Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुक गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत
85 परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव.
याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत.
कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.
2 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
त्यांची पापे पुसून टाक.
8 परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले.
तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल,
जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.
9 देव लवकरच त्याच्या भक्तांना वाचवील.
आम्ही परत मानाने आमच्या जमिनीवर राहू.
10 देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल.
चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील.
11 पृथ्वीवरचे लोक देवाशी प्रामाणिक राहातील
आणि स्वर्गातला तो देव त्यांच्याशी चांगला वागेल. [a]
12 परमेश्वर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देईल.
जमीन खूप चांगली पिके देईल.
13 देवाच्या समोर चांगुलपणा जाईल
आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील.
परमेश्वराकडे परत येण्याची फळे
6 “चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या!
त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील.
त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.
2 दोन दिवसांनी तो आपल्याला जिवंत करील.
आणि तिसऱ्या दिवशी उठवील
मग आपण त्यांच्याजवळ पाहू शकू.
3 आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊ
या परमेश्वराला समजून घ्यायचा कसून प्रयत्न करू या.
पहाट येते हे जसे आपल्याला माहीत आहे,
हेही आपल्याला माहीत आहे.
जमिनीला पाणी पुरविणाव्या वसंतातील
पावसाप्रमाणे परमेश्वर येईल.”
लोक निष्ठावान नाहीत
4 “एफ्राईम व यहूदा, मी तुमचे काय करावे बरे?
तुमची निष्ठा सकाळच्या धूक्याप्रमाणे आहे.
प्रातःकाळीच नाहीशा होणाऱ्या
दवाप्रमाणे तुमची निष्ठा आहे.
5 मी संदेष्ट्यांचा उपयोग करुन
लोकांसाठी नियम केले.
माझ्या आज्ञेप्रमाणे लोकांना ठार मारले गेले.
त्या निर्णयांतून चांगल्या गोष्टी निर्माण होतील.
6 का? कारण मला निष्ठावंत प्रेम पाहिजे,
बळी नको.
लोकांनी होमार्पणे आणण्यापेक्षा,
परमेश्वराला जाणून घ्यावे असे मला वाटते.
थेस्सलनीकाकरांचा विश्वास आणि जीवन
2 आम्ही नेहमीच प्रार्थनामध्ये तुमची आठवण करुन तुम्ही सर्वांसाठी देवाचे आभार मानतो. 3 आम्ही आमचा देव व पित्यासमोर तुमचे विश्वासाचे कार्य, तुम्ही प्रेमाने केलेले श्रम, आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावरील दृढ आशेने सोशिकपणे धरलेला धीर याची सतत आठवण करतो.
4 माझ्या बंधूनो, देवाने प्रीतित केलेली तुमची निवड ही आम्हाला माहीत आहे. 5 कारण आमची सुवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दांनी आली नाही तर पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने आली हे तुम्हांला माहीत आहे, आम्ही तुमच्यामध्ये कसे राहिलो तुम्हांला माहीत आहे. ते तुमच्या फायद्यासाठी होते. 6 आणि तुम्ही आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला, पवित्र आत्म्याकडून मिळणाऱ्या आनंदात तुम्ही मोठ्या कष्टाने संदेश स्वीकारलात.
7 त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही सर्व विश्वासणाऱ्यासाठी जे मासेदोनियात व अखियात होते त्यांच्यासाठी आदर्श असे झालात 8 कारण तुमच्याकडून गाजविण्यात आलेला संदेश केवळ मासेदिनिया आणि अखियातच ऐकला गेला असे नाही तर तुमचा देवावरील विश्वास सगळीकडे माहीत झाला आहे. म्हणून आम्हांला काही सांगण्याची गरज नाही. 9 कारण ते स्वतःच आमच्याविषयी सांगत आहेत म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले तसेच तुम्ही मूर्तिपासून देवाकडे कसे वळलात व खऱ्या आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी कसे वळलात. 10 आणि आता ज्याला देवाने मेलेल्यांतून उठविले त्या त्याच्या स्वर्गातून येणाऱ्या पुत्राची तुम्ही वाट पाहत आहात. तोच येशू देवाच्या येणाऱ्या क्रोधापासून आपले रक्षण करतो.
2006 by World Bible Translation Center