Revised Common Lectionary (Semicontinuous)
96 परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्यांची स्तुती करण्यासाठी नवे गाणे गा.
सगळ्या जगाने परमेश्वराच्या स्तुतीचे गाणे गावे.
2 परमेश्वराला गाणे गा.
त्याच्या नावाचा जयजयकार करा.
चांगली बात्तमी सांगा.
तो रोज आपला उध्दार करतो ते सांगा.
3 लोकांना सांगा की देव खरोखरच अद्भुत आहे.
देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टीकरतो त्याबद्दल सांगा.
4 परमेश्वर महान आहे आणि स्तुतीला योग्य आहे.
तो इतर “देवांपेक्षा” भयंकर आहे.
5 इतर देशांतले “देव” केवळ पुतळे आहेत.
पण परमेश्वराने मात्र स्वर्ग निर्माण केला.
6 त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते.
देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते.
7 कुटुंबानो आणि राष्ट्रांनो,
परमेश्वरासाठी स्तुतीपर आणि गौरवपर गीते गा.
8 परमेश्वराच्या नावाचा जयजयकार करा.
तुमची अर्पणे घेऊन मंदिरात जा.
9 परमेश्वराची त्याच्या सुंदर मंदिरात उपासना करा.
पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस परमेश्वराची उपासना करो.
10 सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही.
परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल.
11 स्वर्गांनो, सुखी राहा!
पृथ्वीमाते आनंदोत्सव कर.
समुद्र आणि त्यातील प्राण्यांनो आनंदोत्सव करा.
12 शेते आणि त्यात उगवणारे सर्व सुखी व्हा.
जंगलातल्या वृक्षांनो गा आणि सुखी व्हा.
13 परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा.
परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे.
तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.
8 परमेश्वर म्हणाला, “थोडे थांब मी ऊभा राहून तुझा न्यायनिवाडा करण्याची वाट बघ! अनेक राष्ट्रांतील लोकांना गोळा करुन, तुला सजा देण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा मला हक्क आहे. माझा तुझ्यावरचा राग दाखविण्यासाठी मी त्या लोकांचा उपयोग करीन. मी किती चिडलो आहे हे त्यावरुन कळेल. संपूर्ण देशाचा नाश होईल. 9 त्यानंतर इतर देशातील लोकांना मी बदलून टाकीन. मग ते स्पष्ट भाषा बोलतील आणि परमेश्वराचे नाव घेतील. ते सर्वजण खांद्याला खांदा लावून एक होऊन. माझी उपासना करतील. 10 कूश देशातील नदीपलीकडचे लोकसुध्दा येतील. माझी विखुरलेली माणसे मला शरण येतील. माझी उपासना करणारे मला वाहण्यासाठी काही गोष्टी घेऊन येतील.
11 “मग, यरुशलेम, तुझ्या लोकांनी माझ्याविरुध्द केलेल्या दुष्कृत्यांची तुला लाज वाठणार नाही. का? कारण त्या वाईट लोकांना मी यरुशलेममधून बाहेर घालवीन. त्या गर्विष्ठांना मी दूर नेईन. माझ्या पवित्र पर्वतावर त्या माणसांतील कोणीही गर्विष्ठ असणार नाही. 12 माझ्या नगरीत (यरुशलेममध्ये) मी फक्त नम्र व लीन लोकांनाच राहू देईन. ते परमेश्वराच्या नावावर श्रध्दा ठेवतील. 13 इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक वाईट कृत्ये करणार नाहीत. ते खोटे बोलणार नाहीत. खोट्याच्या आधारे ते इतरांना फसविणार नाहीत. चरुन आडव्या होणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे ते शांत राहतील त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”
5 नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाविषयी मोशे लिहितो, “जो मनुष्य या गोष्टी करतो तो त्याकडून जगेल.” [a] 6 विश्वासाने मिळणारे नीतिमत्व हे सांगते, “तुम्ही आपल्या मनात म्हणू नका की ‘स्वर्गात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला खाली आणावयास”) 7 किंवा “‘खाली अधोलोकात कोण जाईल?’” (म्हणजे “ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला.”)
8 नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंतःकरणात आहे.” [b] ते वचन हे आहे 9 की, जर तू तुझ्या मुखाने “येशू प्रभु आहे” असा विश्वास धरतोस आणि आपल्या अंतःकरणात देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा विश्वास धरतोस तुझे तारण होईल 10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.
11 शास्त्र सांगते, “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.” [c] 12 याचे कारण की, यहूदी आणि ग्रीक यांच्यात भेद नाही. कारण प्रभु हा सर्वांचा प्रभु आहे. जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करण्या इतका तो संपन्र आहे. 13 कारण “जे कोणी प्रभूचे नाव घेऊन हाक मारतील, त्यांचे तारण होईल.” [d]
2006 by World Bible Translation Center