Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 27

दावीदाचे स्तोत्र.

27 परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस.
    मला कुणाचीही भीती बाळगायला नको.
परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे.
    म्हणून मी कुणालाही भीत नाही.
माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील
    ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील.
माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन
    माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील.
परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही.
    युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही.
का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.

मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे.
    मला हे मागायचे आहे,
“मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे
    मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन
    आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईन.”

मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील.
    तो मला त्याच्या तंबूत लपवेल
    तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे.
    परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन.
मी बळी देताना आनंदाने ओरडेन.
    मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन, वाद्ये वाजवीन.

परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे.
    माझ्याशी दयेने वाग.
परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे.
    मला अगदी माझ्या ह्रदयातून तुझ्याशी बोलायचे आहे.
    परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.
परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस.
    तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस.
मला मदत कर! मला दूर लोटू नकोस.
    मला सोडू नकोस, देवा तूच माझा तारणारा आहेस.
10 माझे आईवडील मला सोडून गेले.
    परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले.
11 परमेश्वरा, मला शत्रू आहेत म्हणून तू मला तुझे मार्ग शिकव.
    मला योग्य गोष्टी करायला शिकव.
12 मला माझ्या शत्रुंचा बळी होऊ देऊ नको त्यांनी माझ्याबद्दल खोटेनाटे सांगितले.
    मला दुख देण्यासाठी त्यांनी माझ्याबद्दल खोटे सांगितले.
13 मला खरोखरच असा विश्वास वाटतो की
    मरण्याआधी मला परमेश्वराचा चांगुलपणा दिसेल.
14 परमेश्वराच्या मदतीची वाट बघ.
    सामर्थ्यवान आणि धीट हो
    व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.

मलाखी 2:10-3:1

यहूदा देवाशी सत्यनिष्ठ नव्हता

10 आमचा पिता (देव) एकच आहे. आपल्यातील प्रत्येकाला एकाच देवाने निर्माण केले आहे. मग लोक आपल्या भावांनाच का फसवितात? ते लोक कराराचा मान ठेवीत नाहीत. आमच्या पूर्वजांनी देवाशी केलेल्या कराराचा ते मान राखत नाहीत. 11 यहूद्यांच्या लोकांनी इतरांना फसविले. यरुशलेमवासीयांनी आणि इस्राएल लोकांनी भयानक कृत्ये केली. यहूद्यांच्या लोकांनी परमेश्वराच्या पवित्र मंदिराचा अपमान केला. देवाला ते स्थान प्रिय आहे. यहूद्यांच्या लोकांनी त्या परक्या देवतेची पूजा करण्यास सुरवात केली. 12 त्या लोकांना, परमेश्वर, यहूदाच्या कुळांतून वगळेल. ते कदाचित् परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी आणतील. पण त्याचा उपयोग होणार नाही. 13 तुम्ही आक्रंदन करुन, परमेश्वराची वेदी अश्रूंनी भिजविलीत, तरी परमेश्वर तुमच्या भेटी स्वीकारणार नाही. तुम्ही परमेश्वराला अर्पण करण्यास आणलेल्या गोष्टींनी, तो प्रसन्न होणार नाही.

14 तुम्ही विचारता “परमेश्वर आमच्या भेटी का स्वीकारत नाही?” का? कारण तुम्ही केलेली दुष्कृत्ये त्याने पाहिली आहेत. परमेश्वर तुमच्याविरुध्दचा साक्षीदार आहे. तुम्ही तुमच्या पत्नीची फसवणूक करताना त्याने पाहिले. तरुण असताना तिच्याशी विवाह केलास. ती तुमची मैत्रीण होती. नंतर तुम्ही एकमेकांजवळ शपथा घेतल्या व ती तुझी पत्नी झाली. पण तू तिला फसविलेस. 15 पती-पत्नींनी शरीरांनी व मनांनी एक व्हावे अशी देवाची इच्छा आहे. का? मग त्यांची मुलेही पवित्र होतील. म्हणून आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका. तुमच्या तारुण्यापासून ती तुमची अधार्गांगिती आहे.

16 इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे. आणि पुरुष करीत असलेल्या दुष्ट कर्मांची मला घृणा वाटते. म्हणून तुमच्या आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका.”

न्यायाची विशेष वेळ

17 तुम्ही चुकीच्या गोष्टी शिकविल्या त्यामुळे परमेश्वराला फार दु:ख झाले. दुष्कृत्ये करणारे लोक देवाला आवडतात, असे तुम्ही शिकविले. देवाला हे लोक चांगले वाटतात, असे तुम्ही सांगितले. दुष्कृत्ये करणाऱ्यांना देव शिक्षा करीत नाही, असे तुम्ही शिकविले.

सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी माझा दूत पाठवीत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करील. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभु त्याच्या मंदिरात येईल तुम्हांला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे तो खरोखरीच येत आहे.”

लूक 1:5-17

जखऱ्या आणि अलीशिबा

यहूदीयाचा राजा हेरोद याच्या दिवसांत, जखऱ्या नावाचा एक याजक होता. तो अबीयाच्या याजककुळातील होता. त्याला एक पत्नी होती, ती अहरोनाच्या वंशातील कन्यांपैकी होती. तिचे नाव अलीशिबा होते. दोघेही देवाच्या दृष्टीने धार्मिक होते आणि प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात काटेकोर होते. परंतु त्यांना मूल नव्हते कारण अलीशिबा वांझ होती. आणि शिवाय दोघेही फार म्हातारे झाले होते.

जेव्हा जखऱ्याच्या गटाची मंदिरात सेवा करण्याची वेळ आली आणि त्यावेळी तो तेथे देवाचा याजक म्हणून सेवा करीत होता, याजकांच्या प्रथेप्रमाणे मंदिरात देवापुढे धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली. 10 जेव्हा धूप जाळण्याच्या वेळी सर्वजण बाहेर जमून प्रार्थना करीत होते,

11 तेव्हा देवाच्या दूताने त्याला दर्शन दिले. देवदूत धूप जाळण्याच्या वेदीच्या उजव्या बाजूला उभा होता. 12 जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली. 13 देवदूत त्याला म्हणाला, “जखऱ्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, आणि तुझी पत्नी अलीशिबा इजपासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान ठेव. 14 तो तुला आनंद आणि सुख देईल. त्याचा जन्म होईल तेव्हा पुष्कळ लोक आनंदित होतील. 15 देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.

16 “आणि तो पुष्कळ इस्राएल लोकांना प्रभु त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. 17 योहान स्वतः देवापुढे चालेल, तो एलीयाप्रमाणे समर्थ होईल. एलीयाला जो आत्मा होता, तोच त्याला असेल. तो वडिलांची अंतःकरणे त्याच्या मुलांकडे वळवील. आज्ञा न मानणाऱ्यांना तो धार्मिकतेकडे नेईल. प्रभुसाठी लोकांना तयार करण्यासाठी तो या गोष्टी करील.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center