
तो खरोखरच त्याचे मस्तक उचलेल आणि अतिशय सामर्थ्यवान [b] होईल.
चांगली स्त्री-ज्ञान
20 ऐक! ज्ञान (रुपी स्त्री) लोकांना शिकवायचा प्रयत्न करीत आहे. ती रस्त्यात आणि बाजारात ओरडत आहे. 21 ती गजबजलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यावरुन बोलावत आहे. लोकांनी तिचे ऐकावे म्हणून शहराच्या दरवाजाशी प्रयत्न करीत आहे. ज्ञान [a] (रुपी स्त्री) म्हणते.
22 “तुम्ही लोक मूर्ख आहात. तुम्ही आणखी किती काळ मूर्ख गोष्टी करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाची थट्टा किती काळ करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाचा किती काळ तिरस्कार करणार आहात? 23 तुम्ही माझ्या सल्ल्याकडे आणि शिकवणुकीकडे लक्ष दिले असते तर मला जे माहित आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितले असते. मला जे सर्व माहित आहे ते तुम्हाला सांगितले असते. मी माझे सर्व ज्ञान तुम्हाला दिले असते.
24 “परंतु तुम्ही माझे ऐकायला नकार दिला. मी मदत करायचा प्रयत्न केला. मी माझा हात दिला. पण तुम्ही माझी मदत झिडकारली. 25 तुम्ही दूर गेलात आणि माझ्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले. तुम्ही माझे शब्द स्वीकारायला नकार दिलात. 26 म्हणून मी तुमच्या संकटांना हसेन. तुमच्यावर संकटे आलेली पाहून मला आनंद होईल. 27 मोठ्या वादळांप्रमाणे तुमच्यावर मोठी संकटे येतील. जोरदार वाऱ्याप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील. तुमची संकटे आणि दु:ख तुम्हाला खूप मोठ्या ओझ्यासारखे वाटेल.
28 “या सर्व गोष्टी घडतील तेव्हा तुम्ही माझी मदत मागाल. पण मी तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही मला शोधाल पण मी तुम्हाला सापडणार नाही. 29 मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला. 30 तुम्ही माझा सल्ला ऐकायला नकार दिलात. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला तेव्हा तुम्ही माझे ऐकले नाही. 31 म्हणून आता तुम्ही तुमच्या मार्गाने चला. तुम्ही तुमच्या वाईट मार्गाने जीवन जगलात म्हणून तुम्ही तुमचा सर्वनाश करुन घेणार आहात.
32 “मूर्ख लोक मरतात कारण त्यांनी ज्ञानाचा मार्ग चोखाळायला नकार दिलेला असतो. त्यांचा मूर्ख मार्ग चोखाळण्यात त्यांना आनंद मिळतो. आणि त्यानेच त्यांचा नाश होतो. 33 परंतु जो माझी आज्ञा पाळतो तो सुरक्षित राहातो. तो समाधानी असतो. त्याला वाईट गोष्टींची भीती बाळगायचे कारण उरत नाही.”
स्वतःला देवाला द्या
4 तुमच्यामध्ये भांडणे व झगडे कोठून येतात? तुमच्यामध्ये ज्या स्वार्थी भावना संघर्ष करतात त्यामधून ते येत नाही काय? 2 तुम्हांला काही गोष्टी पाहिजे असतात पण त्या तुम्हांला मिळत नाही, म्हणून तुम्ही खून करता व दुसऱ्या लोकांचा मत्सर करता पण तरीही तुम्हांला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून तुम्ही भांडण व झगडे करता. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही. 3 आणि जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा तुम्हाला काहीही मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या उद्देशाने मागता, यासाठी की तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या स्वतःच्या सुखासाठी वापरता.
4 अप्रामाणिक लोकांनो, तुम्हाला हे माहीत नाही का की, जगाशी मैत्री हे देवाबरोबरचे वैर आहे. जो मनुष्य जगाशी मैत्री करतो तो देवाशी वैर करतो. 5 पवित्र शास्त्र सांगते त्यात काही अर्थ नाही काय? जेव्हा ते म्हणते, की देवाने जो आत्मा आमच्यात ठेवला आहे तो आमची हेव्याने वाट पाहतो. [a] 6 पण देव आम्हांवर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.” [b]
7 म्हणून स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. सैतानाला विरोध करा. आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. 8 देवाजवळ या, आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा. आणि तुमची अंतःकरणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात. 9 दु:खी व्हा, शोक करा, आणि रडा! तुमचे हसणे दु:खात बदलो. तुमच्या आनंदाचे खेदात रूपांतर होवो. 10 तुम्ही प्रभूसमोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हांला उच्च स्थान देईल.
2006 by World Bible Translation Center