Revised Common Lectionary (Semicontinuous)
148 परमेश्वराची स्तुती करा.
स्वर्गातल्या देवदूतांनो
स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा.
ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा.
आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा.
का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती
त्या सदैव राहाव्यात म्हणून केली.
देवाने कधीही न संपणारे नियम केले.
7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा.
महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
8 देवाने अग्नी आणि गारा, बर्फ
आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे
आणि देवदार वृक्ष निर्मिले.
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि
पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले.
त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या.
देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा.
त्याच्या नावाला सदैव मान द्या.
स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील.
लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील.
लोक इस्राएलची स्तुती करतील.
हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो.
परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र
18 नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.”
19 मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन म्हणजे तू ते ऐकशील कारण मी निवडलेल्या कोणावरही दया करीन व त्यांच्यावर प्रेम करीन. 20 परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जगणार नाही.
21 “माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा. 22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यत माझ्या हाताने तुला झाकीन; 23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठपाहाशील; परंतु तू माझा चेहरा पाहाणार नाहीस.”
1 जगाच्या सुरुवातीपासून हे होते. हे आम्ही ऐकले आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. आम्ही ते निरखून पाहिले आहे. आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे. जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत. 2 ते जीवन आम्हास प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि त्या अनंतकाळच्या जीवनाविषयी आम्ही तुम्हांला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले. 3 आम्ही ते पाहिले आहे व ऐकले आहे आणि आम्ही आता ते तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासह सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. 4 म्हणून आम्ही तुम्हांला या गोष्टींविषयी लिहीत आहोत. यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा.
देव आमच्या पापांची क्षमा करतो
5 आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत. देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. 6 जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही. 7 पण जर आम्ही प्रकाशात चालतो, जसा देव प्रकाशात आहे तर आमची विश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते.
8 जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवीत आहोत. आणि आमच्यामध्ये सत्य नाही. 9 जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो.
2006 by World Bible Translation Center