Revised Common Lectionary (Semicontinuous)
परमेश्वराचा मुक्तीचा संदेश
61 परमेश्वराचा सेवक म्हणतो, परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले. 2 परमेश्वराच्या कृपासमयाची घोषणा करण्यासाठी देवाने मला पाठविले. देव पापी लोकांना कधी शिक्षा करणार आहे हे त्यांना सांगण्यासाठी देवाने मला धाडले. दु:खी लोकांचे दु:ख हलके करण्यासाठी देवाने मला पाठविले. 3 सियोनच्या दु:खी लोकांकडे देवाने मला पाठविले. मी त्यांना उत्सवासाठी तयार करीन. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्यांचे दु:ख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना “चांगले वृक्ष” आणि “परमेश्वराची सुंदर रोपटी” अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे.
4 त्या वेळेला नाश केली गेलेली जुनी शहरे पुन्हा वसविली जातील. ती आरंभी होती तशी नव्याने केली जातील. फार फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी केली जातील.
8 असे का घडेल? कारण मी परमेश्वर आहे आणि मला प्रामाणिकपणा आवडतो. मला चोरी व प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. म्हणून मी लोकांना योग्य तेच फळ देईन. मी माझ्या लोकांबरोबर कायमचा, करार केला आहे. 9 सर्व राष्ट्रांतील एकूण एक लोक माझ्या लोकांना ओळखतील. माझ्या राष्ट्रातील मुलांना प्रत्येकजण ओळखेल. त्यांना पाहताच कोणालाही कळून येईल की ह्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला आहे.
देवाचा सेवक तारण व चांगुलपणा आणतो
10 परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो.
देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे.
परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो.
हे कपडे स्वतःच्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत.
परमेश्वर चांगुलपणाचा अगंरखा मला घालतो.
वधूवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे.
11 जमीनीमुळे रोपे वाढतात.
लोक शेतांत बी पेरतात.
ते बी जमिनीत रूजून वाढते.
त्याचप्रमाणे परमेश्वर चांगुलपणा वाढवील,
सर्व राष्ट्रांत त्याची प्रशंसा अधिकच वाढवील.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
इतर देशांतील लोक म्हणतील,
“इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
तर आपण खूप आनंदी होऊ.
4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5 एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6 तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
मरीया देवाची स्तुति करते
46 आणि मरीया म्हणाली,
47 “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;
माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.
48 कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली होय,
येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
49 कारण सर्वसमर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात,
त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
51 त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले;
गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.
52 सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे,
आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
53 त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे.
श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.
54 त्याचा सेवक जो इस्राएल याला
मदत करण्यास तो आला आहे.
55 त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे
अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”
16 सर्वदा आनंद करा. 17 नेहमी प्रार्यना करीत राहा. 18 प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
19 आत्म्याला विझविण्याचा प्रयत्न करु नका. 20 संदेष्ट्यांच्या संदेशाचा उपहास करु नका. 21 पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करुन खात्री करुन घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरुन ठेवा. 22 दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.
23 देव स्वतः जो शांतीचा उगम आहे. तो तुम्हांला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करो आणि तुमचे सर्व मनुष्यत्व म्हणजे तुमचा आत्मा, जीव आणि शरीर प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो. 24 देव जो तुम्हाला बोलावितो तो विश्वासू आहे आणि खरोखरच तो तसे करील.
6 योहान [a] नावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठविले. 7 तो लोकांना प्रकाशाविषयी (ख्रिस्ताविषयी) सांगण्यासाठी आला. यासाठी की, योहानाकडून प्रकाश विषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा. 8 योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला.
योहान येशूविषयी लोकांना सांगतो(A)
19 यरूशलेम येथील यहूदी लोकांनी योहानाकडे काही याजक व लेवी [a] ह्यांना पाठविले. “तू कोण आहेस?” हे विचारण्यासाठी यहूदी लोकांनी त्यांना पाठविले. 20 योहान अगदी मोकळेपणाने बोलला. त्याने उत्तर देण्यास नकार दिला नाही. तो स्पष्टपणे म्हणाला, “मी ख्रिस्त [b] नाही.” योहानाने लोकांना तेच सांगितले.
21 यहूदी लोकांनी योहानाला विचारले, “तर मग तू कोण आहेस? तू एलीया [c] आहेस काय?”
योहानाने उत्तर दिले, “नाही, मी एलीया नाही.”
यहूदी लोकांनी विचारले, “तू संदेष्टा आहेस काय?”
योहानाने म्हटले, “नाही, मी संदेष्टा नाही.”
22 यावर यहूदी लोक म्हणाले, “तू कोण आहेस? तुझ्याविषयी आम्हांला सांग. ज्या लोकांनी आम्हांला पाठविले, त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हांला सांग. तू स्वतःला कोण म्हणवितोस?”
23 योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,
“मी वैराण रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे:
‘प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.’” (B)
24 परूशी लोकांनी या यहूदी लोकांना पाठविले होते. 25 हे लोक योहानाला म्हणाले, “तू म्हणतोस की, मी ख्रिस्त नाही; मी एलीया नाही किंवा मी संदेष्टाही नाही, मग तू लोकांचा बाप्तिस्मा का करतोस?”
26 योहानाने उतर दिले, “मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. परंतु तुम्हांला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे. 27 माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्याइतकीही माझी लायकी नाही.”
28 यार्देन नदीपलीकडील बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या. योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे.
2006 by World Bible Translation Center