Revised Common Lectionary (Semicontinuous)
एथान एज्राहीचे मास्कील
89 मी सदैव परमेश्वराच्या प्रेमाचे गाणे गाईन
मी सदैव त्याच्या इमानदारीचे गाणे गाईन.
2 परमेश्वरा, तुझे प्रेम सार्वकालिक आहे यावर माझा विश्वास आहे.
तुझी इमानदारी आकाशा इतकी अथांग आहे.
3 देव म्हणाला, “मी निवडलेल्या राजाशी करार केला.
मी दावीदला, माझ्या सेवकाला वचन दिले.
4 दावीद, मी तुझा वंश चालू राहील असे करीन.
तुझे राज्य सदैव राहील असे मी करीन.”
19 तू तुझ्या भक्तांशी दृष्टांतात बोललास आणि म्हणालास,
“मी गर्दीतला एक माणूस निवडला आणि त्या माणसाला महत्व दिले.
मी त्या तरुण सैनिकाला बलवान केले.
20 माझा सेवक दावीद मला सापडला
आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.
21 मी दावीदाला माझ्या उजव्या हाताने आधार दिला
आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले.
22 त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करु शकला नाही.
दुष्टलोक त्याचा पराभव करु शकले नाहीत.
23 मी त्याच्या शत्रूंना संपवले, जे लोक माझ्या निवडलेल्या
राजाचा तिरस्कार करीत होते त्यांचा मी पराभव केला.
24 माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन.
मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
25 मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले,
तो नद्यांना काबूत ठेवेल.
26 तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझे वडील आहात
तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’
देवाचा करारकोश यरुशलेममध्ये आणतात
6 दावीदाने पुन्हा इस्राएलमधून निवडक तीस हजार माणसे निवडून सैन्य तयार केले. 2 त्यासह तो पवित्र करार कोश यरुशलेमला आणण्यासाठी यहूदातील बाला येथे गेला. देवाची उपासना करायची असली म्हणजे हा कोश जेथे असेल तेथे लोकांना जावे लागे. हा पवित्र करार कोश म्हणजे देवाचे सिंहासन आहे. करुब देवदूतांच्या प्रतिकृती त्यावर होत्या. त्यावर परमेश्वर राजासारखा बसलेला होता. 3 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून दावीदाच्या लोकांनी हा पवित्र कोश आणला. मग तो एका नव्या गाडीवर ठेवला. अबीनादाबचे मुलगे उज्जा आणि अह्यो हे ती गाडी हाकीत होते.
4 अबीनादाबच्या डोंगरावरील घरातून हा पवित्र कोश त्यांनी वाहून आणला. अह्यो पवित्र कोशापुढे चालू लागला.
5 तेव्हा देवदाराच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत कोशापुढे चालू लागले. 6 ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. 7 पण परमेश्वराचा त्याच्यावर कोप होऊन उज्जाला मरण आले. पवित्र कोशाला स्पर्श करुन त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा करार कोशाशेजारीच उज्जा गतप्राण झाला. 8 या घटनेमुळे दावीद फार खिन्न झाला आणि त्याने या जागेचे नाव “पेरेस-उज्जा” म्हणजेच “उज्जाला शासन” असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे.
9 मात्र दावीदाला त्या दिवशी परमेश्वराचा धाक वाटू लागला. तो मनात म्हणाला, “आता मी हा पवित्र कोश माझ्याकडे कसा आणू?” 10 परमेश्वराचा पवित्र कोश (पवित्र कोशाची पेटी) आपल्याबरोबर दावीद नगरात आणण्याची दावीदाची इच्छा नव्हती आणि त्याने तो कोश (दावीदानगरात न हलवता) एका बाजूस नेऊन गथच्या ओबेद-अदोम याच्या घरी ठेवला. 11 तिथे तो कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला.
देव त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे
1 भूतकाळात देव आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे पुष्कळ वेळा वेगवेगळ्या मार्गांनी बोलला. 2 पण या शेवटच्या दिवसांत तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने हे जगसुद्धा पुत्राकरवीच निर्माण केले. 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला. 4 तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ झाला. त्याचे नावसुद्धा जे त्याला मिळाले ते त्यांच्या नावापेक्षा श्रेष्ठ आहे.
2006 by World Bible Translation Center