Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
125 जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे आहेत.
ते कधीही थरथरणार नाहीत.
ते सदैव असतील.
2 यरुशलेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर त्याच्या माणसांभोवती आहे.
तो त्याच्या माणसांचे सदैव रक्षण करील.
3 दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत.
जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील.
4 परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा.
ज्या लोकांची मने शुध्द आहेत त्यांच्याशी तू चांगला राहा.
5 दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात.
परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील.
इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
एलीया आणि बालचे संदेष्टे
18 लागोपाठ तिसऱ्या वर्षी पाऊस पडला नाही तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, “अहाब राजाला जाऊन भेट मी लौकरच पाऊस पाडणार आहे.” 2 तेव्हा एलीया अहाबला भेटायला गेला.
शोमरोनमध्ये तेव्हा अन्नधान्याचे दुर्भिक्ष्य होते. 3 अहाब राजाने आपल्या महालाचा प्रमुख ओबद्या याला बोलावणे पाठवले. (ओबद्या परमेश्वराचा खरा अनुयायी होता. 4 एकदा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले. त्यांच्या अन्नपाण्याची तरतूद केली.) 5 अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “माझ्याबरोबर चल आपण सगळ्या ओहोळझऱ्यांचा शोध घेऊ. आपली खेचरे, घोडी तग धरुन राहतील इतपत चारा शोधून काढू म्हणजे मग आपल्याला आपले पशू मारावे लागणार नाहीत.” 6 त्या दोघांनी मग आपापसात पाहणी करायच्या प्रदेशाची वाटणी केली आणि सगळा प्रदेश पाण्यासाठी पायाखाली घातला. दोघेजण दोन वाटांनी गेले. 7 ओबद्याला वाटेत एलीया भेटला. ओबद्याने त्याला ओळखून अभिवादन केले. ओबद्या त्याला म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”
8 एलीया म्हणाला, “होय, मीच आहे. आता मी इथे असल्याचे आपल्या राजाला जाऊन सांग.”
9 तेव्हा ओबद्या म्हणाला, “तुमचा ठावठिकाणा मी अहाबला सांगितला तर तो मला मारुनच टाकील. मी आपला काही अपराध केला नाही, मग तुम्ही माझ्या जिवावर का उठलात? 10 परमेश्वर देवाशपथ, राजा सर्वत्र तुमचा शोध घेत आहे. त्यासाठी त्याने गावोगाव माणसे पाठवली आहेत. जेथे जेथे तुम्ही सापडला नाहीत असे कळले तिथे तिथे त्याने तिथल्या राजांना एलीया इथे नाही असे शपथेवर सांगायला सांगितले. 11 आणि आता तुम्ही मला म्हणता, जा त्याला जाऊन सांग म्हणून! 12 तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले तर परमेश्वराचा आत्मा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. मी लहानपणापासून देवाविषयी आदर बाळगून आहे. 13 मी काय केले ते तुम्हाला माहीत आहे ना? ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारायला निघाली होती तेव्हा मी एकेका गुहेत पन्नास असे शंभर संदेष्ट्यांना दोन गुहांमध्ये लपवले होते. त्यांना खायला प्यायला दिले. 14 आणि आता तुम्ही मला राजाला आपली खबर द्यायला सांगत आहात. तो नि:संशय मला मारणार!”
15 यावर एलीया त्याला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, आज मी राजासमोर उभा राहाणार आहे, असे मी वचन देतो.”
16 तेव्हा ओबद्या राजाकडे गेला. त्याने अहाब राजाला एलीयाचा ठावठिकाणा सांगितला. राजा एलीयाला भेटण्यासाठी आला.
17 अहाबने एलीयाला पाहिले तेव्हा अहाब त्याला म्हणाला, “इस्राएलला त्रस्त करुन सोडणारा तूच का तो?”
18 एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही. ते तुम्ही आणि तुमचे वडील यांच्यामुळे उद्भवलेले आहे. परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून तुम्ही इतर अमंगळ दैवतांच्या नादी लागलात तेव्हा हा त्रास सुरु झाला.
देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा
10 शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा. 11 देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे. 12 कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे. 13 म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.
14 म्हणून भक्क मपणे उभे राहा! सत्याने आपली कंबर बांधा, नीतीमत्त्वाचे उररत्राण धारण करा. 15 आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला. 16 या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल. 17 आणि तारणाचे शिररत्राण घ्या, आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे, तो घ्या.
2006 by World Bible Translation Center