Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे स्तोत्र
79 देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले.
त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला.
त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
2 शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली
त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली.
3 देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले.
प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.
4 आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला
आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
5 देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का?
देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?
6 देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव.
जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
7 त्या देशांनी याकोबाचा नाश केला
त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.
8 देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस.
आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव.
आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
9 देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर.
आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल.
आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.
10 इतर देशांना “कुठे आहे तुमचा देव?
तो तुम्हाला मदत करु शकत नाही का?”
असे म्हणू देऊ नकोस.
देवा, त्या लोकांना शिक्षा कर म्हणजे आम्ही ते बघू शकू.
तुझ्या सेवकांना मारल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
11 कैद्यांच्या कण्हण्याकडे लक्ष दे देवा,
मारण्यासाठी ज्यांची निवड झाली होती त्या लोकांना तुझ्या सामर्थ्याने वाचव.
12 देवा, आमच्या भोवतालच्या माणसांनी आम्हांला
जो त्रास दिला त्याबद्दल त्यांना सात वेळा शिक्षा दे.
तुझा अपमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
13 आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कळपातल्या मेंढ्या आहोत.
आम्ही सदैव तुझी स्तुती करु.
देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी स्तुती करु.
यरुशलेममधून नियमशास्त्र येईल
4 शेवटल्या दिवसांत, देवाचे मंदिर ज्या पर्वतावर आहे, तो पर्वत सर्व पर्वतांत उंच असेल.
टेकड्यांपेक्षा तो उंच होईल.
आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा प्रवाह सतत वाहत राहील.
2 तेथे पुष्कळ देशातले लोक जातील.
ते म्हणतील, “या! आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ या.
याकोबच्या देवाच्या मंदिरात आपण जाऊ या.
मग परमेश्वर आपल्याला त्याचा आचारधर्म शिकवील
व आपण त्याचे अनुसरण करु.”
परमेश्वराच्या शिकवणुकीचा आणि परमेश्वराच्या संदेशाचा प्रारंभ यरुशलेममधून सियोन पर्वतावरुन होईल.
मग तो सर्व जगात पसरेल.
3 तेव्हा सर्व राष्ट्रांतील लोकांचा परमेश्वर न्यायाधीश असेल.
दूरच्या देशातील पुष्कळ लोकांमधील वाद परमेश्वर मिटवील.
ते लोक लढण्यासाठी शस्त्रे वापरण्याचे सोडून देतील.
ते त्यांच्या तलवारीपासून नांगर बनवतील
आणि भाल्यांचा उपयोग झाडे छाटण्यासाठी करतील.
लोक एकमेकांशी लढाई करणार नाहीत.
लोकांना कधीही युध्दाचे शिक्षा दिले जाणार नाही.
4 प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीखाली
व अंजिराच्या झाडाखाली बसेल.
त्यांना कोणीही घाबविणार नाही.
का? कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने असे घडेल म्हणून सांगितले आहे.
5 दुसऱ्या राष्ट्रातील लोक आपापल्या दैवतांना अनुसरतात.
पण आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे नाव घेत सदासर्वकाळ चालत राहू.
शेवटच्या पीडेसह देवदूत
15 मग मी आणखी एक अदभुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे सात देवदूतांनी सात पीडा आणल्या होत्या. या शेवटच्या पीडा होत्या कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे.
2 मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती. 3 त्यांनी देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गाईले:
“प्रभु देवा, सर्वसमर्था तू महान
आणि अदभुत गोष्टी करतोस.
राष्ट्रांच्या राजा,
तुझे मार्ग योग्य व खरे आहेत
4 हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील
सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील.
फक्त तूच पवित्र आहेस
सर्व लोक येऊन तुझी उपासना करतील
कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”
5 त्यानंतर मी स्वर्गामध्ये मंदिर (साक्षीचा मंडप) [a] पाहिले. मंदिर उघडे होते. 6 आणि सात पीडा आणणारे सात देवदूत मंदिराबाहेर आले. त्यांनी स्वच्छ चमकदार तागाचे कपडे घातले होते. त्यानी त्यांच्या छातीवर सोन्याच्या पटृ्या बांधल्या होत्या. 7 मग सात देवदूतांना चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने सात सोनेरी वाट्या दिल्या जो देव अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्या रागाने त्या वाट्या भरल्या. 8 आणि देवाच्या तेजामधून व पराक्रमामधून निघालेल्या धुराने मंदिर भरले. आणि कोणीही सात देवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश करु शकले नाही. देवाच्या रागाने वाट्या भरल्या
देवाच्या क्रोधाने भरलेल्या सात वाट्या
2006 by World Bible Translation Center