Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे स्तोत्र
79 देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले.
त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला.
त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
2 शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली
त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली.
3 देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले.
प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.
4 आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला
आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
5 देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का?
देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?
6 देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव.
जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
7 त्या देशांनी याकोबाचा नाश केला
त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.
8 देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस.
आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव.
आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
9 देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर.
आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल.
आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.
10 इतर देशांना “कुठे आहे तुमचा देव?
तो तुम्हाला मदत करु शकत नाही का?”
असे म्हणू देऊ नकोस.
देवा, त्या लोकांना शिक्षा कर म्हणजे आम्ही ते बघू शकू.
तुझ्या सेवकांना मारल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
11 कैद्यांच्या कण्हण्याकडे लक्ष दे देवा,
मारण्यासाठी ज्यांची निवड झाली होती त्या लोकांना तुझ्या सामर्थ्याने वाचव.
12 देवा, आमच्या भोवतालच्या माणसांनी आम्हांला
जो त्रास दिला त्याबद्दल त्यांना सात वेळा शिक्षा दे.
तुझा अपमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
13 आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कळपातल्या मेंढ्या आहोत.
आम्ही सदैव तुझी स्तुती करु.
देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी स्तुती करु.
राज्य परत आणले जाईल
6 परमेश्वर म्हणतो,
“यरुशलेमला दुखापत झाली व ती लंगडी झाली.
ती दूर फेकली गेली
तिला दुखविले गेले व शिक्षा झाली.
पण मी तिला माझ्याकडे परत आणीन.
7 “त्या लंगड्या नगरीतील लोकच
वाचतील एके काळी
त्या नगरीतील लोकांना बळजबरीने ती नगरी सोडावी लागली.
पण मी त्यांचे एक बलशाली राष्ट्र करीन.”
परमेश्वर त्यांचा राजा असेल.
तो सियोन पर्वतावरुन चिरंतन काळापर्यत राज्य करील.
8 आणि तू, कळपाच्या मनोऱ्या,
तुझी वेळ येईल.
योफल, सियोनच्या टेकाडा,
तू पुन्हा शासनाची जागा होशील.
हो! पूर्वीप्रमाणेच राज्य
यरुशलेममध्ये असेल.
इस्राएल लोकांनी बाबेलला का जायला पाहिजे?
9 आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस?
तुझा राजा गेला का?
तुझ्या नेत्याला तू गमावलेस का?
प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे तुला त्रास होत आहे.
10 सियोनच्या कन्ये, तुला वेदना जाणवू दे.
तू आपल्या बाळाला जन्म दे.
तुला या नगरीतून (यरुशलेममधून) बाहेर गेलेच पाहिजे.
तू रानात राहशील.
मला असे म्हणायचे आहे की तू बाबेलला जाशील.
पण त्या ठिकाणापासून तुझे रक्षण केले जाईल.
परमेश्वर तेथे जाऊन तुझी सुटका करील.
तो, तुला, तुझ्या शत्रूंपासून दूर नेईल.
परमेश्वर इतर राष्ट्रांचा नाश करील
11 पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द लढण्यास आली आहेत.
ती म्हणतात, “ती पाहा सियोन!
या, आपण तिच्यावर हल्ला करु या.”
12 त्या लोकांनी त्यांचे बेत केलेत.
पण परमेश्वर काय बेत करीत आहे, हे त्यांना माहीत नाही.
परमेश्वराने त्या लोकांना विशेष उद्देशाने येथे आणले आहे.
ते लोक, खळ्यातील धान्याप्रमाणे चिरडले जातील.
इस्राएल त्याच्या शत्रूंचा पाडाव करील
13 “सियोनच्या कन्ये, ऊठ आणि त्या लोकांना चिरडून टाक.
मी तुला खूप सामर्थ्यवान करीन.
तुला जणू काही लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर असतील.
तू पुष्कळांवर आघात करुन त्यांचे तुकडे तुकडे करशील.
तू त्यांची संपत्ती परमेश्वराला देशील.
तू त्याचे धन जगाच्या परमेश्वराला देशील.”
बाबेलचा नाश होतो
18 यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला आकाशातून खाली येताना पाहिले. त्याच्याकडे मोठे अधिकार होते. आणि त्याच्या गौरवाने पृथ्वी झळाळत होती. 2 प्रचंड आवाजात तो ओरडला:
“पडली!
महान बाबेल पडली!
ती दुष्ट आत्म्यांचे घर बनली आहे.
आणि प्रत्येक दुष्ट आत्म्याचा आश्रय
आणि प्रत्येक अशुद्ध,
धिक्कारलेल्या पक्षांचा
आश्रय झाली आहे.
3 कारण तिच्या व्याभिचाराचा द्राक्षारस जो वेड लावणारा आहे
तो सर्व राष्ट्रांनी प्याली आहेत.
पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आहे
आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अति संपत्तीने व ऐषारामाने श्रीमंत झाले आहेत.”
4 मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला:
“माइया लोकांनो, तिच्यातून बाहेर
या यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये यासाठी
की तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत.
5 कारण तिची पापे स्वर्गाला भिडली आहेत.
आणि देवाला तिच्या अपराधांची आठवण झाली आहे.
6 तिने ज्याप्रमाणे तुम्हाला दिले आहे, तसे तुम्ही तिचे परत करा.
तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा
तिने दुसऱ्यांना दिले त्याच्या दुप्पट प्रमाणात
तेच मद्य तिच्या प्याल्यात भरा.
7 तिने स्वतःला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात
तुम्ही तिला छळ व दु:ख द्या.
ती तिच्या अंतःकरणात गर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते,
मी विधवा नाही.’
आणि ‘मी केव्हाच शोक करणार नाही.’
8 म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील.
(त्या पीडा म्हणजे): मृत्यू, शोक आणि दुष्काळ ती
आगीत भस्म होऊन जाईल
कारण सामर्थ्यशाली प्रभु देव तिचा न्याय करील.
9 “पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळत असताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील. 10 तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूर उभे राहतील, आणि ओरडतील:
‘भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल,
सामर्थ्याच्या शहरा!
एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!’
2006 by World Bible Translation Center