Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुक गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत
85 परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव.
याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत.
कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.
2 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
त्यांची पापे पुसून टाक.
8 परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले.
तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल,
जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.
9 देव लवकरच त्याच्या भक्तांना वाचवील.
आम्ही परत मानाने आमच्या जमिनीवर राहू.
10 देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल.
चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील.
11 पृथ्वीवरचे लोक देवाशी प्रामाणिक राहातील
आणि स्वर्गातला तो देव त्यांच्याशी चांगला वागेल. [a]
12 परमेश्वर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देईल.
जमीन खूप चांगली पिके देईल.
13 देवाच्या समोर चांगुलपणा जाईल
आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील.
परमेश्वर यिर्मयाला बोलावितो
4 यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. हा संदेश असा होता.
5 “तू आईच्या गर्भात जन्म घेण्यापूर्वीपासून
मला माहीत होतास.
तू जन्माला येण्यापूर्वीच
मी तुझी विशेष कामगिरीसाठी निवड केली.
राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून मी तुझी निवड केली.”
6 मग यिर्मया म्हणाला, “पण सर्वशक्तिमान परमेश्वरा, मला कसे बोलावे ते माहीत नाही. मी तर एक लहान बालक आहे.”
7 पण परमेश्वर मला म्हणाला,
“‘मी लहान बालक आहे’ असे म्हणू नकोस.
मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे.
मी तुला सांगेन ती प्रत्येक गोष्ट तू लोकांना सांगितलीच पाहिजे.
8 कोणालाही घाबरु नकोस.
मी तुझ्या पाठीशी आहे.
मी तुझे रक्षण करीन.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
9 मग परमेश्वराने हात लांब करुन माझ्या तोंडाला स्पर्श केला. मग परमेश्वर मला म्हणाला,
“यिर्मया, मी माझे शब्द तुझ्या तोंडात घालीत आहे.
10 खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी,
नष्ट करुन टाकण्यासाठी आणि उलथून टाकण्यासाठी,
उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी
आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”
अंत्युखियाला सुवार्ता येते
19 स्तेफन मारला गेल्यानंतरच्या काळात जो छळ झाला, त्यामुळे विश्वासणारे पांगले. यतील काही दूरच्या ठिकाणी, उदा. फेनीके, कुप्र व अंत्युखियापर्यंत गेले. विश्वासणाऱ्यांनी या ठिकाणी फक्त यहूदी लोकांनाच सुवार्ता सांगितली. 20 यातील काही विश्वासणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते. जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा ते ग्रीक लोकांशीही बोलले. त्यांनी या ग्रीक लोकांना येशूविषयीची सुवार्ता सांगितली. 21 प्रभु विश्वासणाऱ्यांना मदत करीत होता आणि बऱ्याच मोठ्या गटाने विश्वास ठेवला व ते प्रभुला अनुसरु लागले.
22 याविषयीची बातमी यरुशलेम येथील विश्वासणाऱ्या मंडळीच्या कानावर आली. म्हणून यरुशलेम येथील विश्वासणाऱ्यांनी बर्णबाला अंत्युखियाला पाठविले. 23-24 बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांना खूपच आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.” पुष्कळ लोक ख्रिस्ताचे अनुयायी झाले.
25 जेव्हा बर्णबा तार्सस शहरी गेला तेव्हा तो शौलाचा शोध घेत होता. 26 जेव्हा बर्णबाने त्याला शोधले तेव्हा त्याने शौलाला आपल्यासह अंत्युखियाला आणले. शौलाने व बर्णबाने वर्षभर तेथे राहून पुष्कळ लोकांना शिकवले. अंत्युखियामध्ये येशूच्या अनुयायांना “ख्रिस्ती” हे नाव पहिल्यांदा मिळाले.
2006 by World Bible Translation Center