Revised Common Lectionary (Semicontinuous)
148 परमेश्वराची स्तुती करा.
स्वर्गातल्या देवदूतांनो
स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा.
त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य-चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा.
ताऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा.
आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा.
का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती
त्या सदैव राहाव्यात म्हणून केली.
देवाने कधीही न संपणारे नियम केले.
7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा.
महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
8 देवाने अग्नी आणि गारा, बर्फ
आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे
आणि देवदार वृक्ष निर्मिले.
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि
पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले.
त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या.
देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा.
त्याच्या नावाला सदैव मान द्या.
स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील.
लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील.
लोक इस्राएलची स्तुती करतील.
हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो.
परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्र
मंदिरात यिर्मयाचा बोधपर उपदेश
26 यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी परमेश्वराकडून हा संदेश आला. यहोयाकीम हा योशीया राजाचा मुलगा होता. 2 परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा संदेश दे. मी तुला सांगितलेले सर्व यहूदातील सगळ्या लोकांना सांग. माझ्या संदेशातील कोणताही भाग गाळू नकोस. 3 कदाचित् ते ऐकतीलही आणि माझ्या संदेशाचे पालन करतील. पापी जीवन जगण्याचे ते कदाचित् सोडून देतील. त्यांचे परिवर्तन झाल्यास, त्यांना शिक्षा करण्याच्या माझ्या बेतांबद्दल मीही कदाचित् पुनर्विचार करीन. त्यांनी खूप वाईट कृत्ये केली. त्याबद्दल त्यांना शिक्षा करण्याची योजना मी आखत आहे. 4 तू त्यांना सांग ‘परमेश्वर काय म्हणतो ते ऐका: मी तुम्हाला माझी शिकवण दिली. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागलेच पाहिजे. 5 माझ्या सेवकांनी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच पाहिजेत. (संदेष्टे माझे सेवक आहेत) मी पुन्हा पुन्हा माझे सेवक पाठविले. पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. 6 तुम्ही माझे ऐकले नाही तर मी माझे यरुशलेममधील मंदिर शीलोमधील माझ्या पवित्र तंबूप्रमाणे [a] करीन दुसऱ्या शहरांवर अरिष्ट यावे असे वाटणाऱ्या लोकांना यरुशलेम जरुर आठवेल.’”
7 परमेश्वराच्या मंदिरातील यिर्मयाचे हे बोलणे याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि सगळ्या लोकांनी ऐकले. 8 परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे, यिर्मयाने, परमेश्वराने सांगितलेली प्रत्येक गोष्ट सांगितली, नंतर याजकांनी, संदेष्ट्यांनी आणि लोकांनी यिर्मयाला धरले. ते म्हणाले, “अशा भयंकर गोष्टी सांगितल्याबद्दल तू मरशील! 9 परमेश्वराच्या नावावर अशा भयंकर गोष्टी सांगण्याचे धाडस तू कसे काय करु शकतोस! शिलोच्या मंदिराप्रमाणे ह्या मंदिराचा नाश होईल, असे म्हणण्याचे साहस तू कसे काय करु शकतोस. यरुशलेम निर्जन वाळवंटाप्रमाणे होईल असे तू कसे काय म्हणू शकतोस!” परमेश्वराच्या मंदिरात सर्व लोक यिर्मयाभोवती जमले.
12 मग यिर्मया यहूदाच्या राज्यकर्त्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “ह्या नगरीबद्दल व ह्या मंदिराबद्दल ह्या गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठविले. तुम्ही ऐकलेला प्रत्येक शब्द परमेश्वराच्या तोंडचा आहे. 13 तुम्ही तुमची वागणूक बदला. तुम्ही सत्कृत्ये करायला सुरवात केलीच पाहिजे. तुम्ही परमेश्वराचे, तुमच्या देवाचे ऐकलेच पाहिजे. तुम्ही असे वागलात, तर परमेश्वराचे हृदयपरिवर्तन होईल. त्याने सांगितलेल्या वाईट गोष्टी तो करणार नाही. 14 माझ्याबद्दल म्हणाल, तर मी तुमच्या हातात आहे. तुम्हाला योग्य व बरोबर वाटेल ते करा. 15 पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध माणसाला मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही ह्या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसालाही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरीच मला तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही ऐकलेला संदेश खरेच परमेश्वराकडूनच आलेला आहे.”
स्तेफनाविरुद्ध यहूदी लोक
8 स्तेफन (सात लोकांपैकी एक) यास मोठा आशीर्वाद मिळाला. देवाने त्याला लोकांसमोर अद्भूत चमत्कार करण्याचे सामर्ध्य दिले होते. 9 परंतु काही यहूदी आले आणि त्यांनी स्तेफनाबरोबर वाद घातला. हे यहूदी सभास्थानातून [a] आले होते. त्याला लिबर्तीनांसाठी सभास्थान असे म्हणत. (हे सभास्थान कुरेने, आणि अलेक्सांद्र येथील यहूदी लोकांसाठी सुद्धा होते). किलीकिया व आशियातील यहूदीसुद्धा त्यांच्याबरोबर होते. ते सर्व आले आणि स्तेफानबरोबर वाद घालू लागले. 10 परंतु ज्या ज्ञानाने व आत्म्याच्या प्रेरणेने स्तेफन बोलत होता त्यापुढे यहूदी लोकांचा टिकाव लागेना.
11 तेव्हा त्यांनी काही लोकांना पैसे दिले व असे बोलायला शिकविले की, “आम्ही स्तेफनाला मोशे व देव यांच्यावरुध्द दुर्भाषण करताना म्हणजे वाईट गोष्टी बोलताना ऐकले.” 12 त्यामुळे लोकसमुदाय, यहूदी वडीलजन आणि परुशी लोक भडकले. ते इतके चिडले की, त्यांनी येऊन स्तेफनाला धरले. आणि त्याला यहूदी लोकांच्या (पुढाऱ्यांच्या) सभेत नेले.
13 आणि त्यांनी तेथे खोटे साक्षीदार आणले, ते म्हणाले, “हा मनुष्य (स्तेफन) पवित्र मंदिराविषयी नेहमी वाईट बोलतो. आणि तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी नेहमी वाईट बोलतो. 14 आम्ही त्याला असे बोलताना ऐकले आहे की, नासरेथचा येशू ही जागा नष्ट करील आणि मोशेने घालून दिलेल्या चालीरीती बदलून टाकील.” 15 धर्मसभेत बसलेल्या सर्व सभासदांनी स्तेफनाकडे न्याहाळून पाहिले. तेव्हा त्याचा चेहरा देवदूताच्या चेहऱ्यासारखा दिसत होता.
51 “तुम्ही जे ताठ मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखी असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारीत आला आहात. 52 तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (ख्रिस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (ख्रिस्ताचा) विश्वासघात व खून केलात. 53 तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”
स्तेफनाचा वध होतो
54 यहूदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताला ऐकले व त्यांना फार राग आला, ते त्याच्याविरुद्ध दातओठ खाऊ लागले. 55 परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले. 56 तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आहे!”
57 स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहूदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वतःच्या हातांनी झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले. 58 त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते. 59 ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, “हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर!” 60 नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, “प्रभु, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको!” असे बोलून त्याने प्राण सोडला.
2006 by World Bible Translation Center