Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुक गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत
85 परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव.
याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत.
कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.
2 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
त्यांची पापे पुसून टाक.
8 परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले.
तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल,
जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.
9 देव लवकरच त्याच्या भक्तांना वाचवील.
आम्ही परत मानाने आमच्या जमिनीवर राहू.
10 देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल.
चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील.
11 पृथ्वीवरचे लोक देवाशी प्रामाणिक राहातील
आणि स्वर्गातला तो देव त्यांच्याशी चांगला वागेल. [a]
12 परमेश्वर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देईल.
जमीन खूप चांगली पिके देईल.
13 देवाच्या समोर चांगुलपणा जाईल
आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील.
24 देव म्हणाला, “मी तुम्हाला त्या राष्ट्रांतून बाहेर काढून एकत्र करीन आणि तुमच्या देशात तुम्हाला परत आणीन. 25 मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडून मी तुम्हाला शुद्ध करीन. तुमची घाण मी धुवून काढीन. त्या ओंगळ मूर्तीचीही घाण मी धुवून काढीन आणि तुम्हाला शुद्ध करीन.” 26 देव म्हणाला, “मी तुमच्यात नवीन आत्मा घालून नवे ह्दय बसवीन तुमचे दगडाचे ह्दय बदलून त्या जागी माणसाचे कोमल ह्दय बसवीन. 27 मी माझा आत्मा तुम्हाला देईन. मग तुम्ही बदलाल व माझे नियम पाळाल. काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल. 28 मग तुम्ही, मी तुमच्या पूर्वजांना दिलेल्या, देशात राहाल. तुम्ही माझे व्हाल व मी तुमचा देव होईल.”
यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी संशय घेतात(A)
27 ते परत यरूशलेमेस आले. आणि येशू मंदिरात फिरत असता मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले. 28 आणि त्याला म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणांस कोणी दिला?”
29 येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो आणि जर तुम्ही मला त्याचे उत्तर दिले तर मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हांस सांगेन. 30 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.”
31 त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही? 32 परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागावातील.” पुढाऱ्यांना लोकांची भीति वाटत होती. कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.
33 मग त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला माहीत नाही.”
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मग मीही या गोष्टी कोणात्या अधिकाराने करीत आहे हे तुम्हांला सांगत नाही.”
2006 by World Bible Translation Center